पणजी: गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) कारभारावरून आणि अलीकडेच समोर आलेल्या ऑडिट अहवालावरून क्रीडा वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. माध्यमांशी संवाद साधत ५० कोटींच्या गैरव्यवहार आरोपांवर कडक भूमिका घेत दोषींवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत संघटनेचे सरचिटणीस सय्यद माजीद, सचिव तुळशीदास शेट्ये, अध्यक्ष महेश देसाई आणि उपाध्यक्ष परेश फडते यांची उपस्थिती होती. माजीद यांनी स्पष्ट केले की, गोवा क्रिकेट संघटनेच्या निवडणुका १६ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडल्या, ज्यामध्ये विद्यमान म्हणजेच आमच्या पॅनेलने ६ विरुद्ध शून्य अशा फरकाने विजय मिळवला. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे संघटनेचा ताबा घेण्यात आला.
सध्या चर्चेत असलेला ऑडिट अहवाल हा एप्रिल २०२५ ते मार्च २०२५ आणि एप्रिल २०२५ ते २७ डिसेंबर २०२५ पर्यंत कालावधीतील आहे. मात्र, विद्यमान मंडळाने संघटनेचा ताबा घेतल्यापासून आमच्या हातात केवळ तीनच महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. हा अहवाल आणि त्यातील मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य तो युक्तिवाद व अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजीची तारीख दिली आहे. त्यामुळे या तारखेनंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील, कारण सध्या हे न्यायालयीन प्रकरण आहे.
जुन्या पदाधिकाऱ्यांनी २० वर्षे काय केले?
आम्ही ताबा घेतल्यापासून आतापर्यंत केवळ १५ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि प्रत्येक खर्च प्रत्यक्ष कामातून दिसून येतो, असा दावा सरचिटणीस माजीद यांनी केला. गेल्या २० वर्षांत जुन्या पदाधिकाऱ्यांनी काय केले? काहीच झाले नाही आणि झाले असेल तर त्यांनी ते जनतेसमोर दाखवावे, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
...तर कायदेशीर तक्रार दाखल करणार
ऑडिट रिपोर्टमधून सुमारे ५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याच्या दाव्यावर आणि ‘हे पैसे कसे वसूल करणार आणि कोणती कारवाई होणार?’ या प्रश्नावर उत्तर देताना माजीद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, की जर हा गैरव्यवहार सिद्ध झाला, तर जे कोणी दोषी किंवा आरोपी असतील, त्यांच्याविरोधात तात्काळ तक्रार दाखल केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.