पणजी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात २८८ विधानसभा जागांसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोव्यात खबदारी घेतली जात असून, निवडणूक काळात चार दिवस सीमालगतच्या भागात मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. गोवा अबकारी खात्याने याबाबत आदेश जारी केला आहे.
गोवा सरकारच्या आदेशानुसार, महाराष्ट्र सीमालगतच्या ५ किलोमीटरच्या भागात मद्य विक्रीस पूर्णत: बंदी असेल. १८ नोव्हेंबर सायंकाळी ५ ते २० नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही बंदी असेल. तर, निकालाच्या दिवशी २३ नोव्हेंबर रोजी देखील हा आदेश लागू राहणार आहे.
या भागात परवाना धारक बार आणि रेस्टॉरंट केवळ अन्नपदार्थाच्या विक्रीसाठी खुले राहतील. याठिकाणी मद्य विक्रीस परवानगी राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
तसेच, महाराष्ट्र सीमेलगतच्या पाच किलोमीटरच्या भागात मद्य वाहतुकीस देखील बंदी घालण्यात आली आहे. १८ ते २० नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर या काळात ही बंदी असेल.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. राज्यात सध्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरु आहे. निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये तसेच, मतदारांना प्रलोभने दाखविण्यासाठी मद्य किंवा इतर आमिषांचा वापर होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.