प्रियोळ येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे मगो पक्षाला आव्हानच दिल्याने या मतदारसंघातील भाजपचे आमदार व मंत्री गोविंद गावडे यांची छाती आणखी फुगण्यास मदत झाली आहे व ते चांगलेच सुखावलेत. २०२७ च्या निवडणुकीला अजून दोन वर्षे आहेत तरी आतापासूनच पडघम वाजू लागलेत. मगोचे नेते दीपक ढवळीकर हे प्रियोळ मतदारसंघावर डोळा ठेवून असल्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे संकेत आहेत. प्रियोळ हा भाजपचाच मतदारसंघ असेल, असे त्यांनी अगोदरच घोषित केल्याने कार्यकर्त्यांतील उत्साह वाढला आहे. स्थानिक आमदारांनाही जे कार्यकर्त्यांना सांगावे लागणार होते, ते मुख्यमंत्र्यांनीच त्यांचे काम फत्ते करून टाकले. मंत्री गावडे यांनीही आपल्या शैलीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणावर दिलखुलासपणे प्रतिक्रिया देत आपले तिकीट पक्के असल्याची स्वप्ने पाहू लागलेत. भाजप सरकारमध्ये मगो आहे, मात्र केंद्र सरकारच्या आशीर्वादाने ते सहभागी झाले होते,असा दावा मगोकडून केला जात आहे. भाजप सरकार मगोची भूमिका व त्यांच्याकडून काय उत्तर येते याची वाट पाहत आहे, मात्र मगो वेळ येईल तेव्हाच उत्तर देईल, असे तरी सध्या दिसते. ∙∙∙
प्रियोळ मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच पार पडला. भाजपचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांत जोश आणण्यासाठी आक्रमक भाषण केले. त्या भाषणामुळे मगो नेत्यांच्या अंतर्मनावर घाव झाले असतील हे वेगळे सांगायला नको. भाजप प्रियोळची जागा सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. तेथे भाजपचे आमदारही आहेत. त्यामुळे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना यावेळीही सुरक्षित असा दुसरा मतदरासंघ शोधावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे मगोच्या गोटातही शांतता आहे. आता मगोकडून काय प्रतिक्रिया येते, याची वाट अनेकजण पाहत असावेत. सुदिन ढवळीकरांनी रविवारी प्रतिक्रिया दिली तरी भाजप नेत्यांकडून चालून संधी आली होती, असे म्हणावे लागेल. कारण या नेत्यांनी प्रियोळ हा ‘एसटी’ साठी राखीव करू असे जाहीर करायला हवे होते. शिवाय दीपक यांनीही युती झाल्यास प्रियोळ भाजपला सोडला असता वा भाजपकडून दुसरा मतदारसंघ मागितला असता. म्हणजेच ‘सुंठीवाचून खोकला गेला असता’ हे कसे भाजप नेत्यांच्या डोक्यात आले नाही, हा एक प्रश्नच आहे. ∙∙∙
‘नाक खंय आनी आदोळी खंय’ अशी कोकणीत एक म्हण आहे. राज्यात एनईपीची अंमलबजावणी सुरू झाली असून शिक्षण खात्याने यंदा पासून शालेय वर्षात बदल करून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याला काही पालकांनी विरोध केला. प्रकरण न्यायालयात गेले. सरकारने कायद्यात बदल केला आणि सात ते ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. हा विषय इथेच संपवायचा होता, मात्र आता राजकारण सुरू झालेय. हा बदल सरकार करत नाही तर त्यासाठी स्वतंत्र तज्ञ समिती आहे. खासदार विरयातो, आमदार सरदेसाई, आमदार सिल्वा यांनी जाहीर सभेत या बदलाला विरोध केला. साहेब राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यापूर्वी एक वर्ष त्यावर हरकती मागितल्या होत्या. आपण त्या दिल्या होत्या का? सिल्वा यांची मुलगी ‘सीबीएससी’ त शिकते. जिथे एप्रिलमध्ये शाळा आहे. त्याला ‘आप’चे आमदार विरोध करीत नाहीत. विरोध करणाऱ्यांची मुले ‘सीबीएससी’ त शिकतात. एकीचा मुलगा ‘होम स्कुलिंग’ करतो मग हा विरोध खरेच मुलांच्या प्रेमासाठी की, राजकारणासाठी? मॅडम सिसिल हा अट्टाहास बरा नव्हे. ∙∙∙
