Advalpal Mining Dispute Panchayat Meeting
डिचोली: खाणीच्या विषयावरून काल अडवलपाल येथे झालेली ग्रामस्थांची बैठक ''मानापमाना''वरून खदखदली. या बैठकीत आक्रमक झालेल्या लोकांनी एका स्थानिक पंचसदस्यांच्या नाकी दम आणला. बैठकीत हल्लाबोल होताच बैठकीस उपस्थित असलेले आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बैठकीत मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वातावरण तापताच ते बैठक सोडून गेले.
शिरसई-अडवलपाल खाण ब्लॉक-५ अंतर्गत येणारी अडवलपालमधील कोळमवाड्यालालागून असलेली जवळील ''फोमेंतो रिसोर्सिस'' कंपनीची खाण सुरू झाली आहे. मात्र मागणी लावून धरली असतानाही मंदिरांसह घरे-दारे खाण लीज क्षेत्रातून बाहेर काढण्याच्यादृष्टीने कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे अडवलपालमधील कोळमवाड्यावरील लोक चिंताग्रस्त आणि अस्वस्थ बनले आहेत. मंदिरांसह आमची घरे-दारे वाचवा, अशी मागणी करीत कोळमवाड्यावरील लोकांनी काल (रविवारी) गावात मूकमोर्चा काढून पंचायतीला निवेदन दिले आहे. मात्र त्याबद्दलल आम्हांला अंधारात ठेवले, असा दावा श्री गोपाळकृष्ण देवस्थानच्या काही महाजनांचा होता. हाच मुद्दा पुढे करून काल रात्री ग्रामस्थांची एक बैठक बोलावली होती.
श्री गोपाळकृष्ण मंदिरात ही बैठक बोलाविण्यात आली होती. ग्रामस्थांच्या विनंतीवरून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे बैठकीला उपस्थित राहिले होते. बैठक सुरू झाली. त्यावेळी या बैठकीत लोकांमध्येच ''मानापमाना''वरून वाद सुरू झाला. उपस्थित असलेल्या एका स्थानिक पंचसदस्याने तोंड उघडले. त्यावेळी लोक आक्रमक झाले. काही ग्रामस्थ संबंधित पंचसदस्याच्या अंगावर धावून गेले. आमदारांसह काहीनी मध्यस्थी केल्याने प्रकरण हातघाईवर येण्याआधीच मिटले. मात्र या वादानंतर बैठकही गुंडाळण्यात आली.
मंदिरांसह घरे-दारे खाण लीजमधून बाहेर काढून गावचे अस्तित्व राखण्यासाठी धडपडणारे अडवलपालमधील कोळमवाड्यावरील लोक आता पुन्हा एकदा संघटित झाले असून, लोकांनी ''फोमेंतो''च्या खाणी विरोधात एल्गार पुकारला आहे. कालच्या बैठकीत झालेला वाद पाहता, भविष्यात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
अडवलपाल येथील काल रात्री तापलेल्या बैठकीचा एक व्हिडिओ आज समाजमाध्यमावरुन फिरत होता. या बैठकीला आमदार डॉ. शेट्ये उपस्थित होते. काल काही लोकांनी पंचायतीला निवेदन दिले आहे. मात्र तसे करताना कोणतीच कल्पना दिली नसल्याने काही महाजन नाराज होते. त्यातूनच बैठकीत वाद झाले, असे आमदार डॉ. शेट्ये यांनी गोमन्तकला सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.