सभापती रमेश तवडकर साहेब मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी एक प्रमुख दावेदार आहेत, अशी चर्चा आहे. आपण सभापतिपदी समाधानी व आनंदी आहे, असे तवडकर साहेब सांगतात. सभापती या नात्याने आपला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री व आमदार यांच्याकडे संपर्क येतच असतो, असेही ते सांगतात. तरीसुद्धा अलीकडच्या काळात ते जे आपले मनोगत व्यक्त करतात, ते पाहता त्यांना स्वतः मंत्रिमंडळात जाणे आवडेल, असेच दिसते. सुरुवातीला १५ दिवसात मंत्रिमंडळ बदल होणार, असे त्यांनी सांगितले. कोणा कोणाला मंत्रिपद मिळेल, हे सुद्धा त्यांनी सांगून टाकले. नंतर एका समारंभात त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नंतर प्रामाणिक कार्यकर्ते दिसत नसल्याचे वक्तव्य केले. गोव्याची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली जाते, त्यामुळे पालक आपल्या मुलांना गोव्यात पाठविण्यास धजत नाहीत, असे एका कार्यक्रमात सांगितले. त्यांच्या विधानात जर काही प्रमाणात सत्यता आढळत असली तरी त्यांचा पक्षावर व सरकारवर अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याचा तर प्रयत्न नाही ना? अशीही चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. ∙∙∙
भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष हे मागील काही आठवड्यांपूर्वी गोव्यात येऊन गेले. त्यांना माजी मंत्री पांडुरंग मडकईकर भेटले आणि भेटून परतताना त्यांनी राज्य सरकारची झोपच उडवली. त्यांनी एका मंत्र्यांला आपण छोट्या कामासाठी लाखो रुपये दिल्याचा आरोप केला. त्यानंतर दोन दिवसांत मडकईकर यांनी ‘यू-टर्न’ घेतला आणि आपण ते कामाचे शुल्क दिल्याचे सांगितले. असो याविषयी सामाजिक कार्यकर्ते न्यायालयात गेले आहेत. आता एका सामाजिक कार्यकर्त्याने एक व्हिडिओ आपल्या समाजमाध्यमाच्या अकाऊंटवर अपलोड केला आहे. त्यात संबंधित मंत्र्यासाठी ‘कलेक्टर'' (आर्थिक व्यवहाराचे काम) म्हणून काम करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्या कलेक्टरने आपल्या कारच्या काचा काळ्या केल्या होत्या आता त्या कारचे म्हणे ‘टिन्टेड` काढली आहे. मडकईकर यांनी याच प्रकरणावर एका खासगी वृत्तवाहिनीकडे मत व्यक्त करताना जगभरात भ्रष्टाचार कसा चालतो याची उदाहरणे दिली आहेत, त्यांचे म्हणणे भ्रष्टाचार केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे, त्यावर लक्ष ठेवले जाते. तथापि, गोव्यात ते घडत नाही. त्याशिवाय मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे नाव घेत ते खूप चांगले मित्र आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीत आम्ही एकमेकांना पैसे उधार देतो, हे सांगण्यामागील गुपित मडकईकरांनी कधीतरी उघड करावेच. ∙∙∙
गोवा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी प्रतिज्ञा पत्रावर माहिती देण्यास प्राध्यापक पुढे येणार का? असा प्रश्न चर्चिला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती आर.एम. एस. खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या प्रकरणाची माहिती शपथ पत्रावर द्यावी, असे आवाहन प्राध्यापकांना केले आहे. असे प्रकार घडू नयेत, विद्यापीठासाठी ते कलंक आहेत असे अनेकजण सांगतात. त्यापैकी कितीजण अशी माहिती पुढे देण्यासाठी पुढे येतात हे पाहणेही औत्स्युक्याचे ठरले आहे. ∙∙∙
सुरेश वाडकर हे देशातील एक प्रसिद्ध गायक आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे अनेक वर्षांपासून मैत्री असल्याचे ते सांगतात. दामूला ते दामूभय्या असे म्हणतात. दामूभय्या प्रदेशाध्यक्ष झाल्याचे वाडकर यांना आनंद झाल्याचे जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यावरून स्पष्ट होत आहे. वाडकर यांनी दामूभय्याचे गुणगान गायले आहेत. तो चांगला माणूस, प्रेमळ, मदतगार, गोव्याच्या विकासाचा विचार करणारा, चांगले कवी, कलाकार पिंडाचे, लोकांची काळजी घेणारे अशा अनेक उपाध्या वाडकर यांनी त्यासाठी वापरल्या आहेत. एखाद्या राजकारण्याचे अशा प्रकारे गोडवे गाणारे कदाचित वाडकर हे पहिलेच गायक असावेत. मध्यंतरी दामू नाईक रवींद्र भवनचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांचा अनेक अभिनेते, गायक, वादक, नाटककार, कवी, लेखक, साहित्यिक यांच्याकडे संपर्क आला. हा संपर्क दामू भय्याने कसा टिकवला आहे, हे वाडकर यांच्या या व्हिडिओने स्पष्ट होत असल्याचे त्याचे कार्यकर्ते बोलताना दिसतात. ∙∙∙
गोवा विद्यापीठ सध्या वाईट कारणांसाठी चर्चेत आहे. कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांना विद्यापीठातील गोष्टी बाहेर आलेल्या नको आहेत. त्यामुळे कार्यकारी परिषदेच्या बैठकीत काय घडले, याची माहिती तीन ओळीत देण्याचा पराक्रम त्यांनी केला. तरीही माहिती फुटायची ती फुटलीच आणि विद्यापीठ दडवू पाहत असलेल्या प्रकरणात पुरावेही आहेत, हे सर्वांना समजले. कुलपती, राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांचा आशीर्वाद असल्याने ते माध्यमांनाही माहिती कळू न देण्याची काळजी घेण्याचे ते धाडस करत असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. ∙∙∙
दिगंबरबाब कामत हे देवभक्त आहेत, हे सर्वश्रुत आहे. साईबाबाचे तर ते परम भक्त आहेत. त्यांची कित्येकदा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी वारी असतेच. तळेबांध आके येथील श्री साईबाबा मंदिराचा रौप्य महोत्सवी सोहळा चालू झाला आहे. या सोहळ्यानिमित्त अनेक वर्षांनी त्यांचे पाय या मंदिराला लागले आहेत. साईबाबांच्या नूतन आसनाचे उद्घाटन करण्याची त्यांना यजमान या नात्याने संधी प्राप्त झाली. कॉंग्रेसमधून भाजपात गेल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांना दिगंबरबाबाना मंत्रिपद मिळावे, हा ध्यास लागलेला आहे. आता मंत्रिमंडळ बदलाचे वारे वाहत आहे. त्यात दिगंबर बाबांना नक्की स्थान मिळेल, असे संकेतही मिळत आहेत. यावेळी साईबाबा त्यांना नक्कीच पावणार, अशी भावना त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. ∙∙∙
भंडारी समाजातील युवा नेते तारक आरोलकर यांच्या शनिवारच्या म्हापशातील सत्कार सोहळ्याठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रवी नाईक व सुभाष शिरोडकर यांना पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. ते तिघेही या कार्यक्रमासाठी फिरकले नाहीत. यामुळे हेच का ते भंडारी एकीकरण अशी संतप्त प्रतिक्रीया समाजातून उमटू लागली आहे. याउलट या कार्यक्रमाचे निमंत्रण माजी मंत्री दयानंद मांद्रेकर व दिलीप परुळेकर यांना देण्यात आले होते. भंडारी समाजाच्या पुढाकारून आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मांद्रेकर व परुळेकर यांना भूमिका घ्यावी लागली. कार्यक्रम संपला तरी भंडारी ऐक्याचे कवित्व कार्यक्रमस्थळी ऐकू येत होते. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.