बागा येथील मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी हे प्रक्रियेशिवाय थेट खाडीत सोडले जात आहे. या प्रकल्पाकडून प्रदूषण मापदंडाचे उल्लंघन होत असल्याने तो ताबडतोब बंद करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी साळगाव येथील गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे चेअरमन तसेच सदस्य सचिवांना घेराव घालत केली.
मुळात हा प्रकल्प घरगुती सांडपाण्यासाठी आहे, परंतु येथे औद्योगिक व व्यावसायिक सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेस शिष्टमंडळाने शुक्रवारी गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळ अध्यक्षांची भेट घेतली. या भेटीत बागा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणाऱ्या तेथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळात अमरनाथ पणजीकर, लॉरेन्सो सिल्व्हेरा, विवेक डिसिल्वा, एव्हर्सन वालीस, वीरेंद्र शिरोडकर, विजय भिके, मुक्तमाला शिरोडकर, अतुल नाईक, जॉन नाझारेथ, प्रणव परब, सोनल मालवणकर, रामकृष्ण जल्मी, राजन कोरगावकर आणि इतरांचा समावेश होता.
बागा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कोणाच्याही सल्लागाराविना सुरू आहे, तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे दुर्लक्ष करीत आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने बंद करावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे नेते विवेक डिसिल्वा यांनी केली.
सांडपाणी नियंत्रणावर प्रदूषण मंडळ अपयशी ः कॅ. फर्नांडिस
गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी बागा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला दिलेल्या परवानगीच्या वैधतेची कोणतीही नोंद त्यांच्याकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप सरकारची जनतेच्या आरोग्याबाबत आणि मत्स्य जीवांविषयीची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्याही वैज्ञानिक प्रक्रियेशिवाय सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सांडपाणी प्रकल्प आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या टँकरवर सोडली असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियतो फर्नांडिस यांनी केला आहे.
नद्या, भातशेती प्रदूषित
राज्यातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर तसेच सांडपाणी वाहतूक करणाऱ्या टँकरवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कोणतेही नियंत्रण नाही. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच सांडपाणी वाहून नेणारे टँकर यांनी अवलंबलेल्या पद्धतीबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळ अनभिज्ञ आहे.
दूषित व सांडपाणी नदी पात्रात सोडले जात असल्याने नद्या आणि भातशेती प्रदूषित झाली असल्याचे काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.