
Goa Agriculture Overview 2024
पणजी: गोवा हे देशातील प्रगत राज्य आहे; परंतु ते स्वयंपूर्ण नाही, ही वस्तुस्थिती आहे. गोव्याच्या लोकसंख्येला पुरेल एवढे धान्य, भाजी, दूध किंवा इतर बाबतीत गोवा आपल्या शेजारील राज्यांवर अवलंबून आहे. मात्र, गोवा स्वयंपूर्ण होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि त्या दिशेने पावले उचलत आहे. मोठ्या प्रमाणात युवावर्गही शेती करण्याकडे वळत आहे, ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. सरकार आपल्यापरीने मदत करतेय; परंतु काहीवेळा शेतकऱ्यांसमोर निसर्ग मोठे आव्हान निर्माण करतो.
मागील वर्षभरात गोवा सरकारने शेतीला प्रोत्साहन मिळावे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेती करावी, पशुधन पाळावे यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभही अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतीकडे वळणाऱ्यांची संख्याही वाढते आहे; परंतु काहीवेळा निसर्गाची साथ मिळत नाही.
यंदा पावसाळी भातशेतीत शेतकऱ्यांनी रस दाखविला होता; परंतु जुलै-ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने भातशेतीतसेच बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यावेळी भात कापणीला आले त्यावेळी अवकाळीने गाठले, भातशेती आडवी झाली. भाताला कोंब फुटले; परंतु या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील २,४५३ हून अधिक शेतकऱ्यांना गणेशचतुर्थीपूर्वी सुमारे ३.७० कोटींची नुकसान भरपाई दिली. यंदा कृषी संचालनालयाचे माजी संचालक नेव्हील आल्फोन्सो यांनी एप्रिलमध्ये निवृत्ती घेतली आणि मार्चपासून संचालकपदी संदीप फळदेसाई यांची नेमणूक करण्यात आली.
यंदा काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. काजू उत्पादनात सर्वसामान्यपणे २६ ते २७ हजार टन व त्याहून अधिक होणारे उत्पादन एकदम गेल्यावर्षी २४,२४० टनांवर येऊन पोहोचले. हमीभावात वाढ करण्याचे केवळ शेतकऱ्यांना आश्वासनच मिळाले. गेल्यावर्षी फेणी आणि हुर्राक काढण्यासाठी लागणारे बोंड (मुर्टे) देखील शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आणावे लागले, त्यामुळे गेल्यावर्षी काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले.
यंदा कृषी संचालनालयाने पहिल्यांदाच आंबा महोत्सवाचे आयोजन केले. राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपपल्या भागात विविध प्रकारचे पिकविण्यात येणारे आंबे पणजीतील कला अकादमी येथे मांडले. या महोत्सवाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच गोव्यातील मानकुराद आंबा परदेशात पाठविण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख टिश्यू कल्चरच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले वेलची केळबे वाटण्यात आले. राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभही शेतकऱ्यांनी घेतला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी आभासी स्वरूपात संवाद साधत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.
केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था जुने गोवे यांनी कृषीच्या अनुषंगाने अनेक नवीन संशोधन यावर्षी केले. यात प्रामुख्याने काजूच्या गोवा काजू १ ते ५ अशा प्रजाती तयार केल्या आहेत. तर भाताच्या गोवा धान नामक १ ते ४ नव्या जाती तयार केल्या आहेत.
नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने जीवामृत, घनजीवामृताचे संशोधन करण्यात आले. मत्स्यपालन आणि पशुसंवर्धनाच्या अनुषंगानेदेखील कार्य सुरू केले आहे. हळद प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली त्यामुळे संशोधनाच्या अनुषंगानेदेखील हे वर्ष महत्त्वाचे ठरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.