Goa Tourism Canva
गोवा

गोव्यात येऊन 'काहीही' करून चालणार नाही! पर्यटकांनी निसर्ग पाहावा, संस्कृती समजून घ्यावी; संपादकीय

गोमन्तक डिजिटल टीम

‘जे पेराल ते उगवते’, हा न्याय कुठे चुकलेला नाही. पर्यटन वृद्धिंगत करण्याच्या मुखवट्याखाली बेकायदा धंदे, दुष्कृत्यांना मिळणारे छुपे प्रोत्साहन समाजस्वास्थ्याच्या क्षयास काळ ठरले नाही तरच नवलच! समाज पोखरणारी कीड पोसल्यावर वेदनादायक ज्वर अटळ आहे.

पर्यटन हंगामाच्या प्रारंभी घडलेल्या तीन घटनांमुळे पर्यटन नकाशावरील लकाकणाऱ्या कळंगुटमधील पर्यटनाचा भेसूर चेहरा अधिकच काळवंडला आहे. पहिल्या घटनेला ड्रग्जची किनार आहे. शॅकचालक आणि पेशाने डॉक्टर असणाऱ्या पर्यटकांत हाणामारी झाली. परस्पर विरोधी तक्रारी झाल्या. पर्यटकांनी ड्रग्जसेवन केल्याचा संशय स्थानिक शॅकचालक महिलेने व्यक्त केलाय. तो खरा मानल्यास ड्रग्ज पर्यटकांकडे आले कोठून?

दुसरा प्रकार अधिक धक्कादायक. ‘गरबा’ कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या युवतींना पर्यटकांच्या आंबट नजरा आणि अश्लाघ्य वर्तनाचा सामना करावा लागला. गिधाडासम प्रवृत्ती बळावलेल्या पर्यटक तरुणांनी स्थानिक मुलींची छेड काढली.

तिसरी आगळीक एका क्लबमध्ये घडली. टाऊट्स-पर्यटक-बाऊन्समध्ये वाद होऊन, दोघा स्थानिकांना जबर मारहाण झाली. इतके घडल्यावर लोकांचा उद्रेक होणे स्वाभाविक होते. नेहमीप्रमाणे सरपंच सिक्वेरा, आमदार लोबो गळे काढून पुढे आले. आपण स्थानिकांसोबत असल्याचा आव त्यांनी आणला.

वास्तविक, अशा दुतोंडी लोकप्रतिनिधींमुळे स्थानिकांचे जगणे अवघड बनले आहे. काळ्या धंद्यांना प्रोत्साहन देण्यात हेच लोकप्रतिनिधी पुढे असतात. बटबटीत प्रकार समोर आल्यावर, पोलिसांत तक्रार झाल्यावरच गैरप्रकारांना वाचा फुटते व पुढे चर्वितचर्वण होते. कित्येक प्रकार दाबले जातात. कळंगुट, बागा, हणजूण पट्ट्यातील लोकांचे विकृत पर्यटनामुळे जिणे हराम झालेय हे खरे!

गोव्यात काहीही केले तरी चालते, असा समज बळावलाय. राजकीय व्यवस्थेने तो पोसण्याचे काम व्यवस्थित केले आहे. ‘टीटोज लेन’चे देशी पर्यटकांना प्रचंड आकर्षण आहे. माणसातील विकृती तिथे जागी होते. दुर्दैवाने, गोव्यात ‘वेश्या’ सहज मिळतात, असा समज दृढ झाला आहे.

