Goa BJP Politicis Dainik Gomantak
गोवा

Goa BJP Politicis: दिल्‍ली दौरा अन् सस्‍पेन्‍स! 'खरी कुजबूज'

Goa BJP Politicis: उत्तर गोवा श्रीपाद नाईकांचे की दक्षिण गोव्यात दिगंबर कामतांना संधी मिळेल का? असे अनेक प्रश्‍‍न सध्‍या दिल्‍लीत सोडविले जात आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa BJP Politicis: भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे पक्षाच्‍या कामासाठी दिल्‍लीला गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 तारखेला गोव्‍यात येत असल्‍याने तानावडेंच्‍या दिल्‍ली भेटीला महत्त्‍व आहे. गोव्‍यातही पक्षाची जय्‍यत तयारी सुरू आहे. परंतु, तानावडे दिल्‍लीला गेलेत ते लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीसाठी.

गोव्‍यासंदर्भात पक्षश्रेष्‍ठी नव्‍याने व्‍यूहरचना आखू लागले आहेत. उत्तर गोव्‍यात श्रीपाद नाईकच पुन्‍हा असतील काय? दक्षिण गोव्यात दिगंबर कामत यांना संधी मिळेल काय, असे अनेक ‘सस्‍पेन्‍स’ प्रश्‍‍न सध्‍या दिल्‍लीत सोडविले जात आहेत.

गेल्‍या काही दिवसांपूर्वी गोव्‍यात त्‍या संदर्भात जनमताचा कानोसा घेण्‍याचाही प्रयत्‍न झाला. हे सर्वेक्षण पक्षश्रेष्‍ठींनी परस्‍पर करून घेतले आहे. उमेदवारांच्‍या दृष्‍टीने पुढचे काही महिने खूपच उत्‍कंठावर्धक असतील, यात शंक नाही. या भेटीत तानावडेंनाही पक्षश्रेष्‍ठी काही अवघड प्रश्‍‍न विचारतील म्‍हणे!

‘हिमाचल’मधील परीक्षा

हिमाचल प्रदेशचे राज्‍यपाल राजेंद्र आर्लेकर हे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सपत्नीक भेटले. यावेळी पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्‍या निवडणुकीचा आढावा घेतला असल्‍याची शक्‍यता आहे. हिमाचल प्रदेश भाजपला कठीण जाईल, असा प्रसारमाध्‍यमांचा अंदाज असल्‍याने आर्लेकर यांच्‍याकडून फर्स्ट हॅण्ड रिपोर्ट मोदींनी समजून घेतला असावा.

मोदी याबाबत खूपच चाणाक्ष असल्‍याने त्‍यांनीही वेगवेगळ्या माध्‍यमांतून निवडणुकीचा अंदाज घेतलाच असेल. गोव्‍याच्‍या निवडणुकीचा अंदाज योग्‍य प्रकारे व्‍यक्‍त करणाऱ्या ‘इंडिया टुडे टीव्‍ही’ने भाजपची पीछेहाट तेथे दाखवली आहे. 60 पैकी भाजपला 24 ते 34 , तर काँग्रेसला 30 ते 40 जागा मिळतील, असा अंदाज राजदीप व राहुल कन्‍वर यांच्‍या चॅनेलने दर्शविला आहे.

काँग्रेसच्‍या दृष्‍टीने 2 टक्‍के वाढीव मतांचा फायदा त्‍यांना सत्तेपर्यंत घेऊन जाईल, असे ‘इंडिया टुडे’चे म्‍हणणे आहे. हिमाचलमध्‍ये अनुसूचित जातींमधील नागरिकांची संख्‍या 23 टक्‍क्‍यांवर आहे. हा आकडा बराच मोठा असल्‍याने राजेंद्र आर्लेकर यांची तेथे राज्‍यपालपदी नेमणूक करण्‍यात आली होती.∙∙∙

सखोल चौकशी झाली तर...

गोव्यात नोकऱ्या मिळत नसल्याने युवा वर्ग सैरभैर झाला आहे. गोव्यात नोकऱ्या तर नाहीतच, त्यामुळे विदेशात नोकरीचे स्वप्न आणि त्याअनुषंगाने गलेलठ्ठ पगार, हे मनात धरूनच बहुतांश युवक विदेशातील नोकरीसाठी धडपडतात.

नेमका हा प्रकार हेरून काही भामटे विदेशात नोकरीचे आमिष दाखवतात, त्यासाठी दहा पंधरा लाखांचा गंडा अशा नोकरीच्छुक युवकांना घालतात आणि पसार होतात. यावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही. वास्तविक प्रत्येक बेरोजगार युवकाला रोजगार देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे.

पण सरकार मात्र आपल्याच सग्यासोयऱ्यांना आणि हितसंबंधितांना नोकऱ्या देण्यात मश्‍गूल आहेत. पोलिस उपनिरीक्षकपदासाठी निवड झालेल्यांची जर सखोल चौकशी झाली, तर ही बाब समोर येईल हे निश्‍चित.

सरकारी नोकरदाराची वरकमाई!

सातवा वेतन आयोग लागू असूनही बऱ्याचदा सरकारी नोकरदार वरकमाईसाठी हपापलेला असतो. आता हेच पहा. बोरी पंचायतीत अजून घरच उभारण्यात आलेले नाही, पण घरक्रमांक देऊन मोकळा. बोरी पंचायतीच्या पंचसदस्याने सरळ पंचायत सचिवावर आरोप केला आहे आणि या घोटाळ्याचा निषेध म्हणून स्वतःचा राजीनामाही दिला आहे.

