फोंडा: बेतोडा कोनशे कोडार निरंकालच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत अनेक विषयांवर वादावादी झाली. मुख्य म्हणजे वैद्यनगर-बेतोडा भागात उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. हा कचरा प्रक्रिया प्रकल्प गेली दोन वर्षे तसाच पडून असून याप्रकरणी पंचायतीने ठोस कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. सरपंच मधू खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला इतर पंचसदस्य उपस्थित होते. सचिवाने मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केल्यानंतर सभेला सुरवात झाली.
ग्रामसभेत कचरा प्रक्रिया प्रकल्पावरून मोठी चर्चा झाली. इतर काही विषयावरूनही ग्रामस्थ आक्रमक झाले, काहीजणांनी तर ग्रामसभेवर बहिष्कार घातला. सरपंच मधू खांडेपारकर यांनी यावेळी पंचायतीचे कामकाज सुरळीत आणि व्यवस्थित सुरू असून शिल्लक कामे लवकरच पूर्ण केली जातील, अशी माहिती दिली.
वैद्यनगर - बेतोडा भागात उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम अर्धवट स्थितीत असून या प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, मग हा प्रकल्प पूर्ण का केला जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला काहीजणांचा विरोध असून हे प्रकरण उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोन्ही गटांना एकत्रित करून तोडगा काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पंचायतीची ही ग्रामसभा बेकायदा असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. वास्तविक तीन महिन्यांच्या आत ग्रामसभा व्हायला हवी, पण ही ग्रामसभा तीन महिन्यानंतर होत असल्याने ही ग्रामसभा बेकायदा असून याप्रकरणी फोंडा (Ponda) गटविकास अधिकाऱ्यांना कळविणार असल्याचे ग्रामस्थ म्हणाले. त्यावर पंचायतीचे अंदाजपत्रक लवकरच असल्याने ग्रामसभा जरा पुढे ढकलली, अन्यथा दोन ग्रामसभा घ्याव्या लागल्या असत्या, त्यामुळे ग्रामसभा बेकायदा नसल्याचा दावा सरपंचाने केला.
पंचायत क्षेत्रातील वीज, पाणी, रस्ते आदीबाबत समस्या असून पंचायतीचे समस्यांकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यावर सरपंच मधू खांडेपारकर यांनी विकासाची काही कामे सुरू असून इतरही लवकरच सुरू होतील, असे सांगितले.
पंचायत क्षेत्रातील बेकायदा भंगारअड्ड्यांवर का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. या भंगारअड्ड्यात बेकायदा व्यवहार केला जात आहे, असा आरोप करून या भंगारअड्ड्यांचा त्रास स्थानिकांना होतो, असा दावा करून या भंगारअड्ड्यांवर त्वरित कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.