IFFI Safarnama Exhibition 2024
पणजी: ‘सफरनामा’ हे प्रदर्शन कला अकादमीच्या दर्या संगमवर भरले आहे. सूचना मंत्रालयातर्फे आयोजित या प्रदर्शनात भारतीय सिनेमांचा इतिहास उलगडून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘ट्रेन’ या संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’ या प्रदर्शनातून दर्शकांना अनुभवता येईल, असे या उपक्रमाचे संचालक आणि क्रिएटिव्ह हेड त्रिवेंद्र चौहान यांनी सांगितले.
जिथून सुरू झाला तिथपासून आतापर्यंतचा भारतीय सिनेमाचा प्रवास या प्रदर्शनात मांडलेला आहेच पण त्याव्यतिरिक्त भारतीय सिनेमा उद्योगाचे महत्त्वाचे आधारस्तंभ, ज्यांची जन्मशताब्दी यावर्षी साजरी होत आहे.
ते दिग्गज सिनेकर्मी-राजकपूर, तपन सिन्हा, महंमद रफी, आणि एएनआर यांनाही या प्रदर्शनात महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यातील बहुतांश आशय डिजिटल माध्यमातून सादर केला गेला आहे. व्हर्चुअल रियालिटी, ऑर्गुमेंटेड रियालिटी, थ्रीडी रिप्लिका या सर्व माध्यमांना जोडून हे प्रदर्शन तयार झाले आहे.
या प्रदर्शनाचा पहिला विभाग भारतीय सिनेमाचे पितामह दादासाहेब फाळके आणि बाबुराव पेंटर यांना समर्पित केला गेला आहे.
या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराला सिनेमा कॅमेऱ्याचा (पंधरा फूट उंच) आकार दिला गेला आहे. त्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून लोकांचा प्रवेश होईल. कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूने जुन्या पद्धतीच्या (सेल्युलॉइड) कॅमेऱ्याच्या अंतर्गत यंत्रणेची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांना कॅमेऱ्याची आतली बाजू कशी असते हे देखील समजून घेता येईल. सिनेमासंबंधीच्या प्रदर्शनाला जर तुम्ही भेट देत असाल तर साहजिकच सिनेमात शिरण्याचा पहिला टप्पा कॅमेराच असायला हवा आणि त्या दृष्टीनेच या प्रवेशद्वाराला तसे स्वरूप दिले गेले आहे.
मुख्य प्रदर्शनाच्या हँगरच्या बाजूला असलेल्या जागेत ‘मनोरंजन विभाग’ असेल. तिथे असलेल्या मल्टिमीडिया वॉलवर कुणालाही लाईव्ह कनेक्ट होणे शक्य आहे. ऑर्गुमेंटेट रियालिटी व्यतिरिक्त एनामोर्फिक स्क्रीन देखील या जागेत लावलेली आहे. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांना विशेषरित्या आमंत्रित केले गेले आहे. त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून विदूषक, जादूगार, पोर्ट्रेट आर्टिस्ट या जागेत कार्यरत असतील. हे प्रदर्शन सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल. रोज संध्याकाळी ७ व ८ वाजता प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून वीस मिनिटे कालावधीचा ‘लाईट एंड साऊंड शो’ सादर केला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.