हल्लीच मुख्यमंत्र्यांनी पंचायत पातळीवर गैरव्यवहार कराल, तर खबरदार असा इशारा दिला आहे, मात्र इथे तर उलटाच प्रकार पहायला मिळाला. या पंचसदस्याने पुराव्यानिशी पत्रकारांना हा प्रकार दाखवला आहे. आता हे प्रकरण पंचायत संचालनालय कशा प्रकारे घेते, त्यावर सर्वकाही निर्भर आहे. शेवटी पैशांसाठी काहीही होत असेल तर मात्र ही गंभीर बाब आहे.

सरकारकडूनच खतपाणी?

घाऊक पद्धतीने पक्षांतरेही लोकशाहीला मारक. मात्र, गोवा यास अपवाद असून आमचे राज्य हे सध्या पक्षांतराचे जणू माहेरच बनल्याचे दिसते! मध्यंतरी, काँग्रेसचे 10 आमदार भाजपात गेलेले. त्यानंतर अलीकडच्या काळात आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला आणि यातील काहींना म्हणे आता पक्षांतराचे बक्षीस मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लवकरच या फुटीरवाद्यांना मंत्रिपद व महामंडळे दिली जाणार आहेत, अशा बातम्या आहेत. एकीकडे विद्यमान सरकार हे पक्षांतर अयोग्य तसेच लोकशाहीच्या बाता मारते, परंतु स्वतःची कृती ही एकदम उलट! हा प्रकार पाहून सध्या सर्वसामान्य जनताच बोलू लागली आहे, की भाजपा सरकारच हे अशा बेकायदा पक्षांतरास आमिषांच्या स्वरूपात खतपाणी घालत आहे!

दोनापावला जेटी मुहूर्त फसला

राज्यातील अनेक प्रकल्पांची कामे होण्यापूर्वीच त्यांच्या उद्‍घाटनाची घोषणा करण्याची पद्धत आहे. मात्र त्या दिवशी त्याचे उद्‍घाटन होत तर नाही व वारंवार त्याच्या तारखा पुढे ढकलल्या जातात. पर्यटकांचे आकर्षण असलेली दोनापावल येथील जेटी हे त्याचेच एक उदाहरण आहे. कोट्यवधी रुपये खर्चून गेल्या दोन वर्षापासून हे काम सुरू होते.

काही दिवसांपूर्वी मंत्री बाबूश मोन्सेरात व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी संयुक्त बैठक घेऊन या दोनापावला जेटीचे काम पूर्ण होऊन 5 डिसेंबरला ती खुली केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र त्यांनी केलेली ही घोषणा हवेतच विरली आहे, मुहूर्त टळला आहे. त्यामुळे आता पुन्हा नवा मुहूर्त शोधावा लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 11 डिसेंबरला गोव्यात येत आहेत. त्यामुळे संपूर्ण सरकारी यंत्रणा सर्व कामे बाजूला ठेवून व इतर कोणत्याही प्रकल्पांचा विचार न करता कामाला लागली आहे. ही जेटी खुली करण्याची घोषणा करणारे मंत्रीही विसरून गेले आहेत. पर्यटकांना मात्र या दोनापावला जेटीवर जाण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ही जेटी बंद असल्याने तेथील स्थानिक व्यावसायिकही जेटी खुली होण्याची वाट पाहत आहेत.

मडगावच्या बस्त्यांवर कारवाई कधी?

कायदा सगळ्यांसाठी समान असतो. कायदा उच्च नीच, लहान मोठा, सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव करीत नाही. गेल्याच आठवड्यात कर्तव्य दक्ष सरकारी अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी उत्तरेतील ‘लाला की बस्ती’ या बस्तीवर धाड घालून बेकायदेशीरपणे राहत असलेल्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

बरेच बिगरगोमंतकीय व विदेशी लोक अशा बस्तीत राहतात हे उघड झाले आहे. अशा अनेक लाला, बाबा, बाबू, फकीर अशांच्या वस्त्या मडगावातही आहेत. या वस्त्या राजकीय वरदहस्ताने खुल्लम खुलला बेकायदा चालत आहेत. अशा वस्तीत अनेक वाईट वृत्तीचे लोक, गाव सोडून आलेले व चोरी करून आलेले अनेकजण बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहतात.

आता मडगाव, मायणा कुडतरी व फातोर्ड्यात बाबू, बाबा व इतरांच्या बेकायदेशीर वस्त्यांवर धाड टाकण्याचे सामर्थ्य दाखविल्यास अनेक बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असलेले देशी, विदेशी व रोहिंग्ये सापडणार, चला तर करा सुरुवात !

आयडीसीत गब्बर!

गोवा औद्योगिक विकास महामंडळात (आयडीसी) अनेक अधिकारी आणि कर्मचारी मग्रूर झाले आहेत, त्यांना कोणाचीही धास्ती राहिलेली नाही. मुळात ही मंडळी गब्बर झाली असून त्यांना सरळ करण्याची वेळ आता आली आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष ॲलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे म्हणणे आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, की सरकारी खात्यातील ‘गब्बर कर्मचारी ’ अजूनही बेफिकीर आहेत. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इशारा देऊनही या मंडळीच्या मनात भीती नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT