गोव्याच्या किनाऱ्यांची ओळख केवळ वाळू आणि समुद्राच्या लाटांपुरती मर्यादित नाही, तर ती आता कचरा आणि अस्वच्छतेमुळेही चर्चेत येऊ लागली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ हेच दर्शवतात की, सुंदर किनाऱ्यांचे रूपांतर कचराकुंडीत होत आहे. यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे आणि पर्यटन उद्योगालाही मोठा फटका बसत आहे. यावर उपाय म्हणून स्थानिक पंच आणि आमदार नेहमीच आश्वासनांची गाजरं दाखवतात. ‘किनारे लवकरच स्वच्छ होतील’ असे सांगतात, पण त्यांच्या आश्वासनांना आता लोकांनी गांभीर्याने घेणे सोडून दिले आहे. उलट ‘अधिकारी आणि नेते बोलतात एक आणि करतात भलतंच’ अशा प्रकारचे थेट टोमणेही ऐकायला मिळत आहेत. ∙∙∙
येत्या महानगरपालिका निवडणुकीत आमदार बाबूश मोन्सेरात यांची खरी कसोटी लागणार आहे. यावेळी त्यांच्या गटापुढे तगडे आव्हान उभे करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. दत्तप्रसाद नाईक यांनी पहिल्या दहा प्रभागांत उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे पहिला विरोध ठरला आहे आणि त्यांनी कामही सुरू केले आहे असे सांगितले जात आहे. आता उर्वरित २o प्रभागांत उत्पल पर्रीकर यांचा गट की आणखी कोणती आघाडी उमेदवार देणार हे निश्चित नाही, पण ज्याअर्थी इच्छुकांच्या बैठका सुरू आहेत, त्याअर्थी ही निवडणूक चुरशीची होणार असे दिसते. स्मार्ट सिटीच्या कामावर पणजीकर किती समाधानी आहेत हे मतदानातून कळणार आहे. त्यासाठी जुन्या नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आत्तापासूनच वर्तविली जात असून तेही या अनुषंगाने कानोसा घेऊ लागले आहेत. ∙∙∙
कला अकादमीच्या नूतनीकरण कामात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गेल्या काही महिन्यांत सरकारला वारंवार धारेवर धरले. याबाबतीत विरोधकांचा रोख प्रामुख्याने तत्कालीन कला आणि संस्कृतीमंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांच्यावर होता. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीचे अध्यक्षपद स्वत:कडे ठेवत गावडेंनाही मंत्रिमंडळातून हटवले. आता कला आणि संस्कृती खाते नव्याने मंत्रिमंडळात दाखल झालेल्या रमेश तवडकर यांच्याकडे देण्यात आले आहे. या खात्याचे मंत्री म्हणून तवडकर यांच्याकडे कला अकादमी जाण्याची शक्यता असतानाच कलेची आवड असलेल्या आणि काही चित्रपटांत अभिनेते म्हणून झळकलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याही नावाची याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे, पण दामू मात्र कला अकादमीचे अध्यक्षपद घेण्यास तयार नाहीत. प्रदेशाध्यक्ष म्हणून मिळालेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्यासाठीच कला अकादमीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास आपण तयार नसल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे ‘कलाकार’ म्हणून दामूंवर प्रेम करणारे भाजप कार्यकर्ते त्यांच्या ‘नकारा’चे कारण शोधण्यात व्यस्त झाले आहेत... ∙∙∙
भाजपच्या अल्पसंख्याक समितीच्या अध्यक्षपदी हैदर शहा यांची वर्णी लागली आहे. हैदरमियाँ हे फातोर्ड्यातील. आपले काम बरे की आपण बरे हा त्यांचा स्वभाव. गेली अनेक वर्षे ते भाजपात आहेत. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे एकनिष्ठ अशी त्यांची ओळख. या एकनिष्ठतीचे फळ त्यांना आता मिळाले आहे. दामूशी फारकत घेऊन काही अल्पसंख्याक त्यांच्यापासून दूर गेले होते. आम्ही जर दामूबाबाकडे एकनिष्ठ राहिलो असतो, तर हैदरच्या जागी आपण असतो याची खंत त्यांना आता वाटते. मात्र, आता वेळ टळून गेली आहे. हैदरचे हितचिंतक सध्या खुशीत आहेत. ∙∙∙
काँग्रेस व आम आदमी पक्ष हे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या विरोधी आघाडीचे घटक, पण हल्लीच्या काळात इंडी विरोधी पक्षांची आघाडी अस्तित्वात आहे की नाही हेच मुळात कळत नाही. गोव्यात तर काँग्रेस व आपमध्ये मध्यंतरीच्या काळात मतभेद झाले होते, पण सभापतिपदाची उमेदवारी अर्ज आमदार एल्टन डिकॉस्ता भरण्याच्या वेळी आपचे दोघेही आमदार क्रुझ सिल्वा व व्हेंझी व्हिएगस उपस्थित होते. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष परत एकदा एकत्र आले की काय असे सर्वांना वाटायला लागले आहे. खरे खोटे आता जिल्हा पंचायतीच्या निवडणुकी दरम्यान स्पष्ट होईलच. तोपर्यंत वाट बघू. ∙∙∙
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सध्या महेश कांदोळकर आणि महेश देसाई यांच्या पॅनलमध्ये ही निवडणूक होत असली तरी यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे क्रिकेट स्टेडियमचे आश्वासन दोन्ही बाजूने देण्यात आले आहे. खरेतर पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे दोघे आपापल्या मतदारसंघात क्रिकेट स्टेडियम होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे, परंतु आत्तापर्यंत गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका झाल्या त्यात स्टेडियमचा विषय महत्त्वाचा राहिला, पण तो धसास काही लागलेला नाही. धारगळची जागा निश्चित झाली, पण पुढे काही झालेच नाही. आता वन म्हावळिंगे (डिचोली) येथे स्टेडियम नेण्यासाठी एका गटाने ताकद लावली आहे. जीसीएत सत्ता कोणाची आली तरी स्टेडियम होणार की नाही, हे महत्त्वाचे आहे. ‘स्टेडियम’चे स्वप्न पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींना पुढील पाच वर्षांसाठी केवळ आश्वासनावर रहावे लागू नये म्हणजे झाले. ∙∙∙
‘अनुभवाने माणूस शहाणा बनतो’ असे म्हणतात. कुंकळ्ळीतील जनता सध्या आपल्या चुकीची फळे भोगत आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कुंकळ्ळीत औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराला काही वर्षांपूर्वी स्थानिक युवकांनी हरकत घेतली होती. मात्र, सरकारने लोकभावनांची कदर न करता व जनतेचे दुबळेपण पाहून प्रदूषणकारी कारखाने आणलेच. एनआयटीसारख्या शैक्षणिक संस्थेबरोबरच स्थानिक शाळांची स्थिती सुधारावी अशी याचना स्थानिकांनी सरकारकडे केली. कुंकळ्ळीत मोठमोठे प्रकल्प आले. मात्र, स्थानिकांना नाही नोकऱ्या मिळाल्या, नाही शिक्षणात प्राथमिकता. याचा बोध आता सगळ्यांनीच घेतला असून जे कुंकळ्ळीत घडले ते आपल्या गावात होऊ नये म्हणून जनता सरकारी शैक्षणिक प्रकल्पांना विरोध करीत आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.