Goa CM Pramod Sawant And Tourim Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री अडचणीत सापडणार? रामा काणकोणकरांच्या आरोपानंतर मारहाण प्रकरणाचा तिढा वाढला

Rama Kankonkar Assault Case Goa: रामा काणकोणकर यांनी मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्याविरोधात केलेल्या आरोपांचा तपास करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Pramod Yadav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. मारहाण प्रकरणात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे नाव घेतले आहे. सत्ताधाऱ्यांनी मात्र काणकोणकरांच्या आरोपात राजकारण असल्याचा आरोप केलाय. तर, विरोधकांनी गंभीर आरोपांच्या सखोल चौकशीची मागणी केलीय.

राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढणाऱ्या रामा काणकोणकर प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. काणकोणकरांनी मारहाण प्रकरणात मुख्यमंत्री सावंत आणि पर्यटनमंत्री खंवटे यांचे नाव घेतले.

पोलिसांच्या तपासावर देखील त्यांनी संशय व्यक्त केला. मास्टरमाईंडला अटक होत नाही. तोपर्यंत पोलिसांच्या तपासावर संशय असल्याचे रामा म्हणाले.

कोणा राजकीय नेत्यावर संशय आहे का? असा प्रश्न देखील पोलिसांनी विचारला नाही, याबाबत रामा यांनी आश्चर्य व्यक्त केले. डिस्चार्जनंतर माध्यमांशी संवाद साधताना काणकोणकरांनी घटनेबाबत मत व्यक्त केले होते.

रामा काणकोणकरांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांनी त्याचे खंडन केले आहे. “रामानी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही. अशाप्रकारच्या आरोपामागील कारणाचा पोलिसांनी शोध घ्यायला हवा. पीडित आणि त्याच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच जबाब बदलेले आहेत”, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले.

“संपूर्ण तपास पारदर्शकपणे करण्यात आला असून, त्यात राजकीय हस्तक्षेप नाही”, असेही तानावडे म्हणाले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या आरोपांचे खंडन करताना, “रामा यांनी २३ दिवसांनंतर केलेल्या आरोपांमागे कोण आहे? त्यांना मुख्यमंत्री आणि माझे नाव घेण्याच्या सूचना कोणी दिल्या याचा शोध घेणे आवश्यक आहे”, असे खंवटे म्हणाले.

पोलिसांनी देखील याप्रकरणी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. “रामा यांचा जबाब व्हिडिओ पद्धतीने रेकॉर्ड करण्यात आला असून, त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेतले नाही. तपासाबाबत पोलिसांवर कोणताही दबाव नाही. गोमेकॉत त्याला तंदुरुस्त जाहीर करुन देखील उशीराने जबाब दिला. त्यांना कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेता आले असते”, असे पणजी पोलिस ठाण्याचे सुदेश नाईक म्हणाले.

“याप्रकरणाचा पारदर्शकपणे तपास सुरु आहे. सर्व संशयितांचा कसून तपास केला जात आहे”, असे उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता म्हणाले.

रामा काणकोणकर यांच्या मारहाण प्रकरणी सरकार गंभीर आहे. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांनी राजकीय नेत्यांची घेतलेली नावे विनाकारण आणि प्रकरणाचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न दिसतो. लोक मला ओळखतात. गेल्या २५ वर्षापासून मी राजकारणात आहे. अनेक दिवसांनंतर ते असं का बोलले मला कळंत नाही. याबाबत पुन्हा सखोल तपास करण्याचे आदेश मी देईन. सरकारला आणि राजकीय नेत्यांना दोष देण्याचा हा प्रयत्न दिसतो.
डॉ. प्रमोद सावंत – मुख्यमंत्री

“रामाने जेनिटो कार्दोझवर आरोप केला आणि पोलिसांनी लगेच त्याला अटक केली. मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्र्यावर आरोप करुन चोविस तास उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. राज्यपालांनी यात लक्ष घालून पारदर्शक तपासासाठी दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा”, अशी मागणी काँग्रेस नेते गिरीश चोडणकरांनी केलीय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्या राजीनाम्याची देखील मागणी त्यांनी केलीय. तर, काँग्रेस नेते युरी आलेमाव यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसह दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

रामा यांना झालेल्या मारहाण प्रकरणी जेनिटो कार्दोझ याच्यासह इतरांना अटक करण्यात आलीय. सर्व संशयितांना १८ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

रामाच्या आरोपानंतर याप्रकरणातील तिढा आणखी वाढला आहे.पोलिसांनी देखील रामाच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचे म्हटल्याने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parra Road: 'हे झाड कधीही कोसळेल!' 2.5 वर्षांपासून दुर्लक्ष; साळगाव सरपंचांचा वन विभागाला 'अल्टिमेटम'

Gold Silver Price: धनतेरसपूर्वी सोन्याचा नवा रेकॉर्ड! भाव 1 लाख 27 हजारांच्या पार; चांदीनंही दाखवली पुन्हा चमक

KBC Viral Video: "मला नियम सांगू नका", करोडपतीच्या सेटवर बिग-बींना उलटउत्तर; 10 वर्षांच्या स्पर्धकावर नेटकऱ्यांची टीका

Goa News: 'हो' प्रस्न सोडयात! कामगार आक्रमक; शिरगावच्या बांदेकर खाणीवरील कामकाज रोखले Video

Kuldeep Yadav: टीम इंडियाचा नवा विकेट किंग! कुलदीप बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा 'नंबर 1' गोलंदाज VIDEO

SCROLL FOR NEXT