राज्यातील राजकारणात सध्याच्या क्षणी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील साखळी नगरपालिकेच्या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगातर्फे नगरपालिका निवडणुकीची तारीख दृष्टीपथात असल्याने आता या निवडणुकीच्या तयारीला बराच वेग आलेला आहे. यावेळीही या नगरपालिकेत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच परंपरागत चढाओढ पाहायला मिळणार आहे.
साखळी नगरपालिकेचे राजकारण हे सदैव विविध कारणांमुळे प्रसिद्धीत असते. याहीवेळी या नगरपालिका राजकारणात हा सत्तासंघर्षाचा खेळ बराच रंगणार आहे. सत्ताधारी गटाकडून न्यायलयाचे दरवाजे जरी ठोठावण्यात आले असले तरी, सध्या समोर असलेल्या प्रभाग फेररचना व आरक्षणाप्रमाणेच निवडणूक तयारीला प्रारंभ केला आहे.
जर न्यायालयाचा निकाल सकारात्मक आला तर नंतर बदल घडविले जाणार आहेत, असे या गटातील एका सदस्याने सांगितले.
गेल्या तीन निवडणुकांचा इतिहास...
साखळीत नगरपलिका स्थापन झाल्यापासून आज 15 वर्षे झाली. या पंधरा वर्षांमध्ये भाजपला जेमतेम दहा महिन्यांचीच सत्ता मिळाली आहे.
2008 साली या नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली होती. त्यावेळी दहा प्रभाग होते आणि सर्व दहाही जागा काँग्रेस समर्थक उमेदवारांंनी जिंकून विक्रम केला होता. त्यामुळे त्या पाच वर्षांत काँग्रेसचीच सत्ता राहिली.
2013 मध्ये राज्यात भाजपचे सरकार होते आणि डॉ. प्रमोद सावंत हे आमदार होते. साखळी नगरपालिकेत भाजपला काठावर बहुमत मिळाले आणि सत्ताही स्थापन झाली. परंतु या सत्तेला अवघ्या 46 दिवसांनी सुरूंग लागला आणि एक नगरसेवक भाजपच्या गटातून सुटला व विरोधी गटाला मिळाला. त्या राजकीय समीकरणात धर्मेश सगलानी हे प्रथमच नगराध्यक्ष बनले. आणि त्यांंनी पुढील पाचही वर्षे साखळी नगरपालिकेवर आपली सत्ता राखली.
2018 च्या नगरपालिका निवडणुकीत सर्व संघर्षमयी परिस्थितीवर मात करून धर्मेश सगलानी यांच्या टुगेदर फॉर साखळी या गटाने तेरापैकी १० जागा जिंकल्या व बिनदिक्कतपणे आपली सत्ता स्थापन केली.
या सत्तेला सुरूंग लावताना सगलानी गटातील काही नगरसेवकांना भाजपच्या बाजूने घेत भाजपने सत्ता स्थापनही केली. परंतु सत्ता फार काळ टिकली नाही.
भाजप गटाकडे तेरापैकी सात तर सगलानी गटाकडे सहाचे बळ होते. त्याचवेळी नगरसेवक दामू घाडी यांचे निधन झाल्याने दोन्ही गटांकडे सहाचे बळ राहिले. त्यामुळे घाडी यांच्या जागी मुजावरवाडा प्रभागात होणारी पोटनिवडणूक निर्णायक होती.
या निवडणुकीत सगलानी गटाच्या उमेदवाराने बाजी मारली आणि सगलानी गटाने पुन्हा सत्ता आपल्याकडे राखली.
मंगळवारी सुनावणी शक्य
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रभाग फेररचनेत १३चे १२ प्रभाग करण्यात आले आहेत. तसेच या प्रभागांमधील मतदारसंख्या समान राखण्यात न आल्याने सगलानी गटातील नगरसेवकांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
तसेच प्रभाग आरक्षणात योग्य निकष लावण्यात न आल्याचे कारण दाखवत न्यायालयात खटला सादर केला आहे. त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मंगळवार, ११ रोजी सत्ताधारी गटाने याविषयावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याने त्याचदिवशी सुनावणीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील कौल डोळ्यांसमोर
साखळी नगरपालिका क्षेत्रातील लोकांनी गेल्या तिन्ही नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला पसंती दिलेली आहे. केवळ २०१३ च्या निवडणुकीत भाजपला काठावरचे बहुमत दिले होते. परंतु ते काही घातकी नगरसेवकांमुळे भाजपला टिकवता आले नाही. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपली ताकद पणाला लावली आहे.
भाजपकडून प्रभारी नियुक्त
भाजप गटाकडून प्रत्येक प्रभागात प्रभारी नियुक्त करून त्यादृष्टीने काम सुरू आहे. बहुतेक प्रभागांमधील उमेदवार निश्चितही झालेले आहेत. तर एकापेक्षा जास्त उमेदवार असलेल्या काही प्रभागांमध्ये उमेदवारांची मनधरणी आणि सामंजस्याने गुंता सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत राबविलेल्या विकासकामांवर भाजप गटाने भर दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.