Food Festival Goa 2023: पर्यटन खात्यांतर्गत आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या अथक परिश्रमांतून प्रथमच शहरातील ‘अन्न आणि सांस्कृतिक महोत्सव’ मांद्रे मतदारसंघातील मोरजी या गावात रविवार, 19 ते मंगळवार, 21 रोजी असे तीन दिवस आयोजित केला आहे.
या महोत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या अन्नपदार्थांचे स्टॉल्स ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. रात्री गायिका सोफी चौधरीने सादर केलेल्या गाण्यांच्या तालावर अनेकांनी ताल धरला.
शहरातून थेट ग्रामीण भागात अन्न महोत्सव व त्याला लागूनच सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मोरजी पंचायत क्षेत्रातील विद्याप्रसारक हायस्कूल परिसरात केले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आमदार जीत आरोलकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांच्या उपस्थितीत रविवार, 19 रोजी झाले.
महोत्सवात अन्नपदार्थांचे वेगवेगळे एकूण 40 स्टॉल्स लावले आहेत. त्यामध्ये शीतपेय, मद्य, जेवण आणि त्याला लागूनच स्थानिक व्यावसायिकांचे घरगुती पदार्थांचे स्टॉल्स आहेत.
त्यामध्ये उकड्या तांदळाचा भात, उकड्या तांदळाची पेज, कालवा, चिकन, सागोती, शिरवळे, पुऱ्या, पुरणपोळी, लोणचे, गोड मिठाई, नारळाच्या वड्या, तळलेले मासे हे पारंपरिक पद्धतीच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे आपोआपच खवय्यांची पावले स्टॉल्सकडे वळत होती.
पर्यटकांसाठी आकर्षण
या महोत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवलेले खाद्यपदार्थ आणि त्यांची चव घेण्यासाठी तसेच ते खाद्यपदार्थ कशा प्रकारे बनवले जातात, त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू वापरतात याचे प्रात्यक्षिक काही पर्यटक या स्टॉल्सवर जाऊन पाहत असल्याचे चित्र दिसून येत होते.
शीतपेय किंवा मद्याच्या दुकानांमध्ये गर्दी जरी कमी असली तरी जे पारंपरिक पद्धतीचे स्टॉल्स होते. त्या स्टॉल्सवर मात्र गर्दी उसळलेली दिसून येत होती.
12,000 रुपये भाडे
तीन दिवसांसाठी अन्न महोत्सवाच्या निमित्ताने जे स्टॉल उभारण्यात आले आहेत त्या स्टॉलधारकांना 12,000 रुपये भाडे आकारण्यात आले आहे. मात्र, पेडणे तालुक्यातील जे स्थानिक व्यावसायिक, कलाकार आहेत.
त्यांच्या सोयीसाठी खास आमदार जीत आरोलकर यांनी प्रयत्न करून त्यांना स्टॉल उभारून दिले आहेत. त्याबद्दल अनेक स्थानिक व्यावसायिकांनी आमदार जीत आरोलकर यांचे आभार मानले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.