Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: जेवणावळीवर ४३ लाख खर्च

Khari Kujbuj Political Satire: आता पोलीस अधिकारी सुद्धा सत्ताधारी नेत्यांच्या घरी जावून बाप्पासोबत राजकीय आशीर्वाद पाठीवर असावा यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

जेवणावळीवर ४३ लाख खर्च

जुलै ते ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन पार पडले. १५ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत अशा दीर्घकालीन अधिवेशनात १३५ तास ४६ मिनिटे कामकाज चालले. या काळात मंत्री आणि आमदारांच्या जेवणावळीवर ४२ लाख ४७ हजार रुपये खर्च केले. सभापतींनी पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलेल्या डिनरवर ६ लाखांचा खर्च झाला असे आरटीआयखाली मागितलेल्या माहितीतून पुढे आले आहे. १८ दिवसांच्या कामकाजावर वरील खर्च झाला आहे आणि या खर्चावर टीकाही होऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे कमी दिवसांच्या अधिवेशनात रात्री उशिरापर्यंत कामकाज चालायचे तेव्हा कामकाज वृत्तांकन करण्यासाठी थांबणाऱ्या पत्रकारांची जेवणाची सोय केली जात होती. परंतु दीर्घकालीन असलेल्या या अधिवेशनात मात्र सायंकाळी उशिरापर्यंत वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना चहा-बिस्किटांशिवाय काही पर्याय नव्हता.

असाही आशीर्वाद..!

गणेश चतुर्थीनिमित्त राजकीय नेत्यांची गाठीभेटी पाहायला मिळते. यात विरोधी गटातील नेते सत्ताधारी लोकप्रतिनिधींपासून कॅबिनेट मंत्र्यांच्या घरी जावून देवदर्शन घेतात. परंतु या भेटी अनेकदा लोकांसाठी चर्चेचा विषय बनतात. अशातच, आता पोलीस अधिकारी सुद्धा सत्ताधारी नेत्यांच्या घरी जावून बाप्पासोबत राजकीय आशीर्वाद आपल्या पाठीवर असावा, यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. या गाठीभेटीतून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे कुठल्या राजकीय नेत्यांसोबत चांगले हितसंबंध आहेत, याचे दर्शन घडते. सोशल मीडियामुळे या गोष्टी जास्तवेळ लपून राहत नाहीत. तसेच राजकीय आशीर्वादामुळेच आवडीचे पोलीस स्थानकाची जबाबदारी मिळते, याशिवाय वक्रदृष्टी ओढवलीच, तर याच राजकीय पाठिंबा फलदायी ठरतो. त्यामुळे कदाचित झालीच तर बदली किंवा निलंबनाची कारवाई होते. त्यामुळेच तर दर्शनाच्या निमित्ताने गाठीभेटी घेणे पोलीस अधिकाऱ्यांनी हेरले असावे, असे हे सांगायला नको.

कोल्हापूर-गोवा महागडा प्रवास!

कोल्हापूर-गोवा ही विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून गेला की कोल्हापूर, परंतु तीन हजारांवर रुपये तिकीट या प्रवासासाठी असणार आहे. आठवड्यातून दोनदा ही सेवा राहणार असल्याने कोल्हापूरला विमानाने जाणाऱ्यांना एक महिना अगोदर नियोजन करावे लागेल. विमान ये-जा करणारा दिवस असेल तरच ऐनवेळी तिकीट मिळण्याची शक्यता. परंतु कोल्हापूरपेक्षा पुणे आणि बंगळुरूला विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांचे तिकीट दर अडीच हजारांपेक्षाही कमी आहेत. कोल्हापूरला विमान सेवा सुरू होतेय ही बाब चांगली असली तरी या विमानाचे दर परवडणारे नाहीत. हेच दर दीड-दोन हजारांवर आणल्यास नक्कीच ही सेवा फायद्यात चालू शकते. विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांनी विमान तिकीटदराचा विचार करावा एवढेच.

‘त्या’ आदेशाला अर्थ तो काय?

मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत यांनी काणकोणमधील रवींद्र भवनाच्या उद्घाटनास गेल्या वेळी तेथे तेथील सर्व सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तेथील विविध समस्यांचा आढावा घेतानाच तेथील सरकारी कार्यालयांच्या स्थलांतराबाबत काही सूचना तथा आदेश दिले होते. पण त्यानंतर गेल्या काही दिवसांतील घडामोडी पहाता ते आदेश केराच्या टोपलीत तर पडणार नाहीत ना, अशी चिंता काणकोणकरांना पडली आहे. तेथील अग्नीशामक दलाचे तसेच अन्य काही सरकारी कार्यालयांचे स्थलांतर करून लोकांची सध्याच्या जागेत होणारी गैरसोय दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी बजावले होते. मात्र, या स्थलांतराबाबत आता ज्या अडचणी पुढे केल्या जात आहेत ते पहाता ते होणार नाही, असे दिसते. त्यात अडचणी खऱ्याच आहेत की काही अधिकाऱ्यांना ते नकोय, अशी पृच्छाही होत आहे. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

बाशुदेव खरोखर बुडाला का?

