खरी कुजबुज: आमदारांमधील स्वच्छतेची स्पर्धा!

Khari Kujbuj Political Satire: बाणावलीतील मच्छीमारांचे नेते पेले फर्नांडिस हे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना आपले राजकीय गुरू मानतात
Khari Kujbuj Political Satire: बाणावलीतील मच्छीमारांचे नेते पेले फर्नांडिस हे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना आपले राजकीय गुरू मानतात
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

आमदारांमधील स्वच्छतेची स्पर्धा!

सध्या सासष्टीच्या काही आमदारांमध्ये मतदारसंघ चकाचक करण्यासाठी मोठी स्पर्धा लागलेली दिसते. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी एक ते दीड महिन्यापूर्वी फातोर्डा चकाचक करण्याचा चंग बांधला होता. यामागे कारण होते ते म्हणजे मडगाव नगरपालिकेकडून त्यांना आवश्‍यक सहकार्य मिळत नव्हते. काही दिवसांपूर्वी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनीही आपला मतदारसंघ स्वच्छ करण्यासाठी स्वत: जेसीबी आणि मजूर आणले. नगरपालिकेत त्यांचीच सत्ता असल्याने हे पाऊल त्यांनी नगरपालिकेविरोधात उचलले नसेल; पण अप्रत्यक्षरीत्या नगरपालिकेलाच पाण्यात दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असे लोकांचे म्हणणे आहे. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनीही चतुर्थीचा मुहूर्त साधून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी तर बाणावली मतदारसंघातील गणेश विसर्जन ठिकाणे स्वच्छ करून टाकली. या सर्वांचा हेतू काहीही असो; पण मतदारसंघात स्वच्छता तरी होत आहे ना! तेवढेच लोकांना हवे आहे. ∙∙∙

त्यांना ‘गिफ्ट’ कोण देणार?

बाणावलीतील मच्छीमारांचे नेते पेले फर्नांडिस हे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना आपले राजकीय गुरू मानतात. कित्येकदा त्यांनी तसे बोलूनही दाखवलेले आहे. ज्यावेळी पेले यांचे साथीदार त्यांना विचारतात की, सरदेसाईंकडून त्यांना कोणते गिफ्ट पाहिजे? तर त्यावर पेले सांगतात की आम्हाला सरदेसाईंनी बाणावलीत फिशरीज खात्याची जी ५० हजार चौरस मीटर जागा आहे ती बोटी ठेवण्यासाठी दिली तर ते केवळ आपल्यासाठीच नव्हे तर बाणावलीतील तमाम मच्छीमारांसाठी मोठे गिफ्ट ठरेल. आता ही जागा बोटी ठेवण्यासाठी पाहिजे म्हणून मच्छीमार गेली चार वर्षे मागणी करीत आहेत. त्यांनी आमदार व्हेन्झी व्हिएगस, राज्यपाल, विजय सरदेसाई नंतर मुख्यमंत्री व आता पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या कानावर ही मागणी घातली आहे. आता नेमके त्यांना हे कोण गिफ्ट देतात ते पाहण्यास बाणावलीकर उत्सुक आहेत. ∙∙∙

गोव्यात मंत्रिमंडळात बदल कधी?

भारताचा स्वातंत्र्यदिन झाला. चतुर्थीचा सणही सुरू झाला आहे. मात्र, आज होणार, उद्या होणार अशी आशा बाळगून मंत्रिमंडळात सामील होण्यास इच्छुक असलेले आमदार मात्र या होणाऱ्या बदलाकडे आशेने पाहत आहेत. मडगावचे आमदार दिगंबर कामत, काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असे बोलले जाते. रमेश तवडकरांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर सभापतीपदी कोण, हा प्रश्र्नही सत्ताधारी भाजपसमोर असेलच. मंत्रिमंडळात समावेश कधी, असे विचारल्यास दिगंबरबाब सांगतात, आपण त्यावर विचार केलेला नाही. मंत्रिमंडळ बदल हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. गेले दोन महिने याविषयावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्येही त्याबद्दल उत्सुकता वाढली तर त्यात नवल ते काय.∙∙∙

मुख्यमंत्र्यांच्या गणेशाचे आमोणकरांकडून दर्शन

गणेशचतुर्थीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सध्या सर्व राजकारणी हे गणेशचतुर्थी उत्सवात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी कोठंबी-पाळी येथील आपल्या मूळ निवासस्थानी गणेशस्थापना केली. मुख्यमंत्र्यांच्या घरी इतर काही राजकीय नेत्यांनीही भेट दिली. चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी भेट देण्याची ही परंपरा आहे. परंतु, प्रत्येकालाच एकमेकांच्या घरी जाणे शक्य होत नाही. मात्र, काहीजण अगदी वेळात वेळ काढून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. त्यात मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचा अग्रस्थानी समावेश होता. आमोणकर यांनी सावंत यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतले तसेच परिवाराची खास चाैकशीही केली. आमोणकरांचा हा फोटो समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरतो आहे. कारण काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमोणकरांना आता मोठ्या जबाबदारीचे वेध लागले आहेत. त्यामुळेच की काय, मुख्यमंत्र्यांच्या घरचा बाप्पा पावावा, म्हणून त्यांनी कोठंबी-पाळी गाठली असावी, असेही बोलले जात आहे. ∙∙∙

