Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: वीज नसताना चतुर्थीची तयारी कशी करणार?

गोमन्तक डिजिटल टीम

वीज नसताना चतुर्थीची तयारी कशी करणार?

‘इफ यू फेल टू प्लॅन, इटस् श्युअर यू प्लॅन टू फेल’ असे इंग्रजीत एक बोधवाक्य आहे.आपल्या सरकारला व सरकारी अधिकाऱ्यांना नियोजन म्हणजे काय? हे समजते का? असा प्रश्न त्यांच्या कामाची वृत्ती पाहिली तर पडतो. पावसाळ्यात रस्ता खोदणे. गटारांवर रस्त्यापेक्षा उंच लाद्या टाकणे. नको तिथे गतीरोधक बसविणे. हे सगळे अयोग्य नियोजनाचे नमुने आहेतच. चतुर्थी हा सगळ्यात मोठा सण. या उत्सवाचे वेध महिनाभर आधीच लागतात.चतुर्थीला आठवडा आहे, तेव्हापासून तयारी सुरू जिथे. वीज खात्याने चतुर्थीच्या तोंडावर बुधवार,४ रोजी कुंकळ्ळीत वीज दुरुस्तीचे काम ठेवले असून दुरुस्तीसाठी दिवसभर वीज पुरवठा खंडित राहणार आहे. जे लोक शहरात राहतात, ते याच दिवसात चतुर्थीची तयारी करतात. आता दिवसभर वीज नसली तर तयारी कशी होणार राव? असा प्रश्‍न कुंकळ्ळीतील गणेशभक्तांना पडला आहे. ∙∙∙

आव्हानांचा डोंगर

गोव्‍यातील भाजप नेत्यांसमोर कोकणात विधानसभा निवडणूक जिंकण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. कोकणातील सर्व मतदारसंघांची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे देण्यात आली आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर कोकणातील वातावरण बिघडले आहे. लोकसभा निवडणुकीत राजापूर लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी मिळवलेला विजय ही जमेची बाजू आहे. महाराष्‍ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भाजपची महायुती आहे. नेत्यांच्या पातळीवर मनोमीलन झाल्याचे चित्र तयार केले जात असले तरी कार्यकर्त्यांच्या पातळीवर संघर्ष कायम सुरूच असतो. त्यामुळे गोव्यातील भाजप नेत्यांसाठी ही निवडणूक डोकेदुखी ठरण्याचीच चिन्हे अधिक आहेत. ∙∙∙

शोधता शोधता आले नाकीनऊ

‘आयपीसी’मधून पोलीस तपास भारतीय न्‍याय संहितेमध्‍ये प्रवेश करता झाला आहे. मात्र, त्‍यामुळे पोलिसांची गोची होऊ लागली आहे. पूर्वीच्‍या ‘आयपीसी’तील कलमे तोंडपाठ असलेल्‍या पोलिसांना नवीन भारतीय न्‍यायसंहितेतील कलमे शोधणे एक आव्‍हान बनलं आहे. चार दिवसांपूर्वी किनारपट्टी भागातील पोलिस कोलवा पाेलिस स्‍थानकावर आपली बदनामी केली याची तक्रार नोंदवण्‍यासाठी दुपारी चार वाजता हजर झाले होते. मात्र त्‍यांना रात्री दहा वाजेपर्यंत पोलिस स्‍थानकावरच वाट पहात उभे रहावे लागले. नव्‍या न्‍याय संहितेत बदनामीचे कलम काय हे कळण्‍यासाठी पोलिसांना चार तास कष्‍ट करावे लागले. सध्‍या गुगल सर्च केल्‍यास कुठलीही माहिती विनासायास मिळू शकते. कोलवा पोलिसांना याची कल्‍पना नव्‍हती का? ∙∙∙

क्रूझ बनले ‘नायक’

‘नायक’ या हिंदी चित्रपटात अनिल कपूर यांनी लोकांमध्‍ये जाऊन लोकांचे प्रश्‍न समजून घेणारा मुख्‍यमंत्री, अशी प्रतिमा सादर केली होती. आता त्‍यापासून प्रेरणा घेतल्‍यामुळे असेल की काय, हे माहीत नाही. पण वेळ्‍ळीचे आमदार क्रूझ सिल्‍वा यांनी दोन दिवसांपूर्वी कदंब बसमधून प्रवास करत महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्‍यांना कशाप्रकारच्‍या समस्‍यांना सामोरे जावे लागते याचा स्वतः प्रत्‍यय घेतला. त्‍यांनी अनिल कपूर सारखीच झटपट कामगिरी करत एका विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले. यामुळे क्रूझ यांचे नाव सगळीकडे झाले असून क्रूझ यांना आता ‘नायक’ म्‍हणून सगळीकडे ओळखले जाऊ लागले आहे. ∙∙∙

