शिवसेनेचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर काय करतात, अशी विचारणा करणारी ‘खरी कुजबूज’ शनिवारी प्रसिद्ध झाल्यावर तातडीने गावकर यांनी ‘गोमन्तक’शी संपर्क साधून आपण सध्या मुंबईत असल्याची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे तालुका प्रमुख नेमले जाणार आहेत. पणजीत मध्यवर्ती ठिकाणी तळ मजल्यावर कार्यालय सुरू करण्याचेही नियोजन मुंबईतील बैठकीत करण्यात येत आहे. शिवसेना अन्यायाविरोधात आवाज निश्चितच उठवणार आहे. सध्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रीत केल्याने माध्यमांत आवाज ऐकू येत नसला तरी शिवसेनेचे प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. ∙∙∙
दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमे तुमसे ऐतबार ना रहा’ हे मुकेश यांचे जुने वेदना देणारे गीत आपण ऐकले असेल. गोवा क्रिकेट संघटनेत जे राजकारण चाललेय.एकमेकांवर कुरघोडीची जी ‘मॅच फिक्सिंग’ चाललीय,ती क्रिकेट प्रेमी पाहतच आहेत. आपल्या राज्याचा संघ रणजीत बाहेरील खेळाडू घेऊनही तळावर राहतो. राज्यातील एकही क्रिकेटर भारतीय संघात सोडा ‘आयपीएल’मध्येही पात्र ठरत नाही, हे जरी सत्य असले तरी ‘जीसीए’वर सत्ता काबीज करण्यासाठी मात्र मोठी राजकीय खेळी खेळली जाते.क्रिकेट संघटनेचे जे बॉस कालपर्यंत गळ्यात गळा घालून वावरत होते. क्रिकेट बरोबरच काणकोण व कुडचडे च्या राजकारणात ‘खेलोबा’ करूया म्हणून नाचत होते तेच आज एक दुसऱ्याचे शत्रू बनलेत. ज्यांनी आपली चेतना जागवून रोहन या क्रिकेटरला संघटनेचा बॉस बनविला, ते आता शंभो शंभो करायला लागलेत. कालचे मित्र आज शत्रू का बनले? कारण काय? ऑफ कोर्स क्रिकेटची श्रीमंती! ∙∙∙
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि गोवा क्रिकेट असोसिएशन त्यांच्या निवडणुकांमुळे सध्या चर्चेत आहेत. ‘जीसीए’चे प्रतिनिधी म्हणून रोहन गावस देसाई यांना मान्यता मिळणार की, नाही हा विषय शनिवारी बऱ्यापैकी चर्चेत होता. ठरावावर सही केली नाही म्हणून मान्यता मिळणार नाही, असे वाटत असतानाच फाईल फिरवून ठराव मंजूर करवून घेतल्याचे पुरावे देसाई यांनी ‘बीसीसीआय’ला देऊन बाजी पलटवली. मात्र, या साऱ्या खेळात पंच मात्र एकच होता. ‘जीसीए’ असो किंवा‘बीसीसीआय’ त्याचे निवडणूक अधिकारी ए. के जोती हेच होते. त्यामुळे त्यांना झालेल्या घोळाबाबत पूर्ण कल्पना असणारच. दोन्ही संघटनांचे एकच निवडणूक अधिकारी असणे या योगायोगाची चर्चा आता त्याचमुळे सुरू झाली आहे. ∙∙∙
स्पष्टपणे बोलणारे आमदार म्हणून मायकल लोबोंची ख्याती आहे. गत सरकारात मंत्री असतानाही ते इतर मंत्री आणि स्वत:च्याच भाजप पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरही टीका करायचे. त्यावरून गत विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा विचार पक्षाकडून सुरू असतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये उडी मारली. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि त्यानंतर लगेचच इतर सात जणांना सोबत घेऊन पुन्हा भाजपात आले. त्यानंतर तरी मायकल शांत बसतील, असे भाजप नेत्यांना वाटत होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून मायकलनी ‘तोच’ कित्ता गिरवण्यास सुरुवात केली आहे. आधी ते मंत्र्यांवर बोलायचे आता मात्र ते गोविंद गावडेंप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांवर घसरत आहेत. शनिवारी कळंगुटमध्ये पत्रकारांशी बोलताना तर त्यांनी सरकारी अधिकारी कामच करीत नसल्याचा दावा केला. ‘कामावर येतात ११ वाजता, बाहेर जातात १२.३० वाजता त्यानंतर पुन्हा येतात ३.३० वाजता आणि घरी जातात ५.३० वाजता. यात ते किती काम करत असतील?’ असा प्रश्न त्यांनी केला. त्यापुढे जाऊन प्रशासकीय प्रमुखच चांगले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. आता गोविंदनंतर मायकलनी सरकारी अधिकारी ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप त्यांचीही गत गोविंदप्रमाणे करणार की, त्यांना वेगळा न्याय देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.- ∙∙∙
