Chief Minister Dr. Pramod Sawant
Chief Minister Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे कृषी खात्याला मुख्यमंत्र्यांचे आदेश

दैनिक गोमन्तक

गिरीमध्ये साचलेल्या पाण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश कृषी खात्याला दिले. तसेच पाण्याचा प्रवाह नीट होण्यासाठी साकवांच्या (छोटेखानी पुलांच्या) ठिकाणी साचून राहिलेली माती काढण्याचे आदेश जलस्रोत खात्याला दिले आहेत.

मागच्या सुमारे आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने बार्देश तालुक्याला (Bardesh) झोडपल्याने गिरी, बस्तोडा, पर्वरी, साळगाव भागातील शेतजमिनींवर पाणी साचून राहिल्यामुळे विशेषत: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, तार नदीमध्ये (Tar River) पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नसल्यामुळे या भागातील रस्तेसुद्धा पाण्याने भरून वाहत आहेत. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास गिरी येथील ग्रीन पार्क हॉटेलच्या परिसराची पाहणी केली.

राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना कंत्राटदाराने शेतात मातीचा भराव टाकून दिल्याने पावसाचे पाणी तुंबून राहत असल्याने तसेच नदीला भरती आल्यानंतर शेतात घुसणाऱ्या पाण्याचा प्रवास सुरळीत होत नसल्याने तेथील एकंदर परिस्थितीचे मुख्यमंत्र्यांनी अवलोकन केले. या वेळी आमदार जयेश साळगावकर, आमदार ग्लेन टिकलो, आमदार ज्योशुआ डिसोझा, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, बार्देश तालुक्याच्या विभागीय कृषी अधिकारी संपत्ती धारगळकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, गिरीच्या सरपंच रिमा गडेकर, बस्तोडाचे सरपंच रणजित उसगावकर, जिल्हा पंचायत सदस्य रूपेश नाईक, वेरेचे सरपंच केदार नाईक, माजी मंत्री दिलीप परुळेकर, तसेच अनेक पंचाययतींचे पंच व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

येथील पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही, असे आमदार जयेश साळगावकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करताना कंत्राटदाराने स्वत:च्या मर्जीनुसार पाण्याचा प्रवाह व्यवस्थित होत असलेल्या अनेक साकवांच्‍या ठिकाणी मातीचे ढीग करून ठेवले आहेत, असेही आमदार साळगावकर म्हणाले. ज्या प्रकारे साळ व शापोरा नदीतला गाळ उपसला होता त्याच धर्तीवर तार नदीकडून ते मांडवी नदीच्या पात्रातला गाळ उपसण्याची मागणीही त्यांनी केली.

आमदार ग्लेन टिकलो (MLA Glenn Tiklo) म्हणाले, येथील रस्त्यांवर नेहमीच पाणी साचून राहते. वेळोवेळी सूचना करूनसुद्धा कंत्राटदाराने लक्ष पुरवले नाही. त्यामुळे गिरी व बस्तोडा भागातील शेतामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर व नदीचे पाणी घुसत आहे. नदीतील गाळ उपसण्याची मागणीही त्यांनी केली.

साकवांच्‍या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी जे.सी.बी. मशीनच्या मदतीने माती काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. मुसळधार पावसामुळे तिळारी कालव्यातील पाणीही बाहेर सोडल्यामुळे तार नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतातील पाणी बाहेर जात नाही. या कारणास्तव अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा तात्काळ अहवाल तयार करून सर्वप्रथम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात आपण कृषी खात्याला आदेश दिल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तार नदीतील गाळ उपसणार : डॉ. सावंत

सर्वांच्या सूचना लक्षात घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. गिरी व बस्तोडा या भागांतून वाहणाऱ्या तार नदीची साफसफाई जलस्रोत खात्यामार्फत केली जाईल. या नदीतील मागच्या अनेक वर्षांचा गाळ उपसला नाही. त्यासाठी जलस्रोत खाते व सार्वजनिक बांधकाम खाते संयुक्तपणे नियोजन करून आगामी वर्षापर्यंत या नदीतील गाळ उपसला जाईल. रस्ते पाण्याखाली आल्यामुळे जनजीवन विसकळीत झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

गिरी-नामोशी भाग पूर्णत: पाण्याखाली जाण्याचा धोका…

गिरी पंचायतीचे ज्येष्ठ पंच व माजी सरपंच फोंडू नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिले, की मागच्‍या सुमारे चाळीस वर्षांपासून पावसाळ्यात गिरी भाग पाण्याखाली असतो. नदीचे पाणी कधीच शेतात घुसत नव्हते; पण, या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे या नदीच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. अनेक भागांत शेतात मातीचा भराव टाकून पाण्याचा प्रवाह बंद केला जात आहे. या बेकायदा कृत्यांचा पंचनामा करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा येणाऱ्या काळात गिरी-नामोशी भाग पूर्णपणे पाण्याखाली येण्याचा धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

Loksabha Election 2024: काँग्रेस उमेदवार विरियातो यांच्या समर्थक महिलेने पैसे वाटल्याची तक्रार

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

SCROLL FOR NEXT