Goa Election: BJP and Congress
Goa Election: BJP and Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Election: भाजप जोमात; कॉंग्रेस कोमात

दैनिक गोमन्तक

मडगाव: विधानसभा निवडणूक (Goa Assembly election) अवघ्या सहा महिन्यांवर आली असताना सत्ताधारी भाजपने (BJP) संपूर्ण राज्यात सभा आणि दौऱ्यांचा धडाका लावला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस (Congress) पक्ष काही दुय्यम नेत्यांची पक्षात खोगीरभरती करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे राज्यात भाजप जोमात आणि काँग्रेस कोमात अशी एकंदर स्थिती आहे. निवडणुकीचाच भाग म्हणून भाजपने याआधी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचा धडाका लावला होता. आता त्यांनी दौरे आयोजित करून प्रत्यक्ष लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आतापर्यत चार मतदारसंघांत असे दौरे झाले आहेत.

मंगळवारी भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी कुंकळ्ळी मतदारसंघात दौरा करताना जे मूळ कार्यकर्ते भाजपापासून दूर गेले होते त्यांना जवळ करण्याचेही काम केले. फातोर्डा येथेही आम्ही आमच्या कार्यकर्त्याना जवळ आणण्याच्या मोहिमेवर आहोत, असे तानावडे यांनी सांगितले. काल त्यांनी फातोर्डा येथील काँग्रेसच्या अल्पसंख्याक नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन ख्रिश्चन अल्पसंख्याकही भाजपबरोबर आहेत, हा संदेश राज्यभर पोहोचविला. काँग्रेस गोटात अगदी सामसूम असून फातोर्डा येथील काँग्रेसचा गट भाजपने फोडूनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर किंवा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या गोष्टीची फारशी दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही. आम्ही फातोर्ड्यात काँग्रेसचा गट पुन्हा बांधून काढू, अशी मोघम प्रतिक्रिया चोडणकर यांनी व्यक्त केली.

रवी नाईक म्हणतात, ती केवळ अफवाच; फोंड्यात गणिते विस्कटली

फोंड्याचे आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी बातमी पसरली होती. मात्र नाईक यांनी ही निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. रवी यांचे पुत्र रितेश व रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रवी यांचा भाजपप्रवेश औपचारिकता मानली जात होती मात्र रवी यांचे पुत्र रितेश यांना फोंड्याचे नगराध्यक्ष करण्यात भाजपला आलेले अपयश पुढील गणिते विस्कटून गेले. केवळ रवी यांचेच नव्हे तर कॉंग्रेसमधील ॲड. रमाकांत खलप, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या नावांची चर्चा होती, मात्र दोन्ही बाजूंनी आजवर या विषयावर कोणी उघडपणे बोलत नसल्याने राजकीय चर्चा अधूनमधून बाळसे धरत असते.

भाजपची रणनीती; पक्षप्रवेशावरही भर

भाजपने विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी जे जे भाजपच्या छत्राखाली येतील त्यांना प्रवेश देण्याचे ठरवले आहे. भाजपने काँग्रेस पक्ष संघटनेला लक्ष्य केल्याचे दिसते आहे. फातोर्डा कॉंग्रेस गट समितीच्या अध्यक्षांसह अनेकांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्याची पुनरावृत्ती इतर ठिकाणी केली जाणार आहे. एका बाजूने भाजपची पक्ष संघटना बळकट करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला फोडाफोडी सुरू ठेवायची अशी ही निवडणूक रणनीती आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये असे अनेक पक्षप्रवेश भाजप कार्यालयात दिसू शकतात.

आमदार पक्ष सोडणार असल्याची पुन्हा चर्चा

फातोर्डा गट काँग्रेसच्या अध्यक्षानी भाजपात प्रवेश केल्याने राज्यात तो चर्चेचा विषय असतानाच बुधवारी पुन्हा एकदा एक माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचा विद्यमान आमदार काँग्रेस सोडणार, असे वृत्त पसरले. अशातच मडगावचे आमदार दिगंबर कामत हे फुटणार अशी अफवा पसरली. या संबंधी दिगंबर कामत याना विचारले असता अशा अफवाना उत्तर देता देता मला कंटाळा आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे याना विचारले असता ही केवळ अफवा आहे.

प्रमुखांकडून आढावा

भाजपच्या पक्ष संघटनेचे काम ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निवडणूक आली की जाग येणारा भाजप पक्ष नव्हे. त्यामुळे वर्षभर विविध वरिष्ठ नेत्यांचे दौरे सुरूच असतात. संघटनात्मक तयारीचा आढावा विविध विभागांच्या राष्ट्रीय प्रमुखांकडून‌ घेतला जात असतो.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

भाजपने स्थिर प्रशासन व विकास या माध्यमातून सरकार चालवले आहे. कॉंग्रेससह इतर पक्षांची स्थिती काय आहे याची माहिती सर्वांनाच आहे. त्यामुळे त्यांचे नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असणे साहजिक आहे. कोण कोण येणार हे पक्षप्रवेश निश्चित होईपर्यंत सांगता येणार नाही.

- ॲड. नरेंद्र सावईकर,

काँग्रेसमधील एक गट प्रचंड नाराज

वेळ्ळी येथे बेंजामिन सिल्वा यांना तर कुंकळ्ळी येथे एल्विस गोम्स यांना पक्षात घेतल्याने काँग्रेसमधील एक गट नाराज आहे. मिकी पाशेको यांना काँग्रेस पक्षात घेतल्यानंतर काँग्रेसला कुठल्याही पक्षाशी युती करण्याची गरज नाही. आम्ही स्वबळावर 21 जागा जिंकू, अशा तऱ्हेची भाषा बोलत असल्याने काँग्रेस खरेच गंभीर आहे का, असा सवाल लोक करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT