Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मिरामार किनाऱ्यावरील आइस्क्रीम विक्रेत्यांना संरक्षण

Khari Kujbuj Political Satire: गोव्यातील चेकनाके सध्या नावाचेच बनले असून महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील अबकारी खाते आणि पोलिसांकडून गोव्यातून बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी दारू पकडली जाते.

Sameer Panditrao

मिरामार किनाऱ्यावरील आइस्क्रीम विक्रेत्यांना संरक्षण

राजधानीतील मिरामारसारख्या प्रमुख पर्यटन ठिकाणी, अनेक ठेल्यांवर बिनपरवाना आइस्क्रीम विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, ही उत्पादने दर्जाहीन असण्याची शंका असतानाही अन्न व औषध प्रशासन या विक्रेत्यांवर कारवाई करताना दिसत नाही. राज्यातील इतर भागात एफडीए जोरात छापे टाकत असताना मिरामार येथे मात्र कारवाई टाळली जात आहे, हे लक्षात येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे स्थानिकांकडून या विक्रेत्यांना कोणाचे तरी संरक्षण लाभत असावे असा संशय व्यक्त होत आहे. म्हणूनच ते दिवसाढवळ्या दुप्पट किमतीने आइस्क्रीम विकूनही बिनधास्त व्यवसाय करत आहेत असे लोक बोलू लागले आहेत. ते नव्हे, पण प्रश्न आहे तो एफडीएचे डोळे राजधानीतच का मिटले जात आहेत? ∙∙∙

दारूची अवैध वाहतूक

राज्यातून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याचा आरोप खुद्द फोंड्यातील मगो पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. दोन महिन्यांपूर्वी गोव्यातील एका अबकारी निरीक्षकाला कर्नाटकात बेकायदा दारूच्या वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आली होती, त्यामुळे हे धागेदोरे कुठपर्यंत पोचले आहे, त्याचा अंदाज यावा अशी स्थिती आहे. गोव्यातील चेकनाके सध्या नावाचेच बनले असून महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील अबकारी खाते आणि पोलिसांकडून गोव्यातून बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी दारू पकडली जाते, त्यावरून काय समजायचे ते समजा...! ∙∙∙

सावियोंना चिंता भाजपाची

मराठ्यांच्या काळात मोगल सैनिकांना म्हणे जळी स्थळी संताजी व धनाजी दिसायचे असे इतिहासात म्हटले आहे. आमच्या मडगावच्या सावियोबाबांचे तसेच झाले आहे का असे तेथील भाजपवाले म्हणू लागले आहेत. कारण दिगंबर पंतांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचे म्हणे पाऊलच पुढे पडत नाही. आता तर त्यांनी भाजपाच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडविताना दिगंबर भाजपात आल्यापासून त्या पक्षाचे ‘बुरे दिन’ सुरू झाल्याचे म्हटले आहे व त्यासाठी काही उदाहरणेही दिली आहेत. मात्र, दिगंबर यांची खासियत म्हणजे ते कधीच सावियोंचे नावच घेत नाहीत की त्यांच्या आरोपांना उत्तर देत नाहीत. पत्रकारांनी छेडलेच तर आपण अशांना किंमत देत नाही. आपण मडगावसाठी काय केले ते मडगावकरांना माहीत असल्याचे सांगतात. त्यामुळे भाजपवाले म्हणतात की सावियोंनी भाजपाची चिंता करण्याची गरज नाही त्यांनी आपले घर सांभाळावे. ∙∙∙

रेती वाहतूक बिनधास्त!

मुर्डी - खांडेपार भागातील बेकायदा रेती उत्खनन आणि साठ्याविरुद्ध भरारी पथकाने कारवाई केली तरी अजूनही या भागातून रेतीवाहू ट्रक रात्रीच्या वेळेला वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे रेतीवाहू ट्रक कुठून येतात, त्याचा अंदाज लागत नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रात्री बारानंतर रस्त्यावरून बिनधास्तपणे हे ट्रक रेतीची अवैध वाहतूक करतात. रेती माफियांकडून सर्वांना ‘मॅनेज’ करण्याचे सत्र सध्या सुरू असून त्यामुळे ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असा प्रकार चालल्याचा आरोपही लोकांकडून केला जात आहे. ∙∙∙

देणगी कुपने हा ‘हाऊजी’चा प्रकार?

सध्या गोव्यात ‘हाऊजी’वरून रोजच नवनवे खल सुरू होऊ लागले आहेत. सरकार ‘हाऊजी’वरील बंदी निर्णयावर ठाम आहे, तर ‘हाऊजी’ समर्थक वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून त्यांच्यावर बंदी का घातली जात नाही अशी विचारणा करत आहेत. मात्र, कधी नव्हे तो ‘हाऊजी’ हा प्रकार प्रकाशझोतात आला आहे. ज्यांना ‘हाऊजी’ची गंधवार्ताही नव्हती ते हे काय नवे प्रकरण अशी चौकशी करू लागले आहेत. मात्र, काहींनी आता ‘हाऊजी’चा संबंध विविध उत्सवांचे निमित्त करून जी देणगी कुपने काढली जातात व त्याच्यावर आलिशान कार वा वाहने बक्षिसापोटी ठेवली जातात त्याच्याशी जोडला असून त्यांच्यावरही बंदी घालणार का? असा सूर आळवणे सुरू केले आहे. विशेषतः चतुर्थी काळात अशी कुपने रस्तोरस्ती विकली जात असल्याने हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे असा सुर उमटू लागला आहे. ∙∙∙

कळते पण वळत नाही!

भाजपचे प्रमुख नेते मंत्री गोविंद गावडे यांच्यावर नाराज आहेत. कला अकादमी प्रकरणी गेली चार वर्षे ही नाराजी आहे, परंतु अलीकडे फारसे काही घडत नव्हते. अचानक ‘पुरुष’ नाटकाचे प्रकरण घडले आणि त्यानंतरची गोविंद गावडे यांची प्रतिक्रिया. पुन्हा ठिणगी पडली! सध्या भाजप नेतेच सांगतात, की एकूण मंत्र्यांमध्ये संपूर्ण नकारार्थी प्रतिमा असलेले नेते गोविंद गावडे आहेत व त्यांची छबी नकारार्थी बनल्याने सरकारवरही त्याचा परिणाम होत आहे. गोव्यात कोठेही जा, याच विषयावर चर्चा सुरू आहे आणि लोक अत्यंत तिखट बोलतात. आज प्रश्न एवढाच आहे, की कारवाई कधी होते? हे सगळे एवढे लाजिरवाणे आहे, पण नेतृत्व कसल्या मुहूर्ताची वाट पाहात आहे? ∙∙∙

मुहूर्त मे नंतरच

गोवा मंत्रिमंडळातील बदल आता मे शिवाय होणार नाही. कारण भाजपा राष्ट्रीय अध्यक्षांची निवड जी एप्रिलमध्ये होणार होती, ती आता मे पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतरच गोव्यात घडामोडी होऊ शकतात. गोव्याचाच नव्हे, तर संपूर्ण देशात भाजपच्या राज्यांत खूप मोठ्या उलथापालथी होणार असल्याचे संकेत दिल्लीतून प्राप्त झाले आहेत. अनेक केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री यांच्यावर संक्रांत येणार आहे. सध्या मोहन भागवत दिल्लीत असून त्यांनी बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केली व बरेच नेतेही दिल्लीत दाखल झाले आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT