Vayangani Farming Problems In Goa
डिचोली: खरीप भात पीक घेतल्यानंतर डिचोलीतील मये भागात सध्या वायंगण भात शेतीची लगबग सुरू झाली असली, तरी बहुतांश शेतकरी यंदा वायंगण शेती करण्याबाबत अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. शेतीत साचलेला गाळ त्यातच वाढती महागाई आदी काही कारणांमुळे शेतकऱ्यांनी यंदा वायंगण शेती करण्याकडे पाठ फिरविल्याचे काही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांची अनास्था पाहता, मये गावात यंदा ५० टक्क्यांहून अधिक वायंगण शेतजमीन पडिक पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा मये भागात वायंगण शेती लागवडीचे प्रमाण घटणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या बाजूने मये भागात काही मोजक्याच शेतकऱ्यांनी पारंपरिक वायंगण शेती करण्याकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे. सध्या नांगरणी आदी शेतजमिनीची मशागत सुरू असून शेतकऱ्यांनी तरवाही पेरला आहे. यंदा वायंगण शेतीच्या कामांना काहीसा उशीर झाला आहे. असे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्य क्षेत्रात येणाऱ्या पिळगावसह मये, बोर्डे, धुमासे - मेणकुरे, कुडचिरे आदी ठराविक भागात अजूनही पारंपरिक वायंगण शेती लागवड करण्यात येते. यंदाही शेतकरी शेतीत उतरले असून वायंगण शेती करण्यासाठी नांगरणी आदी मशागतीची कामे हाती घेतली आहेत. मये भागात ‘हुपळी’ आणि ‘पाटो’ या शेतजमिनीत वायंगण शेती मशागतीची कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. तरी ‘पाटो’ परिसरातील शेती करण्याकडे बहुतेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. दुसऱ्या बाजूने गावकरवाडा भागातील ‘सोनारशेत’ ही शेती करण्यासाठी तर एकही शेतकरी शेतीत उतरला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा मये भागात मोठ्या प्रमाणात शेती पडीक राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मये भागातील शेतकरी पारंपरिक शेती व्यवसायात असले, तरी खनिज व्यवसायामुळे शेती धोक्यात आली आहे. शेतीत गाळ साचल्याने शेती करणे त्रासदायक ठरत आहे. यंदा तर अडचणीत भर पडली आहे. शेतीत यंत्रे काम करीत आहेत. गाळ उपसून शेती वाचवा अशी शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. पंचायतीच्या ग्रामसभेत देखील ठराव घेण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे सरकार वा अन्य संबंधितांचे दुर्लक्षच झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.