Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, दक्षिणेतील ‘तो’ माजी आमदार कोण?

Khari Kujbuj Political Satire: चार दिवसांपूर्वी कांदोळी किनाऱ्यावर एका देशी पर्यटकाने कारगाडी नेण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी व्हिडिओ काढून हा प्रकार पोलिसांपर्यंत पोचवला.

Sameer Panditrao

दक्षिणेतील ‘तो’ माजी आमदार कोण?

दक्षिण गोव्यात राजकीय रणधुमाळी नेहमीच रंगतदार असते. माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यातील संघर्ष नवीन नाही, पण यावेळी एका माजी आमदाराने थोडी वेगळी चाल खेळण्याचा प्रयत्न केला, असे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. काय घडले तर..? माजी आमदाराच्या विश्वासू माणसाने एका `श्रेया’ला फोन करून विद्यमान आमदाराने सुरू केलेला एक महत्त्वाचा प्रकल्प ‘बेकायदेशीर’ असल्याचे सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्या प्रकल्पाविरोधात एक व्हिडिओ बनवण्याची ‘ऑफर’ दिली. आता ‘श्रेया’ने गावभर हे प्रकरण घातल्याने दक्षिणेतील तो माजी आमदार कोण आणि तो प्रकल्प कुठला याची चर्चा काही थांबत नाही. ∙∙∙

चिरीमिरी द्या, सगळे गुन्हे माफ!

गोव्यात येणारे पर्यटक ‘खा प्या मजा करा’, अशा मूडात असतात. काय वाट्टेल ते केले, तरी चिरिमिरी दिल्यानंतर सगळे गुन्हे माफ, असा काहीसा समज बहुतांश पर्यटकांत पसरल्यामुळे वाहने आपल्याला हवी तशी चालवणे, वाहतुकीचे नियम मोडणे आदी प्रकार सर्रासपणे होताना दिसतात. यापूर्वी किनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली होती, पण चार दिवसांपूर्वी कांदोळी किनाऱ्यावर एका देशी पर्यटकाने कारगाडी नेण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी व्हिडिओ काढून हा प्रकार पोलिसांपर्यंत पोचवला. आता पोलिसांनी नेमके काय केले, कुणास ठाऊक, पण असे प्रकार होणार नाहीत, यासाठी जबर दंड आकारायला हवा. ∙∙∙

सगळेच इतिहासकार!

इतिहास हा विषय लोकप्रिय होऊ लागला आहे, ही आनंदाची बातमी होय. ग्रंथालयात जाऊन इतिहासाचे ग्रंथ धुंडाळून दोन दोन आठवडे त्यात लक्ष घालून वकिलासारखे त्याचे युक्तिवाद चालू आहेत, ही विद्वत्तापूर्ण समाजाची लक्षणे आहेत. एआयआर मॅन्युएलचे समांतर निवाडे म्हणजे ऑथॉरीटीज दाखवून वकील न्यायालयात खटल्यावेळी मखलाशी करतो, तशा तऱ्हेचा पवित्रा व्हिडिओत दिसतोय. साक्षरतेचे प्रमाण गोव्यात फार वरचे असल्याने हा एक विक्रमच ठरत आहे. पुस्तकात असतो, तो संपूर्ण इतिहास असे नव्हे. आई बाळाचे संगोपन करते, बाळाच्या आजारात रात्ररात्र बसून सेवा करते, हे काय कुणी डॉक्युमेंटेशन करतो का? पण घडतो, तो इतिहास. या पुस्तकात हे आहे, त्या पुस्तकात ते आहे, या ऑथोरीटीज होऊ शकत नाहीत. कारण जे लिहिलेले आहे, ते सत्य म्हणून त्याचे ठोस व सबळ समर्थन कसे, कोणी करावे? प्राप्त परिस्थितीत गोव्यात आई, पप्पा, छकुली, बबलू सगळेच इतिहासकार होत आहेत, ही घटना इतिहासात नोंद होईल, हे निश्चित. ∙∙∙

नुवे मतदारसंघात भाजप कसा जिंकेल?

