Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: कोळशाचा विषय पुन्‍हा पेटला, मुख्‍यमंत्री-सिक्‍वेरांच्‍या उत्तरातील तफावतीमुळे विरोधकांचा हंगामा! कामकाज 10 मिनिटं स्‍थगित

Goa coal controversy: जिंदाल, अदानीसह राज्‍यात कोळसा हाताळणी करणाऱ्या कंपन्‍यांनी मर्यादा ओलांडल्‍याच्‍या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍या आरोपांबाबत खुद्द पर्यावरणमंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांनीच कबुली दिली.

Sameer Amunekar

पणजी: जिंदाल, अदानीसह राज्‍यात कोळसा हाताळणी करणाऱ्या कंपन्‍यांनी मर्यादा ओलांडल्‍याच्‍या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍या आरोपांबाबत खुद्द पर्यावरणमंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांनीच कबुली दिली. त्‍यामुळे आक्रमक झालेल्‍या विरोधकांनी प्रश्‍नोत्तराच्‍या तासाला सभापतींसमोरील हौद्याकडे जाऊन ‘आम्‍हाला कोळसा नको’ची नारेबाजी सुरू केली. सभागृहातील वातावरण तंग झाल्‍याने सभापतींनी कामकाज दहा मिनिटे स्‍थगित ठेवले.

विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी प्रश्‍नोत्तराच्‍या तासाला कोळशाचा विषय उपस्‍थित केला. कोळसा वाहतुकीसंदर्भात घेतलेल्‍या सुनावणीवेळी स्‍थानिकांनी नोंदविलेले आक्षेप तसेच किनारी क्षेत्र व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने (सीझेडएमए) पाठवलेले पत्र राज्‍य सरकारने पर्यावरण मंत्रालयास पाठवले नसल्‍याचा दावाही त्‍यांनी केला. त्‍यावर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, राज्‍यातील कोळसा हाताळणीत वाढ झालेली नाही असे म्‍हणत, स्‍थानिकांचे आक्षेप आणि ‘सीझेडएमए’चे पत्र पर्यावरण मंत्रालयास पाठवून दिल्‍याचा दावा केला.

परंतु, पर्यावरणमंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांनी राज्‍यातील कोळसा हाताळणीच्‍या मर्यादेचे काही कंपन्‍यांनी उल्लंघन केले असून, त्‍यासंदर्भातील फाईल ॲडव्‍होकेट जनरलांकडे असल्‍याचा निर्वाळा दिला. त्‍यामुळे विरोधी आमदार आणखीनच आक्रमक झाले.

त्‍याचवेळी आपल्‍या सरकारने थकीत हरित करांपैकी ३४ कोटींची रक्‍कम वसूल केल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. परंतु, मुख्‍यमंत्र्यांच्‍या उत्तराकडे दुर्लक्ष करीत विरोधी आमदारांनी सभापतींसमोरील हौद्याकडे धाव घेत, ‘आम्‍हाला कोळसा नको’ची नारेबाजी देण्‍यास सुरुवात केल्‍याने सभागृहातील वातावरण तंग झाले.

४ हजार कोटींचा घोटाळा

‘जेएसडब्‍ल्‍यू’ कंपनीला २०१३ मध्‍ये पाच दशलक्ष मेट्रीक टन कोळसा हाताळणीस परवानगी दिली होती. परंतु, दोन ते तीन वर्षांत या कंपनीने ही मर्यादा ओलांडत दुप्‍पट कोळशाची हाताळणी केली. नंतर इतर कंपन्‍यांनीही कोळसा हाताळणीची मर्यादा ओलांडली. पण, त्‍यासाठी राज्‍य सरकारने आकारलेला हरित कर भरलेला नाही. ‘जेएसडब्‍ल्‍यू’ने तर २०१३ पासून हरित कर भरलेला नाही. हा सुमारे चार हजार कोटींचा घोटाळा असून त्‍याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आलेमाव यांनी केली.

कोळसा वाहतुकीत वाढ : रेल्वे

पणजी: दक्षिण-पश्चिम रेल्वेने कोळसा वाहतुकीत एप्रिल ते जून २०२५ दरम्यान तब्बल १३.४ टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २.९३ दशलक्ष टन कोळसा रेल्वेने वाहून नेला होता. यंदा ३.३२ दशलक्ष टन कोळसा वाहून नेण्यात आला आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेचे हुबळी येथील जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमडी यांनी ही माहिती दिली. मुरगाव बंदरात कोळसा उतरल्यानंतर तो कर्नाटकात रेल्वेने नेला जातो. शिवाय लोहखनिजाची वाहतूक ६.४१ दशलक्ष टन इतकी झाली असून, ती मागील वर्षाच्या तुलनेत १५.८ टक्के अधिक आहे.

‘गोमन्‍तक’ने फोडली होती वाचा

अधिवेशनातील चालू आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी ‘गोमन्‍तक’ने जिंदाल, अदानीसह इतर २६ कंपन्‍यांनी सरकारचा १७८.३५ कोटींचा हरित कर (ग्रीन सेस) थकवल्‍याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्‍यावरून सरकारला धारेवर धरत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘गोमन्‍तक’ही सभागृहात झळकावला होता. त्‍यानंतर शुक्रवारी त्‍यांनी कोळसा हाताळणीचा विषय सभागृहात आणून कोळसा हाताळणीत वाढ झाल्‍याचा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT