International Swimming Event Oceanman
पणजी: आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा असतानाही विविध विभागांची परवानगी न घेता स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या मुंबईच्या कपिल अरोरांवर गोवा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
प्रचंड गोंधळानंतर करंजाळे समुद्रकिनाऱ्यावरील ही स्पर्धा अखेर स्थानिक मच्छीमारांकडून बंद पाडली. स्पर्धा अर्ध्यावरच रद्द झाल्यामुळे स्पर्धेतील ‘स्टार’ अभिनेते मिलिंद सोमण यांच्यासह देशविदेशातील शेकडो स्पर्धकांचा हिरमोड झाला.
तसेच सहभागी जलतरणपटूंचे मिळून लाखो रुपये ‘पाण्यात’ गेले. मुंबई येथील डॉ. सूर्यकांत भिरुड (४४) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानुसार गोवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कोणत्याही संबंधित प्राधिकरणाकडून योग्य परवानगी न घेता ही स्पर्धा आयोजित केल्याचे या तक्रारीत रोराने सहभागींकडून स्पर्धेसाठी एकूण ३,२६,१०० रुपये नोंदणी शुल्क घेतले होते; परंतु त्यांना कोणतीही सुरक्षितता पुरवली नाही, अशा तक्रारीच्या आधारे अरोरा यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२) आणि १२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीदरम्यान असे आढळून आले आहे, की अरोराने कोणत्याही प्राधिकरणाकडून योग्य परवानगी घेतली नव्हती. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मच्छीमारांच्या मते, एक रापण करण्यास तब्बल सात तास लागतात आणि २०० हुन अधिक रापणकार बोटीवर असतात. आमच्या उपजीविकेवरच गदा आणणाऱ्या अशा बेकायदेशीर स्पर्धकांना आम्ही कधीही थारा देणार नाही, असा इशारा यावेळी मच्छीमारांनी दिला.
आयोजक कपिल अरोरा यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी, कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरिटी आणि ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’कडून परवानगी घेतली. तसेच या स्पर्धेची माहिती पोलिस तसेच पर्यटन विभागाला दिली आहे. मात्र मत्स्य उत्पादन विभागाकडून परवानगी घेतलेली नसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांनी सांगितले की, गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीला आम्ही एक लाख रुपये भरून अधिकृत परवानगी घेतली आहे. त्यामुळे मच्छीमारांचा आरोप निराधार आहेत.
या घटनेमुळे गोव्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा असूनही ती बेकायदेशीर ठरली. ही गोव्याच्या प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटन क्षेत्रातील जाणकारांनी दिली. करंजाळे येथील या घटनेने केवळ प्रशासनाच्या परवानगी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही, तर गोव्याच्या प्रतिमेलाही धक्का दिला आहे. बेकायदेशीररीत्या झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील जबाबदार कोण? असा प्रश्न पर्यटन क्षेत्रातील भागधारक करू लागले आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या गौरव आहुजा याने थेट पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटले की, माझ्या मुलाने पाचवा क्रमांक पटकाविला, पण आयोजक प्रमाणपत्र आणि पदक देण्यास आता तयार नाहीत. आम्ही चार दिवस गोव्यात राहिलो, आणि आता सर्व मेहनत पाण्यात गेली. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आहे. समुद्रात मच्छीमारांचे फिश नेट होते; पण त्याबद्दल आयोजकांनी कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. अनेक मुलांना किरकोळ आणि गंभीर दुखापती झाल्या. मुले अडकली, आम्ही आणि मच्छीमारांनी एकत्र येऊन त्यांना बाहेर काढले. आयोजक मात्र पूर्णपणे अनुपस्थित राहिले. अशा स्पर्धेसाठी परवानगी, सुरक्षा उपाय आणि जागेची तपासणी आवश्यक असते. पण, आयोजकांनी दुर्लक्ष केले. हा सरळ मुलांच्या जीवाशी खेळ होता.
करंजाळे समुद्र किनाऱ्यावर आयोजित ‘ओशेनमॅन’ स्पर्धेसाठी राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेची (एनआयडब्ल्यू) परवनागी घेतली नव्हती. आयोजकांनी आमचा परिसर वापरला मात्र त्यांना अधिकृतरित्या आम्ही परवानगी दिली नाही, असे रणजीत सिंग यांनी सांगितले.
१) मच्छीमारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की आयोजकांच्या चारचाकी गाड्या थेट किनाऱ्यावर कशा आल्या? आम्ही जर असे केले असते तर लगेच कारवाई झाली असती. मग या आयोजकांसाठी मापदंड का लागू होत नाही?
२) ट्रेडिशनल फिशरमॅन रापणकार असोसिएशनचे सल्लागार गुरुदास केरकर यांनी प्रशासनावर निशाणा साधला. ते म्हणाले की, एसी केबिनमध्ये बसून अधिकारी सह्या करतात; पण प्रत्यक्ष ठिकाणी येऊन पाहणी करत नाहीत. गेल्या शंभर वर्षांपासून हा किनारा आमच्या ताब्यात आहे. आयोजकांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती.
३) आजच्या गोंधळानंतर मच्छीमारांनी सामाजिक माध्यमांवरून संतप्त प्रतिक्रिया देताना महत्वाचा प्रश्न उपस्तित केला. एरवी मंत्री आणि आमदार लोकांच्या अडचणींसाठी पुढे येतात, पण आता कुठे आहेत? त्यांनाही काही लाभ झाला आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला.
१. रविवारी सकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान मच्छीमार करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर गेले असता त्यांना खुल्या समुद्रातील जलतरण स्पर्धा सुरू असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी आयोजकांकडे परवानगीबाबत विचारणा केली. मात्र, परवानगी दाखवण्यास आयोजकांनी नकार दिला. उलट आम्हालाच त्यांनी धमकावले, असे एका महिला मच्छीमाराने सांगितले.
२. या समुद्रकिनाऱ्यावर १९ रापण आहेत. प्रत्येक मच्छीमाराला १८ दिवसांनी एकदाच जाळे टाकण्याची संधी मिळते. रविवार हा आमचा हक्काचा दिवस होता. आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेत जाळे टाकत असताना अचानक ३०० जलतरणपटू समुद्रात उतरले आणि आमच्या जाळ्यात अडकले. काहींना दुखापती झाल्या.
सहभागी झालेल्या साऱ्यांना स्पर्धा का पूर्ण करू दिली नाही, या संदर्भात आयोजकांचे अधिकृत काय म्हणणे आहे, याची मी प्रतीक्षा करतो आहे.मिलिंद सोमण
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.