पणजी: गोवा सरकारने चार ‘आक्रमक’ कुत्र्यांच्या जातींवरील प्रस्तावित बंदीचा निर्णय सध्या प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने २३ जातींच्या कुत्र्यांना ‘धोकादायक’ ठरविण्याच्या निर्णयाविरोधात विविध उच्च न्यायालयांत याचिका दाखल झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने पिटबुल, रॉटवायलर, केन कॉर्सो आणि डोगो अर्जेंटिनो या चार कुत्र्यांच्या जातींना ‘आक्रमक’ किंवा ‘फेरोशस’ म्हणून घोषित करून त्यांच्या पालनावर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव तूर्त गुंडाळल्यातच जमा झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी केंद्राच्या निर्णयाविरोधातील न्यायालयीन प्रकरणांचा निकाल लागण्याची सरकार प्रतीक्षा करणार आहे.
पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने देशभरातील काही कुत्र्यांच्या जातींवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाविरोधात केरळ आणि दिल्ली उच्च न्यायालयात प्रकरणे दाखल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गोव्यातील प्रस्तावित निर्णय प्रलंबित ठेवण्याचे सरकारने ठरविले आहे.
१७० पैकी १६६ जणांचा विरोध
गोवा सरकारने संबंधित जातींना ‘आक्रमक’ घोषित करण्यापूर्वी नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्याला १७० जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी तब्बल १६६ जणांनी सरकारच्या प्रस्तावाला विरोध केला, तर केवळ पाचजणांनी चार जातींना ‘आक्रमक’ घोषित करण्याच्या बाजूने मत व्यक्त केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हरकतदारांचा मुख्य मुद्दा असा होता की केवळ जातीच्या आधारावर एखाद्या कुत्र्याला ‘आक्रमक’ ठरविणे योग्य नाही. कोणताही कुत्रा विशिष्ट परिस्थितीत आक्रमक होऊ शकतो, त्यामुळे मालकाची जबाबदारी, कुत्र्याचे प्रशिक्षण, त्याचे संगोपन आणि सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर ठेवलेले नियंत्रण या बाबी अधिक महत्त्वाच्या असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सुरुवातीला पाच जातींचा प्रस्ताव
पशुसंवर्धन विभागाने सुरुवातीला पाच जातींना ‘आक्रमक’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यात पिटबुल, रॉटवायलर, केन कॉर्सो, डोगो अर्जेंटिनो आणि बेल्जियन मालिनॉइस यांचा समावेश होता. मात्र, मालिनॉइस जातीचा वापर सुरक्षा दलांकडून केला जात असल्याने ते प्रस्तावातून वगळण्यात आले.
गोव्यात जबाबदार मालकीवर भर
गोवा सरकारने यापूर्वीच पाळीव कुत्र्यांच्या जबाबदार मालकीबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. त्यानुसार कुत्र्याला मोकाट सोडणे, सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर नियंत्रण न ठेवणे आणि त्याच्याकडून नागरिकांना किंवा इतर प्राण्यांना इजा होईल अशी परिस्थिती निर्माण करणे यासाठी मालकाला जबाबदार धरता येते.
केंद्राच्या निर्णयामुळे काय झाले?
मार्च २०२४ मध्ये केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने पिटबुल टेरियर, रॉटवायलर, डोगो अर्जेंटिनो, केन कॉर्सो यांच्यासह अनेक जातींना ‘फेरोशस आणि मानवी जीवाला धोकादायक’ म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय घेतला होता. संबंधित जातींच्या पालनावर निर्बंध आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयाला आव्हान देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.