नुवे मतदारसंघ हा ख्रिस्ती बांधवाचे वर्चस्व असलेला मतदारसंघ हे सर्वश्रुत आहे. हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला. विद्यमान आमदार आलेक्स सिक्वेरा हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले म्हणून हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला होणे, महाकठीण हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. आज नुवे भाजप मंडळ समिती सिक्वेरा यांनी जाहीर केली. या ३१ सदस्यांच्या समितीत किमान अर्धे अधिक ख्रिस्ती बांधवांना प्रतिनिधित्व द्यायला नको होते का? केवळ चार ख्रिस्ती कार्यकर्त्यांचा समावेश केल्याने अजून तरी येथील मतदार भाजपकडे अजून आकर्षित झाले नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय २८ ते २९ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात भाजपची केवळ तीन ते साडेतीन हजार सदस्य नोंदणी झाली आहे. या मतदारसंघाची ही परिस्थिती पाहता नुवे मतदारसंघ भाजप जिंकेल कसा? आलेक्स सिक्वेरा भाजप तिकिटावर निवडून येणार कसे? यावर सध्या चर्चा रंगली आहे. ∙∙∙

दामू, विश्वजीत चर्चा

सध्या भाजपच्या सरकारमधील फेरबदलाची मोठी चर्चा आहे. दिल्लीत गुरुवारी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे होते. दोघांचे दौरे स्वतंत्र असले तरी त्यांची भेट भाजपचे सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या कार्यालयाबाहेर झाली. साहजिकपणे दोघांनी काही वेळी चर्चाही केली. ती चर्चा काय झाली याची माहिती त्या दोघांनाच असली तरी ते दिल्लीत भेटले हा राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. ∙∙∙

साहेब, शाळा कधीपासून?

‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी एक म्हण आहे. आपल्याकडे असे अनेक बुधवंत आहेत जे स्वतःला शिक्षण तज्ज्ञ समजतात. काही जणांना बातमीत यायला हवे, म्हणून नको असलेल्या उचापती करण्यात धन्यता वाटते. आता शाळा कधी सुरू कराव्यात, याबद्दल काही जण गोंधळाचे वातावरण निर्माण करीत आहेत. न्यायालयाने शाळा कधी सुरू कराव्यात, याचा निर्णय शिक्षण खात्यावर सोपविला आहे. मात्र काही पालक व शिक्षक शाळा नको, म्हणून आजही आंदोलनाच्या पावित्र्यात वावरताना दिसतात. आजपासून राज्यातील बहुतांश शाळांच्या परीक्षा संपत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षाला एक एप्रिलपासून सुरुवात होणार? सात एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार? की तीन जूनला शाळा सुरू होणार? या बाबत शाळा चालक अनभिज्ञ आहेत. शिक्षण खात्याकडून या संदर्भात कोणतेही परिपत्रक न आल्याने सर्वजण संभ्रमात आहेत. मात्र शाळा एप्रिल महिन्यात नको? असा पवित्रा घेतलेल्या काही शाळा चालकांनी दहावीचे वर्ग मात्र एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ दहावीच्या मुलांवर तापमानाचा परिणाम होत नाही का? की हे सगळे विरोधांसाठी विरोध आहे? ∙∙∙

अविश्‍वास ठरावाचे राजकारण!

फोंडा तालुक्यात सध्या अविश्‍वास ठरावाचे राजकारण सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव आणून हा ठराव संमतही झाला होता. मात्र एकमेकांवरील कुरघोडीमुळे कुर्टी - खांडेपार पंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचपद लटकले आहे. याच पार्श्‍वभूमीवर सध्या मडकई पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला आहे. एरव्ही बहुतांश पंचायतीत सरपंच आणि उपसरपंच पद हे अंतर्गत करारानुसार निर्धारित वेळेपुरते मर्यादित असते, पण कुर्टी - खांडेपार आणि मडकई पंचायतीत तसा काही प्रकार नव्हता, मात्र अविश्‍वास ठराव आणल्यामुळे या दोन्ही पंचायतीतील राजकारण गतिमान झाले आहे, अशी चर्चा सध्या चालली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT