Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, तवडकर- गावडे वाद कशासाठी?

Khari Kujbuj Political Satire: भाजपचे नेते सिद्धार्थ कुंकळकर यांनी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा नेला आणि त्यांच्या फलकावर शाई फेकली म्हणे.

Sameer Amunekar

तवडकर- गावडे वाद कशासाठी?

राजकारणी खास करुन सत्ताधारी राज्यकर्ते एखादी गोष्ट आपल्यावर शेकते, असे दिसता क्षणीच लोकांचे मन दुसरीकडे वळविण्यासाठी अनेक क्लृप्ती करताना दिसतात. हेच पहा ना. रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरण ताजे असताना मंत्री रमेश तवडकर काणकोण सोडून मडगावमध्ये येऊन पत्रकार परिषद घेतात. माजी मंत्री गावडे यांच्यावर टीकास्त्र सोडतात. तवडकर व गावडे यांचे एकमेकांशी पटत नाही, हे सर्वांना माहीत आहे व हे असे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्याच प्रमाणे तवडकर यांनी जी टिका केली. त्यात नावीन्य असे काहीच नाही. आता जे गावडेबद्दल बोलतात तेच आगोदरही बोलून गेले आहेत. मग आताच ही टिका कशाला? असा प्रश्न कोणालाही सहज पडणे शक्य आहे. काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरण सरकारवर शेकण्याची शक्यता असल्याने लोकांचे मन दुसरीकडे वळविण्यासाठी तर सरकारचा हा प्रयत्न तर नसेल ना? अशी शंका लोकांच्या मनात डोकावू लागली आहे. ∙

...फुकटात करमणूक!

सध्या रमेश तवडकर व गोविंद गावडे या आजी-माजी मंत्र्यांकडून जाहीरपणे जी परस्परांवर चिखलफेक होत आहे, ती लोकांसाठी मात्र फुकटात करमणूक ठरत चालली आहे, असे असले तरी सत्ताधारी भाजपासाठी ती चिंतेची बाब ठरली आहे. एकीकडे रामा काणकोणकर प्रकरणावरून विरोधक संघटीत होत असताना भाजपामध्ये हे काय चालले आहे? पक्ष नेतृत्व बघ्याची भूमिका कशी घेऊ शकते, या चर्चेने जोर पकडला आहे. यापुढे आपण गावडे यांनी केलेल्या आरोपांना आपण उत्तर देणार नाही, असे जरी तवडकर यांनी म्हटलेले असले तरी प्रकरण इतक्या स्तरावर पोचले आहे, की त्यांच्या हातात काहीच राहिलेले नाही. या चिखलफेकीमुळे लोकांची फुकटात करमणूक होते आहे, ते मात्र खरे.

...ही भाजपची संस्कृती का?

भाजपचे नेते सिद्धार्थ कुंकळकर यांनी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा नेला आणि त्यांच्या फलकावर शाई फेकली म्हणे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना हीच का भाजपची संस्कृती असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विचारले, तर ते मूग गिळून गप्प बसले म्हणे. काँग्रेसवालेही आता त्यांना ‘ही कसली संस्कृती?’ असं विचारत आहेत. यावर विरोधकांना दामू नाईकांकडून उत्तराची अपेक्षा आहे. आता ही भाजपची संस्कृती आहे, की नाही, हे दामूच सांगू शकतील. पण कधी? या प्रतीक्षेत सर्वजण आहेत.

प्रमोद महाजन यांची आठवण

दिगंबर कामत यांनी आपल्या सत्कारप्रसंगी भाजपचे माजी सरचिटणीस प्रमोद महाजन यांची आठवण काढली. जेव्हा आपण प्रथमच निवडणूक लढवत होतो, तेव्हा प्रमोद महाजन आले होते. त्यांनी आकेत पडलेले खड्डे व अरुंद रस्ते पाहिले होते. आपल्या भाषणात महाजन यांनी विनोदी भाषणात सांगितले, या रस्त्यावर पत्नीला पाठीमागे बसवून स्कूटरवरून जाता येणार नाही. प्रत्येक वेळी आपल्याला मागे पत्नी आहे, की खाली पडली, हे पाहण्यासाठी मागे हात लावून पहावे लागणार. त्याचे म्हणणे आपण लक्षात ठेवले व आकेचे रस्ते गुळगुळीत व रुंदही केले, असेही दिगंबरबाब सांगतात. मात्र त्यांना स्व. महाजनाची किंवा भाजपच्या नेत्यांची आठवण भाजपमध्ये पुर्नप्रवेश केल्यावर येत आहे. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टिकाच केली असेही लोक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

डॉ. रमेशरावांनी कोणते संशोधन केले?

‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड मारू नयेत’ अशा आशयाचा एक सिनेमातील संवाद आपण ऐकलाच असणार. माजी मंत्री व एसटी नेते गोविंद गावडे व विद्यमान मंत्री व एसटी नेते रमेश तवडकर एका मेजावर आरोप-प्रत्यारोपाचा खेळ खेळून स्वतःचेच हसे करून घेत आहेत. हा ‘तू तू मै मै’च्या वादामुळे इतरांचे मात्र बरेच मनोरंजन व्हायला लागले आहे. तवडकरांनी गोविंदाला शहाजहान म्हणून हिणवले. प्रमाणपत्रे नसलेला कलाकार म्हणून डिवचले, अशी टीका केल्यावर गोविंद गप्प थोडाच बसणार. त्याने सरळ रमेश तवडकर यांच्या नावापुढे लावत असलेल्या डॉक्टर पदवीलाच हात घातला. तावडकरांनी कोणत्या विद्यापीठात कोणत्या विषयात पीएचडी पदवी घेतली. रमेश यांच्या पीएचडीला गाईड कोण होता? दीक्षांत समारंभ कधी झाला? याची माहिती जनतेला द्यावी, असे आव्हान रमेश यांना करून गोविंद गावडेने रमेशला खिंडीत पकडले आता पाहूया डॉ. रमेश कोणती पीएचडी दाखवितात.

आवळा देऊन कोहळा...

बोट पकडायला दिले की हात धरायचा, ही कर्नाटकची रीत अनेक राज्‍यांना माहिती झाली आहे. पाणी प्रश्‍‍नावरून कर्नाटकसोबत व्‍यवहार करताना नजीकची राज्‍ये ताकही फुंकून पितात. विशेष म्‍हणजे, पाण्‍याच्‍या मुद्यावर सर्व पक्षीय एकजूट दाखवतात. वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनाही तो अनुभव आला असावा. पेडणेत सध्‍या ओंकार हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. त्‍याचा बंदोबस्‍त करणे गरजेचे बनले असताना वनमंत्री राणे यांनी कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांची भेट घेऊन, हत्तीची समस्‍या सोडविण्‍यासाठी सहकार्याची विनंती केली. खंड्रे यांनी सहकार्याची हमी दिली; पण तत्‍काळ कळसा-भांडुरा प्रकल्‍पांसाठी गोवा सरकारने सहकार्य करावे, अशी त्‍यांनी अपेक्षा व्‍यक्‍त केली. ह्याच म्‍हणतात, आवळा देऊन कोहळा काढणे.

जेनिटो आणि राजकारणी!

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पोलिसांनी रविवारी सराईत गुन्‍हेगार जेनिटो कार्दोजोला अटक केली. राज्‍यातील गुन्‍हेगारी विश्‍‍वासात प्रसिद्ध असलेल्‍या जेनिटोचे अनेक राजकारण्‍यांशीही संबंध असल्‍याचे यापूर्वीच स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यातच अनेक आंदोलनांमध्‍ये सहभागी होत रामा काणकोणकर यांनी अनेक राजकारण्‍यांशी वैर घेतले होते. त्‍यामुळे जेनिटोच्‍या मदतीने कुठल्‍या राजकारण्‍याने तर हा हल्ला घडवून आणला नसेल ना? तसेच असेल तर पोलिस या प्रकरणाच्‍या मुळाशी पोहोचतील का? असे प्रश्‍‍न अनेकांकडून विचारण्‍यात येत आहेत...∙

दिगंबरना वीज खाते हवे?

कुठलाही समारंभ घ्या आपण वीज खाते कसे चालवले. या खात्याचे सोने कसे केले, याचे रसभरीत वर्णन दिगंबरबाब करीत असतात. आता त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पीडब्ल्यूडी खात्याची जबाबदारी सोपवली आहे. हे खाते भ्रष्टाचार, बेकायदेशीरपणा, खंडणी यासाठी प्रसिद्ध आहे. त्यातून या खात्याला दिगंबरबाब बाहेर काढतील का? हा एकच प्रश्न सध्या लोकांच्या तोंडी आहे. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना वीजमंत्रिपद देण्यात आले होते. पण त्यांचा उल्लेख ते सोईस्कररीत्या टाळतात. विद्यमान वीजमंत्री सुदीनबाब, माजी वीजमंत्री मावीन गुदिन्हो किंवा नीलेश काब्राल यांनी तरी सर्व उपकेंद्रांना भेटी दिल्या आहेत का? असे दिगंबरबाब अप्रत्यक्षपणे विचारत तर नाही ना? तसेच वीज खाते दिले असते, तर चांगले झाले असते, असे तर ते सांगू इच्छित तर नाहीत ना! हे प्रश्न लोकांच्या तोंडात घोळणे सहजिकच आहे .

... निवडणुकीत मुद्दा होऊ शकतो!

काही महिन्यांवर जिल्हा पंचायतींच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्षांनी आपापल्या परीने सुरुवात केली आहे. काहींनी उघडपणे तर काहींनी पडद्याआड पक्षीय काम सुरू केले आहे. परंतु सध्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचा सध्या कोडारकडे धावा अधिक दिसून आला आहे. कोडार येथे आयआयटी प्रकल्प प्रस्तावित आहे, सरकारने ही जागा सूचित केली आहे, परंतु त्याला पंचायतीने विरोध केला आहे. ग्रामसभेतही त्याला विरोध झाला आहे. परंतु हा विषय निवडणुकीत मुद्दा होऊ शकतो, असे मानत काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कोडारमध्ये जाऊन ग्रामस्थांना पाठिंबा देत आयआयटीला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. अजूनही कोडारच्या जागेवरील नोंदविलेल्या आक्षेपावर निर्णय झालेला नाही. परंतु हा प्रकल्प येणारच असे म्हणून राजकीय नेते जाऊन लोकांच्या सुरात सूर मिसळत विरोध करीत आहेत. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत अशा विरोधांचा प्रचारात वापर करता येऊ शकतो, त्यासाठी नेत्यांचा सध्या खटाटोप सुरू आहे, असेच म्हणावे लागेल.

दामूचे मॅनेजमेंट ...

शनिवारी मडगावात मंत्री दिगंबर कामत यांचा सत्कार झाला. नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांनी आपल्या २१ नंबर प्रभागात हा सोहळा घडवून आणला. सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी दामूने कुठलीही कसर बाकी ठेवली नव्हती. प्रभागातील सर्वांना अगत्याने आमंत्रित केले होते. कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी आपल्या खास लोकांवर जबाबदारीही सोपवली होती. दामूचे आमंत्रण व दिगंबर कामत यांचा सत्कार असल्याने या सोहळ्याला उपस्थित लक्षणीय होती. दामूही त्यामुळे मनापासून खूश झाले. त्याच्या चेहऱ्यावर ही खुशी दिसत होती बरं का!

आकेत चार इंजिनाचे सरकार!

राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून ‘डबल इंजीन सरकार’ हे शब्द सतत कानावर पडत असतात. पण ‘चार इंजिनचे सरकार’ हे शब्द प्रथमच ऐकायला मिळाले. ते सुद्धा मडगावचे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्या सत्कार सोहळ्यात. एका वक्त्याने आपल्या भाषणात चार इंजीन सरकार शब्दांचा वापर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार आके येथील नगराध्यक्ष भाजपचे, आमदार भाजपचे, राज्य सरकार भाजपचे व केंद्र सरकार भाजपचे म्हणून चार इंजीन सरकार. ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. त्याचसाठी आके भागाचा विकास जास्त गतीने होत आहे, हा त्यांचा सांगण्याचा उद्देश असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Metro in Goa: गोव्यात येतेय पहिलीवहिली 'वॉटर मेट्रो', मुरगाव ते तिसवाडी आता करा जलप्रवास; वाचा माहिती

कायदा हातात घ्याल, तर खबरदार - मुख्यमंत्री

Pakistan Khyber Airstrike: खुळ्यांची जत्रा! पाकिस्तानने आपल्याच लोकांवर टाकले 8 बॉम्ब; महिला, मुलांसह 30 जण ठार Video, Photo

Opinion: पोर्तुगीजांनी 'तिठे' उभारून बाजार भरवला, पण आज करोडो खर्चूनही विक्रेते रस्त्यावर का बसतात?

Opinion: गोव्यात 'भिवपाची गरज ना', असं गुंडांना वाटतंय; सामान्यांच्या मनात मात्र भीती!

SCROLL FOR NEXT