सांतइस्तेव्ह येथील फेरीधक्क्यावरून पाण्यात कार बुडून झालेल्या अपघाताची घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली होती. तेव्हापासून या अपघातात कारमधील युवक बाशुदेव भंडारी (गुजरात) बुडल्याची वार्ता पसरली. बाशुदेव गुजरातमधून गोव्यात शिकत असलेल्या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. दिवसभर तो भाड्याच्या कारमध्ये फिरला आणि मध्यरात्री गाडीला धडक बसल्याने किरकोळ अपघात घडला, परंतु त्या गाडीवाल्यांनी बाशुदेवच्या कारचा पाठलाग केला आणि गुगलमॅपवर बाशुदेव वाट चुकला पुढे घात झाला. मांडवी नदी पात्रात कार बुडू लागली आणि त्यातून त्याची मैत्रीण पोहता येत असल्याने काठावर पोहोचली. परंतु बाशुदेवने मैत्रिणीला मी मागून येतो, असे म्हणत तो नक्की गेला कुठे असा प्रश्‍न अजूनही सतावत आहे. त्याचा मृतदेहाचा शोध पोलिसांनी लागोपाठ तीन-चार दिवस घेतला, पण त्याला काही यश आले नाही. पाठलाग करणारी कार हुबळी येथे सापडणे, बाशुदेव न सापडणे यामागे नक्की गुपित काय आहे, याचा उलगडा कधी होणार हा प्रश्‍न.

हे कदापि शक्य नाही!

देशभर सध्या बंगालमधील शिकाऊ डॉक्टरवरील बलात्कार व तिचे खून प्रकरण चांगलेच चर्चिले जात आहे. बंगालमध्ये या विषयाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढल्याने अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर कोटी करीत दहा दिवसांत अशा घटनातील आरोपींना फाशी देण्याचे विधेयक आणले जाईल असे घोषित केले होते. परंतु आता त्यांनी एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकात या विधेयकाविषयी ‘अपराजीता विधेयक‘विषयी माहिती दिली आहे. याविषयी पूर्ण पानाची जाहिरात जनतेच्या माहितीसाठी बंगाल सरकाने प्रसिद्ध केली आहे. परंतु या जाहिरातीत बलात्काराची घटना घडल्यास त्याचा निकाल जलदगतीने जाईल असे म्हटले आहे. दिल्लीतील निर्भया खूनप्रकरणातील चार आरोपींना जलदगती न्यायालयाने ठरविलेली फाशीची शिक्षा अंमलात आणण्यासाठी दीर्घ काळ लागल्याचे उदाहरण समोर आहे. तरीही बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बलात्कारप्रकरणी जलदगतीने फाशीची शिक्षा देण्याशिवाय व्यवस्था उभारण्याचे दिलेले आश्‍वासन आकारास येईल, पण कृतीत येण्यास तशी न्यायव्यवस्थाही हवी ना!

अजूनही कुडचडे साफ होईना!

ऐन चतुर्थीच्‍या काळात कुडचडेच्‍या बाजारात विक्रेत्‍यांनी टाकून दिलेला भाजीपाला सडल्‍याने स्‍थानिकांना दुर्गंधीला कसे सामोरे जावे लागते हे काल आम्‍ही याच स्‍तंभातून आमच्‍या वाचकांच्‍या नजरेस आणून दिले होते. त्‍याचा परिणाम म्‍हणून की काय, या भागाची काही प्रमाणात सफाई सुरू झाली. असे जरी असले तरी भर बाजारात साचलेली ही घाण अजूनही तशीच पडून आहे. कुडचडेच्‍या सफाईसाठी पालिका एका खासगी कंत्राटदाराला जो आपण कचरा व्‍यवस्‍थापनात तज्ञ म्‍हणतो, त्‍याला अडीच कोटींची वर्षाकाठी बिदागी देते. याच कंत्राटदाराला या बाजारात असलेल्‍या फूड कोर्टचे कंत्राट मिळाले आहे. असे असतानाही फूट कोर्टच्‍याच बाजूला होत असलेली ही घाण या कंत्राटदाराच्‍या नजरेस पडत नाही का, की आपल्‍यावर गॉडफादरचा वरदहस्त असल्याच्या अविर्भावात वागत असावा आणि त्यामुळेच या सफाईकडे दुर्लक्ष होत असावे.

नव्या राजकीय समीकरणांचे हे संकेत!

गोव्यात गत विधानसभा निवडणुकीनंतर नवी राजकीय समीकरणे जन्मास आली. निवडणुकीत एकमेकांविरुध्द उभा असलेला म.गो. पक्ष नंतर सत्ताधाऱ्यांच्या केवळ जवळच पोचला नाही तर सरकारांतही सहभागी झाला. गोष्ट तेवढ्यावरच थांबली नाही तर काही अपक्षही सरकारचे मित्र बनले. कुडतरी, कुठ्ठाळी तसेच डिचोली येथील अपक्षांचा त्यांत समावेश आहे. विशेषतः डिचोली येथील अपक्ष डॅा. शेट्ये हे तर भाजपचेच असावेत, असे अनेकांना आता वाटत आहे. तेथील भाजपवाल्यांनाही आता तसे वाटू लागले आहे. परवा गणेशचतुर्थीनिमित्त शेट्ये व भाजप अध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडील विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांच्या , विशेषतः विरोधी गटांतील नेत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या डिचोलीत भाजपचा स्वतःचा उमेदवारच उरलेला नाही, इतके दोतोर शेट्ये भाजपमय झाले आहेत. मात्र, हे सांगताना काँग्रेसनेही डिचोलीवर पाणी सोडले आहे का, यावर हा पक्ष चुडीचूप बसला आहे. त्यामुळे नवीन राजकीय समिकरणे तर डिचोलीत साकारत नसावीत ना असे वाटले तर त्यात गैर काहीच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

SCROLL FOR NEXT