पणजी: हडफडे पंचायतीचे सचिव रघुबीर बागकर यांच्यावर गोवा सरकारने बडतर्फीची मोठी कारवाई केली. कर्तव्यात कसूर, गंभीर निष्काळजीपणा आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत त्यांना सेवेतून काढून टाकण्याचा आदेश जारी करण्यात आला. 'बिर्च बाय रोमिओ लेन' या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता, या दुर्घटनेमागे बागकर यांचा प्रशासकीय निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
दरम्यान, पंचायत सचिव म्हणून रघुबीर बागकर यांनी या बेकायदा गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यांना हा नाईटक्लब सील करण्याचे आणि बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या आदेशांची अंमलबजावणी केली नाही. त्यांच्या याच दिरंगाईमुळे क्लब मालकाचे फावले आणि अखेर एका मोठ्या दुर्घटनेत निष्पाप 25 लोकांचे बळी गेले. हा नाईटक्लब कोणत्याही वैध परवान्याशिवाय (Valid Licence) सुरु होता. इतकेच नाही तर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम करण्यात आले होते.
बागकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि सार्वजनिक सुरक्षिततेशी तडजोड केली. नाईटक्लब (Nightclub) बेकायदेशीरपणे चालत असतानाही त्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही, याचे समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात आले. या कारवाईमुळे गोव्यातील इतर पंचायत सचिव आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. कर्तव्यात कुचराई करणाऱ्या आणि बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सावंत सरकारने या निर्णयाद्वारे दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.