पणजी: वसाहतवादाला झुगारून भारतीयांनी लोकशाही स्वीकारली होती. नव्याने लोकशाही निर्माण झालेल्या भारताकडे सर्वांचे लक्ष होते, अशावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली, ज्याला समाजाने विरोध केला. परंतु मागील दोन दशकांपासासून अघोषित आणीबाणीत आपण जगत आहोत. यावर आवाज कोण उठवणार, असा प्रश्न बिट्स पिलानी, गोवाच्या प्रा. लक्ष्मी सुब्रमण्यम यांनी उपस्थित केला.
‘फिफ्टी इयर्स ऑफ इंडियन इमर्जन्सी, लेसन फॉर डेमॉक्रसी’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार तसेच माजी खासदार कुमार केतकर, पुस्तकाचे संपादक पीटर रोनाल्ड डिसोझा, इकॉनॉमिक आणि पोलिटिकल विकलीचे माजी संपादक गोपाळ गुरू आदी सहभाग झाले होते.
केतकर म्हणाले, आणीबाणीसाठी केवळ इंदिरा गांधी त्यांनाच दोषी ठरवता येणार नाही, तत्कालीन राजकीय, न्यायिक व इतर सर्व घटनांचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल. आणीबाणीसाठी इंदिरा गांधी यांना खलनायक ठरविले जाते परंतु गांधी इतकेच आणीबाणी लादण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना देखील दोषी का समजले जाऊ नये ? तत्कालीन आंतरराष्ट्रीय दबाव, जयप्रकाश नारायण यांची राजकीय आकांक्षा तसेच इतर अनेक पैलूंवर गांभीर्याने विचारमंथन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जयप्रकाश नारायण यांना १९६८ नंतर राजकारण महत्त्वाचे वाटू लागले. इंदिरा हटाओचा नारा देत त्यावेळीचे सर्व विरोधक एकत्र आले तरी देखील इंदिरा गांधी बहुमताचे सरकार स्थापन केले. नंतर गुंगी गुडिया खटकू लागली...यातून अस्वस्थ झालेल्या विरोधी पक्षांना अनेकदा अपयश येऊनही इंदिरा गांधींना हटविण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते ही गोष्ट नाकारता येत नाही, असे कुमार केतकर यांनी सांगितले.
आणीबाणीवेळी अनेकांना वाईट वाटते परंतु या काळात पिळवणूक होणाऱ्या मध्यमवर्गीय आणि दलितांना लाभ झाला. सावकारी, जमीनदारांपासून होणारे त्रास कमी झाले. आणीबाणीच्या काळात प्रशासकीय स्तरावर त्रास व्हायचा परंतु इंदिरा गांधी यांनी आणीबाणी हटवली आणि निवडणुकीला सामोऱ्या गेल्या. सद्यस्थितीत जी अघोषित आणीबाणीची स्थिती आहे ती अतिशय भयानक आहे. आज प्रत्येकजण घाबरलेला आहे, असे मत गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले.
‘फिफ्टी इयर्स ऑफ इंडियन इमर्जन्सी, लेसन फॉर डेमॉक्रसी’ या पुस्तकातून आम्ही आणीबाणी किती चांगली होती किंवा वाईट होती यावर भाष्य केलेले नाही. आणीबाणीचे पुनर्वलोकन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणीबाणीच्या स्थितीतून आपण हेच शिकले पाहिजे की तशी स्थिती पुन्हा घडू नये. घडल्यास मागील त्याच बाबी पुन्हा घडतील.
वसाहतीतून बाहेर आलेल्या आणि लोकशाही स्वीकारलेल्या समाजाचा कशाप्रकारे विकास होत आहे, याचा हा एकंदरीत वस्तुपाठ म्हणावा लागेल. या पुस्तकाच्या माध्यमातून आणीबाणी सर्वांगाने विचार करण्याचा, संशोधनासाठी विविध पैलू पुढे नेण्यासाठीचा महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरणार असल्याचे संपादक पीटर रोनाल्ड डिसोझा यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.