Ganesh Chaturthi 2023: दांडूसवाडा, मांद्रे येथील अनिल आणि राम आसोलकर हे दोघे बंधू वडिलांकडून मिळालेल्या चित्रशाळेचा वारसा पुढे चालवत आहेत. या चित्रशाळेत केवळ चिकण मातीच्या मूर्ती घडविल्या जातात.
व्यवसाय म्हणून नव्हे तर मूर्तीरूपी गणेशाची सेवा या नजरेतून हे बंधू या कलेकडे पाहतात. पैशांपेक्षा कलेला महत्त्व देतात, त्यामुळे अनेक गणेशभक्त या चित्रशाळेशी जोडलेले आहेत.
अनिल आसोलकर हे मूर्तीकार, चित्रकार आणि नाट्य दिग्दर्शक देखील आहेत. ते सांगतात की, आपले ज्येष्ठ बंधू राम यांच्याकडून आपण मूर्तीकलेचा वसा घेतला. वडीलबंधू आपल्यासाठी गुरुस्थानी आहे.
वडिलांचा चित्रशाळेचा वारसा आम्ही चालवत आहोत. व्यवसाय म्हणून नव्हे तर मूर्तीरुपी गणेशाची सेवा या दृष्टीने आम्ही या कलेकडे पाहतो. या कलेतून आम्हाला किती पैसा मिळतो, याचा हिशोब आम्ही ठेवत नाही.
आपले वडीलही असा हिशोब कधी ठेवत नव्हते. राम आसोलकर यांनी सांगितले की, वडिलांची पूर्वी चित्रशाळा आमोणा भागात होती. त्यावेळी एखाद्या गणेशभक्ताकडे मूर्ती नेण्यास पैसे नसले तर वडील केवळ श्रीफळ घेउन मूर्ती देत. आजही आम्ही हा वसा जपतो, असे ते म्हणाले.
14 वर्षांपासून घडवतो सार्वजनिक मूर्ती
अनिल आसोलकर यांनी सांगितले की, दीड फूट ते सहा फुटापर्यंत चिकण मातीची मूर्ती आम्ही घडवतो. मागच्या १४ वर्षांपासून वास्को येथे नौदलातर्फे पूजण्यात येणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती आमच्या चित्रशाळेत घडवतो.
ती मूर्ती पूर्णपणे हाताने घडवलेली असते, असे ते म्हणाले. नवीन कलाकारांना या क्षेत्रात मोठा वाव आहे. या कलेत लक्ष घातले तर येथेही करिअर घडू शकते. या कलेत जे समाधान आहे ते इतर कुठल्याही क्षेत्रात नाही, असेही ते म्हणाले.
अधिकाऱ्यांना ओळखता येत नाहीत !
सरकार चिकण मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांना अनुदान देते, परंतु हल्ली तर प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरही अनुदान लाटण्याचे प्रकार सुरू आहेत.
चित्रशाळेत तपासणीसाठी येणाऱ्या हस्तकला महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चिकण माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस या मूर्तीतील फरकच कळत नाही. तसेच तपासणीसाठी त्यांच्याकडे कोणते तंत्रज्ञानही नसते, याचा गैरफायदा काहीजण घेतात, असे आसोलकर यांनी सांगितले.
दोष गणेशभक्तांचाही... !
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकणाऱ्यांना सगळा दोष देता येणार नाही. दोष गणेशभक्तांनाही द्यावा लागेल. गणेशमूर्ती वजनाने हलकी हवी, असा बहुतांश गणेशभक्तांचा आग्रह असतो.
चिकण मातीची छोटी मूर्ती निवडल्यास वजन कमी भरते, पण येथे गणेशभक्तांमधील स्पर्धा आड येते. शेजारच्या घरात मोठी मूर्ती पूजली जाते म्हणून आपणही मोठी मूर्ती पूजावी या स्पर्धेतून वजनाने हलक्या असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निवडल्या जातात.
मूर्ती लहान असो की मोठी, गणेशाच्या रूपाने आपण माती पूजत असतो, त्यामुळे प्रत्येकाने मातीच्या मूर्तीलाच प्राधान्य द्यायला हवे, असे आसोलकर सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.