फोंडा: राज्यातील युवावर्गाला रोजगारक्षम बनवून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारने ॲप्रेंटिस प्रशिक्षण योजनेला चालना दिली आहे. आतापर्यंत ३२ हजार युवक-युवतींना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. येत्या १ डिसेंबरपासून व्यावसायिक उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही दरमहा २० हजार रुपये देऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात कौशल्य विकास संचालनालयातर्फे आयोजित ॲप्रेंटिस प्रशिक्षणार्थींना नियुक्तिपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, राजीव गांधी कलामंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य प्रितेश गावकर, नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, सरपंच मनीष नाईक, मंत्रालयाचे सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक विनायक कांबळी आणि उपजिल्हाधिकारी कौशिक आमोणकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाच प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, सरकारी स्तरावरही नागरिकांना चांगली सेवा मिळावी आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सरकारने ॲप्रेंटिस योजना सुरू केली. आज विविध क्षेत्रांत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मोठी गरज आहे. त्यामुळे केवळ मिळालेल्या ज्ञानावर समाधान न मानता अधिकाधिक ज्ञान संपादन करून स्वतःला कुशल बनवावे. साडेचारशेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना नियुक्तिपत्रे देण्यात आली. कौशल्याधारित शिक्षणासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या सरकारी खात्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिक्षणाची कास धरा!
मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, शिक्षणामुळे माणूस प्रगत आणि समृद्ध होऊ शकतो. त्यामुळे युवकांनी उच्च शिक्षणाची कास धरावी. सरकारने विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यांचा लाभ घेऊन कुशल मनुष्यबळ बनावे आणि स्वतःबरोबरच राज्याच्या विकासात योगदान द्यावे. स्वागत प्रसाद लोलयेकर यांनी केले, तर गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.