पणजी: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, हडफडेतील नाईट क्लबला लागलेली आग, चिंबलमधील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्पावरून पेटलेले आंदोलन, गोवा वाचवण्यासाठी सुरू झालेली चळवळ या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेचे पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यात सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. त्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील, याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या अभिभाषणाने या हिवाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री सोमवारीच कामकाज सल्लागार समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत.
मंगळवारपासून पुढील चार दिवस नियमानुसार कामकाज सुरू होणार आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यात खून, बलात्कार, दरोडे, चोऱ्या आदी घटना घडल्या. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
त्यातच ६ डिसेंबर रोजी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबला भीषण आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला. गोवा हे जागतिक पर्यटनाचे केंद्र असल्यामुळे रोमियो लेन क्लबमधील अग्नितांडवाचा विषय जगभर पोहोचला. त्याचा फटका काही प्रमाणात राज्याच्या पर्यटनाला बसला आहे.
पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनात आमदारांनी १७८ तारांकित आणि ५३३ अतारांकित असे एकूण ७११ प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून आमदारांनी आपापल्या मतदारसंघांसह राज्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी काय आणि कशा प्रकारे उत्तरे दिलेली आहेत, हेसुद्धा दिसून येणार आहे.
निवृत्त न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांच्या दहा कलमी मागण्यांसह इतर मागण्यांबाबतही आम्ही सभागृहात आवाज उठवू. रोमियो लेन अग्नितांडव, कायदा-सुव्यवस्था, बेरोजगारी, कचऱ्याची समस्या, सरकारी खात्यांतील भ्रष्टाचाराबाबत सरकारला धारेवर धरू.विजय सरदेसाई, आमदार (गोवा फॉरवर्ड)
सद्यःस्थितीत गोमंतकीय जनतेसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले आहेत. जनतेचे प्रश्न सभागृहात येऊन ते लवकरात लवकर सुटण्याची गरज आहे. त्यावर आम्ही आवाज उठवू. मात्र सभापतींनी आम्हाला वेळ देणे आवश्यक आहे.क्रुझ सिल्वा, आमदार (आप)
निवृत्त न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून माझ्यासह आमदार क्रुझ सिल्वाही सरकारला जाब विचारणार आहेत. गोमंतकीय जनतेला बाधक ठरत असलेले अधिकाधिक प्रश्न सभागृहात आणून त्यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.व्हेंझी व्हिएगस, आमदार (आप)
राज्यात ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, वाढते गुन्हे, रोमियो लेन अग्नितांडव, भ्रष्टाचार आदी विषयांवरून सरकारला घेरण्याची तयारी आम्ही केलेली आहे. सातही विरोधी आमदार संघटितपणे या विषयांवर आवाज उठवून गोमंतकीय जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.