सध्या हुर्राकाचा मौसम सुरू आहे. पहिल्या धारेचे हे प्रसिद्ध पेय गोव्यात फामाद. मात्र तो कसा पोटात रिचवावा याचाही एक फॉर्म्युला असतो. अनेकजण मिळतो म्हणून हुर्राक पितात व नंतर तोंडघशी पडतात. गेल्या मंगळवारी गुलालात एका महाशयाने असेच साहस केले. परिणाम व्हायचा तो झाला. दुचाकीवरून तो पडला व हातपाय सोलून घेतले. काही ओळखीच्या लोकांनी त्याला इस्पितळात नेले व नंतर त्याच्या कुटुंबीयांना कळविले. मात्र, त्या कुटुंबीयांनी मदत करणाऱ्या त्या लोकांनाच धारेवर धरले. झक मारली अन्य मदत केली, अशी गत त्यांची झाली. ∙∙∙
गोव्यात या आठवड्यात मंत्रिमंडळ फेरबदल होणार ही चर्चा सध्या जोरात चाललेली आहे. मंत्रिमंडळांतून कोणाला वगळणार व कोणाचा अंतर्भाव केला जाणार हे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. कोणालाही वगळो वा कोणाचाही अंतर्भाव करो, पण मडगावच्या बाबांना यावेळी मंत्रिपद मिळणार यावर त्यांचे समर्थक निश्चिंत आहेत. काहींची छातीतर म्हणे दोन इंचांनी आताच फुगली आहे, तर अन्य काहीजण म्हणे त्यांचा मंत्रिपदी शपथविधी झाल्यावर काय काय करावयाचे त्याचा बेत आखू लागलेले आहेत. मात्र खरेच बाबा मंत्री झाले तर त्यांच्या बरोबर कॉंग्रेसमधून भाजपात येऊन मंत्री झालेल्या अन्य कोणाचे मंत्रिपद गेले तर त्यांची हालत काय होणार, या कल्पनेने अनेकजण धास्तावलेले आहेत खरे. बाबांनाही म्हणे तीच चिंता सतावतेय. ∙∙∙
दिगंबरबाब कामत हे देवभक्त आहेत, हे सर्वश्रुत आहे. साईबाबाचे तर ते परम भक्त आहेत. त्यांची कित्येकदा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी वारी असतेच. तळेबांध आके येथील श्री साईबाबा मंदिराचा रौप्य महोत्सवी सोहळा चालू झाला आहे. या सोहळ्यानिमित्त अनेक वर्षांनी त्यांचे पाय या मंदिराला लागले आहेत. साईबाबांच्या नूतन आसनाचे उद्घाटन करण्याची त्यांना यजमान या नात्याने संधी पण प्राप्त झाली. कॉंग्रेसमधून भाजपात गेल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांना दिगंबरबाबाना मंत्रिपद मिळावे हा ध्यास लागलेला आहे. आता मंत्रिमंडळ बदलाचे वारे वाहत आहे. त्यांत दिगंबर बाबांना नक्की स्थान मिळेल, असे संकेतही मिळत आहेत. या वेळी साईबाबा त्यांना नक्कीच पावणार, अशी भावना त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसताहेत. ∙∙∙
भाजप देशाध्यक्ष दामू नाईक भाषणात तरबेज आहेत. आमदार म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. त्यानंतर ते पक्षात राहून काही पदांवर कामे केले आणि आता प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी मतदार संघातून कार्यकर्ता मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. प्रियोळमधील नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दामू नाईक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना २०२७ मध्ये २७ जागा जिंकण्याचे ध्येय गाठताना टांग्याच्या घोड्याचे उदाहरण दिले आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टांग्याला असणाऱ्या घोड्याला डोळ्यांवर झापड लावलेले असायचे. कारण त्याने फक्त समोर पहावे, हा त्यामागील उद्देश. आता टांग्याला जोडलेल्या घोड्याप्रमाणे कार्यकर्त्याने फक्त कमळ लक्षात घ्यावे आणि कामाला लागवे, असे दामू यांचे आवाहन. त्याशिवाय झापड लावले तरी दोन्ही बाजूने इतर पक्षांकडून येणाऱ्या विविध प्रलोभनांकडे न पाहता भाजपच्या चिन्हाकडेच पाहून काम करण्याचे सूचित केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी बरेच पाणी झुआरी आणि मांडवी पुलाखालून वाहून जाणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनानुसार काम करतील, अशी अपेक्षा बाळगणे जिकरीचेच राहील हे दामूंनाही पक्के माहीत असणारच. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.