Meenaskhi Lekhi Goa Visit: भारतात प्राचीन काळापासून जहाज बांधणीची परंपरा असून येथे जलमार्गाद्वारे प्रचंड व्यापार होत होता. हडप्पा काळातही येथील दर्यावर्दी होकायंत्राचा वापर करत होते. आता हा वारसा जपून ठेवून तो पुढे नेण्याचे कार्य आम्ही केले पाहिजे, असे मत केंद्रीय राज्य संस्कृती मंत्री मीनाक्षी लेखी यांनी व्यक्त केले.
दिवाडी येथे होडी इनोव्हेशन प्रायव्हेट लि. यांच्या प्राचीन शिडाच्या जहाजबांधणी प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव संन्याल, नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार, उपॲडमिरल संदीप मैथानी आणि होडी इनोव्हेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रथमेश दांडेकर उपस्थित होते.
जहाज बांधणीसाठी भारतीय संस्कृती मंत्रालय, होडी इनोव्हेशन प्रायव्हेट लि. आणि नौदल यांच्या करार झाला आहे. भारताला अदभुत सागरी इतिहास आणि वारसा आहे. व्यापार, लष्करी क्षेत्रात भारतीय नेहमीच सागरी मार्गांवर अग्रेसर आहेत. प्राचीन काळी शिडाची जहाजे वापरली जायची. भारतीयांनी खिळे न वापरता, शिडाच्या जहाजांची अनोखी रचना जगासमोर आणली. या कंपनीद्वारे पूर्वीप्रमाणे आता जहाजे तयार होणार आहेत, असे सांगण्यात आले.
शिवरायांच्या आरमाराचा आदर्श
यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनीही स्वत:चे आरमार उभारून समुद्रावर राज्य केले होते. भारतीय नौदलाने आपल्या अधिकृत चिन्हावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा उमटवून शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक कार्याची महती जगभर पोहोचवली आहे.
वाटाड्या भारतीय
वास्को द गामा जेव्हा झांझिबार पोहोचले, तेव्हा त्यांना भारतात येण्याची वाट ही एका गुजराती व्यापारी चंदन यांनी दाखवली. वास्को यांना चंदन यांनी आपल्या जहाजाच्या मागोमाग येण्याची सूचना केली.
त्यावेळी चंदन यांचे जहाज वास्कोच्या जहाजाहून तीनपट मोठे होते. याचा उल्लेख वास्को द गामा यांनी आपल्या डायरीमध्ये केला आहे. ही डायरी ब्रिटीश वस्तुसंग्रहालयात असून तिची एक प्रत भारत सरकारने मिळवली पाहिजे; कारण त्यात आमचा वारसा आहे, असे लेखी म्हणाल्या.
कसे आहे जहाज?
लांबी: २० मीटर, रुंदी: ६.५ मीटर
जहाज बांधणीचा खर्च अंदाजे ९ कोटी रुपये
नोव्हेंबर २०२५ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य.
भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले जहाज बाली यात्रेवर जाणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.