Gawandali Flyover Dainik Gomantak
गोवा

Gawandali Flyover: गवंडाळी उड्डाणपुलाचे काम ठप्पच, बंदी आदेशाची पायमल्ली; वाहतूक सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष

Gawandali flyover work stalled: गवंडाळजुने गोवे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या अत्यंत संथगतीने सुरू असून पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

खांडोळा: गवंडाळजुने गोवे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या अत्यंत संथगतीने सुरू असून पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर झाली आहे. संबंधित प्रकल्पासाठी ३० मे २०२६ पर्यंत रस्ता ठराविक वेळेत बंद ठेवण्याचे आदेश गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी कामात वारंवार अडथळे निर्माण होत असून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर गंभीर परिस्थिती कायम असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दोन्ही बाजूंनी वाहतूक नियंत्रणाचा अभाव असल्यामुळे काम करणाऱ्या यंत्रणेला मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. शासकीय आदेशाचा फज्जा उडाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून संबंधित विभागांच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका होत आहे.

प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, हा मार्ग रात्री ९ ते सकाळी ६ आणि सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार होता, तर सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेतच वाहतूक सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. या वेळापत्रकाची जाहिरात विविध वृत्तपत्रांमधूनही करण्यात आली होती. कुंभारजुवे व जुने गोवे येथे बॅरिकेट उभारून नोटिसा लावण्यात आल्या असल्या, तरी वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेकजण बॅरिकेट हटवून थेट मार्गावरून वाहने चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे.

शुक्रवारी (ता. ३) परिस्थिती अधिकच चिंताजनक होती. जुने गोवे बाजूला वाहतूक पोलिस तैनात असल्याने गवंडाळीकडे जाणारी वाहने काही प्रमाणात अडवली जात होती. मात्र, कुंभारजुवे बाजूला कोणतीही पोलिस व्यवस्था नसल्याने माशेल, साखळी, या भागांतून येणारी वाहने थेट उड्डाणपुलाच्या परिसरात पोहोचत होती. वाहनांची मोठी वर्दळ सुरू असल्याने कामाच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान रेल्वे गेट बंद झाल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचेही चित्र दिसले.

सुमारे ३८ कोटी रुपये खर्चाच्या या उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात अपेक्षित वेगाने होत नसल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या बांधणीचे काही काम सुरू असले, तरी मुख्य संरचनेतील खांबांवर कमानी चढवण्याचे महत्त्वाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ठेकेदार कंपनीकडे कामगारांची संख्या अत्यल्प असल्याचेही समोर आले आहे. त्यातच रात्रीच्या वेळेत कोणतेही काम होत नसल्याने दिवसाच्या मर्यादित वेळेतच काम केले जात आहे.

प्रकल्प लांबणीवर!

स्थानिक आमदारांनी पूर्वी ३० मेपर्यंत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, सध्याची कामाची गती पाहता ही मुदत पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. अगदी डिसेंबरपर्यंतही हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही, याबाबतही अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा उड्ढाण पूल प्रकल्प लांबणीवर पडण्याचीच अधिक शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी व स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन कामाला गती द्यावी, वाहतूक बंदीची कडक अंमलबजावणी करावी आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा प्रकल्प आणखी लांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nashik Car Accident: नाशिक हादरलं! आनंदाचा प्रवास ठरला मृत्यूचा सापळा, कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 6 चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीसाठी भरपगारी सुटी जाहीर; रोजंदारी, कंत्राटी कामगारांसाठीही सुटी अनिवार्य

Goa Unseasonal Rain: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण! शनिवारी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

गोव्याचे अस्सल 'गोंयकारपण': खाजन शेती, मानशी आणि शिरदोण खाडीच्या काठावरील लोकजीवन

VIDEO: ट्रम्प यांची उडाली झोप अन् पेंटागॉन हादरलं! इराणी माऱ्यात महासत्तेचं 'A-10' विमान खाक; होर्मुझच्या आकाशात रचला मृत्यूचा सापळा

SCROLL FOR NEXT