Goa Cabinet Reshuffle
पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत दाखल झाल्याने राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता ठळक झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्यासंदर्भातील घोषणा होईल असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत काही महत्त्वाच्या राजकीय बैठका घेतल्या असून, या भेटींमुळे गोव्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे
भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांसोबत झालेल्या या चर्चामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध कयास लावले जात आहेत.
मंत्रिमंडळात सध्या बारा मंत्री आहेत, ज्यांपैकी काहींना पदावरून हटवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा सुरू आहे. यामुळे भाजपच्या अंतर्गत गटात राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. सत्ताधारी पक्षात मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या नेत्यांनी दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याचेही समजते.
नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?
राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२७च्या गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला कार्यक्षम आणि जनाधार असलेल्या नेत्यांना पुढे आणण्याची आवश्यकता आहे. शिवाय, सरकारच्या धोरणांवरून काही मंत्र्यांवर जनतेत नाराजी असल्याचे संकेतही मिळाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान देऊन जनतेचा विश्वास वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री किंवा भाजपने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
नड्डा, शहा, मोदींसमवेत होणार चर्चा
डॉ. प्रमोद सावंत हे काही दिवसांपासून मंत्रिमंडळ फेरबदल करण्याच्या शक्यतेबद्दल सूचक विधाने करत होते. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांच्या राजकीय बैठका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीचा उद्देश गोव्यातील मंत्रिमंडळाची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय धोरणांवर चर्चा करणे हा होता, असा अंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.