पुन्हा मराठी-कोकणी वादाला फोडणी

विधानसभा अधिवेशनात रोमी कोकणीबाबत मुद्दा उपस्थित झालेला असला तरी त्या संदर्भातील ठराव काही दाखल झाला नाही. सध्या ग्रामसभांत त्या बाबतचे ठराव संमत करण्याचे पेव फुटले आहे. पण त्यातून काही साध्य होईल, असे वाटत नाही. पण त्या नंतर ‘ज्ञानपीठ’वाले भाई मावजो यांनी राजभाषा ठरावाबाबत केलेल्या निवेदनावरून काही मंडळी जे रणकंदन माजवत आहेत त्यांतून मात्र गोवेकरांमध्ये भाषावादावरून फूट पडणार नाही ना, अशी चिंता या प्रकरणाकडे तटस्थपणे पहाणाऱ्यांना वाटू लागली आहे. रोमी प्रश्‍नावरून विशेष काही होणार नाही, पण पुन्हा मराठी-कोकणीचा मुद्दा वा वाद उपस्थित झाला तर मात्र गोवेकरांसाठी तो त्रासदायक ठरण्याची भीती ही मंडळी व्यक्त करत आहे. तशातच राजभाषा विधेयकाचा मसुदा तयार करणारेही राजभाषा कायद्यावर बोलू लागल्याने खरेच त्यातून काही साध्य होणार का, असा प्रश्‍न जाणकारांना पडू लागला आहे. खरे तर मराठी-कोकणीचे वा खुद्द राजभाषेचेही आताच्या पिढीला काहीच पडून गेलेले नाही, हा खरा चिंतेचा विषय आहे. पण या पिढीला आपल्या भाषेकडे आकर्षित करण्याऐवजी जो उठतो तो मराठी-कोकणीवर सध्या बोलताना दिसत आहे. ∙∙∙

असाही एक ‘आदर्श’ वाढदिवस !

‘फुलू खुस्तार खोजने’, अशी कोकणीत एक म्हण आहे.आपल्या राजकारण्यांना सरकारच्या किंवा ज्या संस्थांत त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या बळावर आपला बडेजाव मिरविण्याची हौस असते.काही राजकारणी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करतात. तर काही निवृत्त राजकारणी या संस्थांचे अध्यक्षपद भूषवितात. त्या संस्थेच्या नावावर कार्यक्रम आयोजित करून आपला वाढदिन साजरा करतात.दक्षिण गोव्यातील एका बुजुर्ग राजकारण्याने आपल्या वाढदिनी संस्थेच्या नावाने शेतकरी मेळावा आयोजित केल्याची चर्चा भागधारकांत सुरू आहे. शेतकरी चतुर्थीच्या तयारीत असताना मेळावा आयोजित करण्याचे प्रयोजन ‘बळी राजाचे हित की, साहेबांचा वाढदिवस’ यावर कोण प्रकाश टाकणार?. ∙∙∙

‘कदंब’ च्या अधिकाऱ्यांनो जरा इथे लक्ष द्या!

कदंब बस महामंडळ या ना त्या कारणांनी सदैव चर्चेत असते. आता बघा - मडगाव ते पणजी व पणजी ते मडगाव या मार्गासाठी प्रवास दर वेगवेगळे असू शकतात का? पण शटल सेवा मडगावात ४५ रुपये तर पणजी काऊंटरवर ५० रुपये आकारतात, असे अनुभव आलेल्या प्रवाशानेच सांगितले. दुसरे मडगावात ५० रुपये दिले तर ५ रुपये परत केले जात नाहीत.डिजीटल पेमेंटच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी इथे ‘यूपीआय’ द्वारे पैसे देण्याची सोय नाही. तर डिजीटल पेमेंट यंत्रणेत बिघाड झालाय, असे सांगितले जाते. पाच रुपयांची तफावत फारशी वाटत नसली तरी, ते जातात कुणाच्या खिशात? कदंब महामंडळाच्या अधिकाऱ्यांनो याकडे जरा लक्ष असू द्या, असं या प्रवाशांचं सांगणं आहे. ∙∙∙

पुरवठादार संशयाच्या घेऱ्यात

सध्या ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ मागवणे सवयीचे झाले आहे. पर्वरी येथे पकडण्यात आलेला संशयित चोरटा हा अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या दुचाकी स्वारांसारखा वेश परीधान करून टेहळणी करायचा आणि नंतर चोरी करायचा , अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. यामुळे पुढील ऑर्डर मोबाईलवर मिळवण्यासाठी एखादा डिलीव्हरी बॉय कोणत्या घरालगत थांबला तर असे का थांबला अशी विचारणा होऊ लागली आहे. लोक सगळ्यांकडेच संशयाने बघू लागले आहेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT