Ponda Municipality Election : फोंड्यात राजकीय हालचालींना वेग

नगरसेवक न्यायालयात; प्रभाग फेररचना व महिला आरक्षणावरून वाद
Ponda Municipality
Ponda MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा पालिकेची निवडणूक अखेर 5 मे रोजी जाहीर झाल्याने इच्छुकांच्या राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. यावेळेला फोंडा पालिका ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष, मगो आणि काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून कोणत्याही स्थितीत फोंडा पालिकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी जोरदार हालचाली करण्यात येत आहे.

तरीही पालिका क्षेत्रातील प्रभाग फेररचना आणि महिला आरक्षणावरून तीन आजीमाजी नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतल्याने ही निवडणूक ठरल्या तारखेला होते की पुढे ढकलली जाते, ते पाहावे लागेल.

फोंडा पालिकेच्या पंधराही प्रभागांतील इच्छुकांनी आपापली मोर्चेबांधणी चालविली आहे. वास्तविक ही निवडणूक पक्षीय चिन्हावर होत नसली तरी राजकीय पक्षांचे वर्चस्व या निवडणुकीवर असते.

राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकच ही निवडणूक लढवत असल्याने भाजप, मगो आणि काँग्रेसने उमेदवार निवडीवर सध्या भर दिला आहे. बिगर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्र जाण्याचे ठरविले आहे, त्यामुळे निवडून कोण येतो, ते पाहावे लागेल.

Ponda Municipality
Goa Municipality Elections : मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा लागणार कस

मगोचे केतन भाटीकर प्रयत्नरत

मागच्या वेळेला रायझिंग फोंडा या झेंड्याखाली मगो पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी आपल्या समर्थकांना घेऊन फोंडा पालिकेची निवडणूक लढविली होती. भाटीकर यांचे सात नगरसेवक रायझिंग फोंडा या झेंड्याखाली निवडून आले.

आठवा नगरसेवकही रायझिंग फोंडाला मिळाला आणि त्यावेळी सुरवातीलाच प्रदीप नाईक यांना नगराध्यक्ष करून फोंडा पालिकेवर मगोने आपला झेंडा उभारला. पण नंतरच्या काळात सत्तांतर झाले आणि मगोकडून सत्ता निसटली ती थेट नंतरच्या काळात भाजपच्या ताब्यात आली. आताही केतन भाटीकर यांनी आपल्या समर्थकांना घेऊन निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यावेळेला पुन्हा एकदा पालिका निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.

मागच्या वेळेला कडबोळे मंडळ

फोंडा पालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत कडबोळे मंडळ निवडून आले. मगो पक्षाचे सात, भाजपचे पाच तर काँग्रेसचे तीन असे हे गणित होते. त्यामुळे सुरवातीला जरी मगो पक्षाने सत्ता स्थापन केली तरी नंतरच्या काळात मगो पक्षाला सत्ता राखून ठेवणे शक्य झाले नाही, त्यामुळे नंतरच्या काळात भाजपचेच वर्चस्व पालिकेवर राहिले.

इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या नगरसेवकांमुळे ही स्थिती आली, त्यामुळेच पूर्ण बहुमत असलेले मंडळच निवडून आणण्यासाठी भाजप, मगो आणि काँग्रेस पक्ष सरसावला आहे.

राजेश वेरेकरांचीही जोरात तयारी

मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत अधिक मते घेतलेले फोंड्यातील काँग्रेस पक्षाचे नेते राजेश वेरेकर यांनीही यावेळेला आपल्या समर्थकांना म्हणजेच काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी चालविली आहे. महिन्याभरापूर्वी फोंड्यात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत फोंडा पालिका निवडणूक काँग्रेस समर्थक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे वेरेकर यांच्यावर जबाबदारी आली आहे.

न्यायालयावर विश्वास

जरी निवडणूक तारीख जाहीर झाली असली तरी आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास आरक्षणाविरोधात याचिका दाखल केलेले माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी व्यक्त केला. न्यायालयात याचिका असल्यामुळे आपण याबाबत विशेष काही बोलू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

रवींचे वर्चस्वासाठी प्रयत्न

मागच्या निवडणुकीच्या काळात फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक हे काँग्रेसमध्ये होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते निवडूनही आले आणि मग पालिकेत सत्तांतर झाले.

रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक हे नगराध्यक्ष बनले आणि सत्ताधारी भाजपच्या सहकार्याने तसेच रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फोंड्यातील अनेक विकासकामे मार्गी लावली. त्यामुळे सध्या रवी नाईक यांनी फोंडा पालिकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com