सुशांत कुंकळयेकर
आॅगस्ट संपता संपता एकाच दिवशी तीन खूनांच्या घटना नोंद झाल्याने संपूर्ण राज्य हादरलेल्या अवस्थेत असतानाच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात आणखी दोन खुनांच्या घटना घडल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत गोव्यात 21 खुनाच्या आणि दोन सदाेष मनुष्यवधाच्या घटना घडल्या असून त्यात एकंदर 26 जणांचे जीव गेले आहेत. यातील 80 टक्के खून प्रकरणात बिगर गोमंतकीय कामगार वर्गाचा हात असल्याचे दिसून आले आहे.
यंदाची आंकडेवारी पाहिल्यास 21 खून प्रकरणांपैकी 17 प्रकरणांत बिगर गोमंतकीयांचा हात असून बहुतांश हत्त्या दारुच्या नशेत उफाळलेली भांडणे, अनैतिक संबंधावरून झालेले वाद आणि पूर्व वैमनस्यातून झालेली भांडणे ही कारणे आहेत.
यावर्षी फक्त एकच खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचे दिसून आले आहे. 30 ऑगस्ट रोजी जे तीन खून झाले त्यातही हीच कारणे पुढे आली आहेत. माडेल-फातोर्डा येेथे दोन मजुरांमध्ये रात्रीच्यावेळी दारू पिऊन वाद झाल्याने एकाने दुसऱ्याच्या डाेक्यात दगड घालून त्याला संपवले.
बाणस्तारी येथे अनैतिक संबंधाच्या वादातून झालेल्या संजुदेवी या 50 वर्षीय महिलेचा तिच्याच पतीने खून केल्याचे उघड झाले होते. तर डिचोली येथे रमेश गवळी या 38 वर्षीय बेळगावच्या हमालाचा त्याच्याच पत्नीने आपल्या याराच्या सहाय्याने खून केल्याचे उघड झाले.
मुलांची हत्या करून स्वत:लाही संपवले
यंदा ज्या 21 खुनांच्या घटना घडल्या आहेत त्यापैकी एक विलक्षण अशी घटना असून कांदोळी येथील एका इसमाने आपल्याच दहा वर्षीय मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून करुन नंतर स्वत: गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती.
ही घटना 7 जानेवारी रोजी घडली होती. जानेवारी महिन्यातच 14 तारखेला अशीच आणखी एक घटना घडली. ज्यात महमद सलीम या 35 वर्षीय इसमाने चारित्र्याच्या संशयावरुन आपल्याच 11 वर्षीय मुलीचा खून केला. ही घटना चोडण येथे घडली हाेती.
वर्षात सात महिलांचे खून; तपास शून्य !
गोव्यात यावर्षी सात महिलांच्या खुनाच्या घटना घडल्या असून त्यात दोन मुली अल्पवयीन आहेत. यातील एका महिलेच्या खुनाचा कुणाला पत्ताच लागू शकला नाही. ही घटना 22 एप्रिल रोजी घडली हाेती. न्हयबाग-पेडणे येेथे एक महिला मृतावस्थेत सापडली होती.
मात्र, ती महिला कोण आणि तिचा खून कुणी केला याचा तपास अजून लागू शकला नाही. 11 एप्रिल रोजी अशीच घटना ओल्ड गोवा परिसरात झाली हाेती. तलीफ लोकरे या इसमाने दारुच्या नशेत आपल्याच पत्नीचा खून केला.
जून 3 रोजी थिवी येथे जॉनिता डिसौझा या 30 वर्षीय महिलेचा तिच्याच सासऱ्याकडून खून झाल्याची घटना नोंद झाली आहे. अन्य दोन घटना बाणस्तारी व पर्वरी येथे घडल्या. (याचा उल्लेख वर करण्यात आला आहे)
गोव्यात परप्रांतीयांचे प्रमाण बर्याच माेठ्या प्रमाणावर वाढले आहे आणि बहुतेक राज्यातील गुन्हेगारी प्रकरणात परप्रांतीय असल्याचे दिसून आले आहे. या परप्रांतीय कामगारांकडून होणारे गुन्हे ही गंभीर बाब असून सरकारने यासंबंधी काही तरी ठोस उपाययोजना अंमलात आणण्याची गरज आहे.
बीना नाईक, महिला काँग्रेस अध्यक्ष
चाेरीच्या उद्देशाने एकमेव खून
यंदा ज्या 21 खुनांच्या घटना घडल्या त्यापैकी फक्त एकमेव खून हा चोरीच्या उद्देशाने केल्याचे उघड झाले आहे. 8 फेब्रुवारी राेजी डॉ. निशांत भारत या बिहारी डाॅक्टरचा बेताळभाटीत चार जणांनी खून केला होता. घरातील रक्कम, लॅपटाॅप व गाडी चोरण्याच्या उद्देशाने हा खून झाल्याचे कोलवा पोलिसांनी नमूद केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.