गुगलवर ‘गोवा कॉलगर्ल’ नावाने शेकडो संकेतस्थळे पर्यटकांमधील आंबट वृत्तीला जणू आमंत्रण देतात. अशा संकेतस्थळांवर कारवाईसाठी कधीही प्रयत्न झालेले नाहीत. इथे येण्यापूर्वीच दूषित दृष्टिकोन पोसला जात असेल तर त्याचे परिणाम घातकच ठरणार. ‘कॉलगर्ल’च्या हेतूने स्थानिक महिला, मुलींना विचारणा करण्यापर्यंत पोहोचलेली आंबटशौकीनांची मजल निरुपयोगी सरकारी यंत्रणांच्या षंढत्वाचा परिपाक आहे. हणजूण येथील ‘कर्लिस’नामक जगविख्यात शॅक ड्रग्जचे कोठार निघाले, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.

कळंगुट भागात भूछत्राप्रमाणे मसाज पार्लर उगवतात. त्यांची तपासणी होत नाही. झालाच तर तो फार्स असतो. तेथे बिनबोभाट देहविक्रय व्यवसाय चालतो, असे आरोप सातत्याने होतात. त्याद्वारे टॉट्सनीही आपले जाळे अधिक घट्ट विणले, त्यांचा जाच अधिक वाढला. जागोजागी दिसणारे बाऊन्सर काळ्या धंद्यांना संरक्षण पुरवतात.

आसगावात घर पाडण्याच्या प्रकारानंतर बाऊन्सर नोंदणीची सरकारला आठवण झाली; प्रत्यक्षात काही कार्यवाही होत नाही. कळंगुटमध्ये अनेक डान्सबार आहेत, कधीतरी कारवाईचे नाटक होते. किनारी भागातून काळ्या धंद्यांतून कोट्यवधींची माया जमा होते. त्यासाठीच हणजूण, कळंगुट पोलिस ठाण्यांत वर्णी लावण्यासाठी थैला रिकाम्या करण्यास अधिकारी तयार होतात.

किनारी भागात रात्रीच्या वेळी ‘आयआरबी’ पोलिस तैनात करा, असा सूर मायकल लोबो यांनी आळवला आहे. याच मायकलना नियमांची अंमलबजावणी करणारे वाहतूक पोलिस त्रासदायक वाटतात. आता लोकांनी आक्रोश केल्यावर लोबो यांना पोलिस आठवत आहेत. हेच लोबो ‘सनबर्न’साठी पायघड्या घालण्यास तयार आहेत, जिथे ड्रग्जचा सर्रास वापर होत असल्याचा आरोप होतो. भ्रष्ट लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या संगनमताने बाहेरच्या राज्यांतील धेंडांनी गैरधंदे थाटले आहेत. लक्षात घ्या, आगळीक झाल्याने एक क्लब सील करून काहीही साध्य होणार नाही.

स्थानिकांना सुरक्षितता वाटावी व त्याचवेळी गोव्यात येऊन काहीही करून चालणार नाही, अशी पर्यटकांत जाणीव निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. दुहेरी पातळीवर काम होण्यासाठी सरकारला धोरणात्मक बदल स्वीकारावे लागतील. पर्यटकांनी गोव्यात निसर्ग पाहावयास यावे, संस्कृती समजून घ्यावी, अन्न संस्कृतीचा आस्वाद घ्यावा. पर्यटकांची अभिरुची घडविण्याचे दायित्व सरकारचे आहे. हीन अभिरुचीचे पर्यटक हे सरकारच्या विकृत पर्यटन धोरणाचेच फलित आहे. दर्जेदार पर्यटक यावेत यासाठी सरकारने नेमके काय केले आहे, ते एकदा स्पष्ट करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: परप्रांतीयांचा मुद्दा तापणार; मुख्यमंत्री सावंतांनी थेटच सांगितलं, 'प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी'

Automated vacuum Sewer: आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापन करणारे गोवा ठरले पहिले राज्य!

Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

Baga Crime: गोव्यात पर्यटकांचा धुडगूस! स्थानिकांना मारहाण; संतप्त जमावाचा पोलिसांना घेराव

Goa History: पुरातन काळातील मुंडारींचा वारसा सांगणारी 'गावडा संस्कृती'

SCROLL FOR NEXT