

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांमधील हिंसक वादामुळे चर्चेत आली आहे. पूर्व दिल्लीतील कोटला गावात आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. पवन असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, ही घटना त्याच्या घरापासून अवघ्या काही पावलांच्या अंतरावर घडली. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन घरातील सदस्यांना खेळण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. मात्र, काही वेळातच त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. ही बातमी समजताच घरातील सदस्य घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पवन गंभीर जखमी अवस्थेत नाल्यात पडलेला दिसला. त्याच्या गळ्यावर आणि खांद्यावर चाकूने वार केल्याच्या जखमा होत्या.
कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तातडीने त्याला उपचारांसाठी लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घरापासून अगदी जवळच ही घटना घडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात पवन आणि संशयित मुलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या चार ते पाच दिवस आधी त्यांच्यात भांडण झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. याच जुन्या वादातून शनिवारी पवनवर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
घटनेचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये दोन्ही संशयित दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. या दृश्यांच्या आधारे घटनेच्या वेळी नेमके काय घडले, हल्ल्यात कोणाचा सहभाग होता आणि आरोपी घटनास्थळी कसे पोहोचले, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
दरम्यान, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी जुन्या वादातूनच पवनची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या आरोपांचीही पोलीस पडताळणी करत आहेत.
या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू आहे. या घटनेत आणखी कोणी सहभागी होते का, तसेच हल्ल्याचे नियोजन आधीपासून करण्यात आले होते का, याचाही तपास केला जात आहे. पवनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
या घटनेनंतर पवनच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांमध्येही भीती आणि संतापाचे वातावरण आहे. शाळेत शिकणाऱ्या एका मुलाचा जुन्या वादातून जीव गेल्याने अल्पवयीन मुलांमधील वाढते वाद आणि हिंसक घटनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.