यापूर्वी स्वत:ला भाजपचे कार्यकर्ते म्हणवून घेणारे मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक यांचे पुत्र प्रभव नायक यांनी दिगंबर कामत यांच्या विरोधात मडगावात जणू आघाडी उघडली आहे. त्यामुळे भाईंचे भाजपशी असलेले नाते बिघडले आहे, असे लोक आता म्हणू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाई नायक यांनी आपला वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी ‘आप’च्या गाेवा प्रभारी आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिषी मार्लेना या उपस्थित होत्या. भाईचे पुत्र प्रभव नायक यांचा आपशी घराेबा वाढला आहे असे वृत्त असतानाच अतिषी भाईंच्या वाढदिवसाला हजर राहतात, यामागे काय बरे राजकारण असावे? ∙∙∙
आपण चुकीतून शिकण्याची गरज असते. पूर्वी केलेली चूक पुन्हा केली तर ती चूक गुन्हा ठरते. गोव्यात काही वर्षा पूर्वी खासदार खासदार निधीचा उपयोग शाळांना स्कूल बस देण्यासाठी करीत होते. काही खासदारांनी रुग्णवाहिका ही दिल्या. मात्र, या स्कूल बस व रुग्णवाहिका एक दोन वर्षांतच स्क्रॅप झाल्या. राज्य सरकारने शाळांसाठी आता बाल रथ योजना सुरू केली आहे. प्रत्येक शाळेला एक ते दोन बालरथ मिळाले आहेत. असे असताना आता आपल्या खासदारांनी पुन्हा एकदा शाळांना स्कूल बस देण्याची योजना सुरू केली आहे. दक्षिण गोवा काँग्रेस खासदार विरियातो आपल्या परिचयातील शाळांना खासदार निधीतून स्कूल बस भेट देतात, तर राज्यसभेचे भाजप खासदार सदानंद शेट तानावडे आपल्या हितचिंतक शाळांना खासदार निधीतून स्कूल बस भेट देत आहेत. ज्या शाळांना बालरथ मिळालेत त्यांना स्कूल बस देण्याची गरज होती का? शिवाय या शाळांची निवड करण्याची प्रक्रिया कोणती?कोणत्या निकषावर खास शाळांनाच या स्कूल बस भेट मिळतात, असा प्रश्न आम जनतेला पडणे स्वाभाविक आहे. आता या स्कूल बस लवकर स्क्रॅप झाल्या नाही, म्हणजे मिळवले. ∙∙∙
‘मोडलेल्या खुर्साक चेपें कोण काडता ?’ अशी कोकणीत एक म्हण आहे. राजकारण हे व्यसनासारखे असते.ते सुटता सुटत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत जे माजी आमदारांना जनतेने घरी बसवले होते, ते बहुतांश माजी आमदार व माजी मंत्री पाच वर्षांचा ‘कुलिंग पिरियड’ झाल्यावर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्यात सज्ज झालेत. वेळ्ळीचे माजी आमदार व माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी पुन्हा निवडणुकीत उतरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफास डायस म्हणतात की, भाजप उमेदवारी देवो अथवा ना देवो, मी रिंगणत आहे. माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तर सतत मतदारांच्या संपर्कात आहेत. काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी तर कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केली आहे. पार्सेकर आज कोणत्याही राजकीय पक्षात नसले तरी आमदार म्हणूनच आपण राजकारणातून निवृत्ती घेणार, असा प्रण पार्सेकर सरांनी केला आहे. ही नामावली बरीच लांब आहे. आता वेगळे पडलेल्या या माजींना मतदार आजी करणार? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.