युरी दिसले नाहीत!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे सरकारच्या निष्क्रियतेवर आसूड ओढण्यात नेहमीच अग्रेसर असतात. विरोधी पक्षनेते या नात्याने ते सरकारच्या चुकीवर नेहमीच बोट ठेवतात व ठेवायलाच हवे. मात्र, कुटबण जेटीवर गेल्या आठवडाभर डेंग्यू व कॉलराने जे थैमान घातले त्याच्यावर युरीबाब काही बोलल्याचे ऐकले नाही. एवढा मोठा गोंधळ झाला. कॉलरामुळे सहा कामगारांचे बळी गेले. जेटीवर चालेलेल्या गैरकारभाराचे वाभाडे निघाले. मात्र, युरीबाब गप्प. युरीबाब आपण पेडण्याला पोहोचता, मग आपल्या शेजारील गावात कुटबणला एक भेट देऊन बोटमालाकांशी हितगुज का केली नाही? आपल्या कुटुंबातही बोट मालक आहेत मग आपण मागे का? असे आम्ही नव्हे जनता विचारत आहे. ∙∙∙

रस्ते आणि पाऊस

राज्यातील रस्त्यांची स्थिती गंभीर असून ठिकठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत. या परिस्थितीसाठी पावसाला कारणीभूत ठरवून सत्ताधारी मोकळे झाले. या गोष्टीचे पावसाला वाईट वाटले असावे; कारण खड्डे बुजवण्यापुरता ‘ब्रेक’ घेतल्यानंतर पावसाने पुन्हा बरसण्यास सुरवात केल्याने बुजवलेले खड्डे उखडले आहेत. यातून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे आरोप झाल्यानंतर सारे खापर पावसावर फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. वारंवार सरकारच्या बहाण्यांवर पाणी फेरण्यासाठी पाऊस वेळेत हजेरी लावतो. त्यामुळे पुढच्या वेळी तरी रस्त्यांचे काम योग्यरीत्या केले जाईल, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: बाणावलीतील मच्छीमारांचे नेते पेले फर्नांडिस हे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना आपले राजकीय गुरू मानतात
खरी कुजबुज: ...आणि रवींच्या बॅनरवर अवतरले ‘कमळ’!

मंत्र्यांची उडाली झोप!

राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गणेशचतुर्थीपूर्वीच झोप उडवली आहे. त्यामुळे गणेशचतुर्थीनंतर कोणाचे पत्ते कट होणार याविषयी अनेकांना धाकधूक लागली आहे. शिवाय मंत्र्यांच्या समर्थकांसह मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या समर्थकांनाही चर्चेसाठी विषय मिळवून दिला आहे. त्यामुळे गणेशाकडे सध्या मंत्रिमंडळातील सगळेच मंत्री आपले मंत्रिपद शाबूत राहावे म्हणून रात्रं-दिवस मनोमन विनवणी करीत असण्याची शक्यता तसूभरही नाकारता येणार नाही. याशिवाय मंत्र्यांचे समर्थकही आपल्या पात्रांवासाठी आणि मंत्री होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचे समर्थकही आता गणेशाकडे जाहीरपणे नव्हे तर मनातून निश्‍चित गाऱ्हाणे घालत असणार, हे स्पष्ट आहे. अडीच वर्षे का होईना; पण मंत्रिपद मिळावे म्हणून इच्छुकांनी निश्‍चितच नवसही केल्याचे नाकारता येणार नाही. कारण कोणाच्या स्वप्नात कोणताही देव येऊ शकतो, हा ताजा इतिहास आहे. त्यामुळे एक जाणार की चारजणांच्या हाती नारळ पडणार, याविषयी ऐन गणेशोत्सवात भाजपच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेला विषय दिला आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: बाणावलीतील मच्छीमारांचे नेते पेले फर्नांडिस हे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना आपले राजकीय गुरू मानतात
खरी कुजबुज: वीज नसताना चतुर्थीची तयारी कशी करणार?

उकिरडा की चतुर्थीचे कवित्व?

शिमगा संपला तरी त्याचे कवित्व बाकी राहते, असे म्हणतात. तसेच काहीसे सध्या कुडचडे बाजारात झाल्याचे दिसते. कुडचडे ही तशी मोठी बाजारपेठ. आठवडी बाजारात तिथे गर्दी ही रोजचीच. त्यात आता चतुर्थीचा सण. मग या बाजारात गर्दी वाढणे साहजिक आणि मोठी उलाढाल होणेही त्यात येतेच. मात्र, त्याचा फटका सध्या बसला आहे तो कुडचडे येथील लोकांना. कारण बाजार संपल्यावर तिथे जो कचरा पडला होता तो पालिकेने स्वच्छ केलाच नाहीत. त्यामुळे संपूर्ण बाजारालाच उकिरड्याचे स्वरूप आले होते आणि ऐन चतुर्थीत लोकांना बाजारात नाक मुठीत धरून फिरावे लागत होते. आता याला उकिरडा म्हणावा की चतुर्थीच्या नंतरचे कवित्व, असा प्रश्र्न लोकांना पडला आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com