Excise Department: पेडण्यातील अबकारी कार्यालयातील घोटाळाप्रकरणी तक्रार देऊन तीन महिने उलटूनही त्याची चौकशी प्राथमिक टप्प्यातच आहे. याप्रकरणी तेथील कार्यालयातील काहींना समन्स पाठवून जबान्या नोंदवण्याची काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) सुरू झाली आहे.
या घोटाळाप्रकरणातील कार्यालयातील काही फाईल्स मागण्यात आल्या असूनची त्याची तपासणी सुरू असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या घोटाळाप्रकरणी पेडणे कार्यालयातील वरिष्ठ कारकून हरिष नाईक याच्यासह अबकारी निरीक्षक दुर्गेश नाईक व विभूती शेट्ये या तिघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अबकारी दाखल्याच्या नूतनीकरणासाठी शुल्क घेऊन ते कार्यालयात जमा केले नव्हती. सुमारे १६.८६ लाखांची अफरातफर झाल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची अबकारी आयुक्तांनी प्राथमिक चौकशी करून निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मुख्य संशयितासह इतर दोन निरीक्षकांवर कारवाई केली होती.
या वरिष्ठ कारकूनाने ऑनलाईन शुल्क काही तांत्रिक कारणामुळे बंद असल्याच्या सबबीखाली सुमारे ७४ मद्य विक्रेत्यांच्या नूतनीकरण दाखल्यांचे शुल्क घेऊन ते परस्पर स्वतःसाठी वापरले होते. ही रक्कम खात्याने व्याजासह त्याच्याकडून २७.७८ लाख रुपयांची रक्कम वसूल केली होती.
सरकारने या घोटाळ्याची गंभीर दखल घेऊन त्याचा तपास ‘एसीबी’कडे दिला होता. तक्रार देऊन तीन महिने उलटले तरी अजूनही तिचा तपास प्राथमिक टप्प्यातच आहे. पेडण्यातील त्यांच्यासोबत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना समन्स पाठवून जबान्या नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच चौकशी अहवाल दक्षता खात्याकडे सादर केला जाईल. या घोटाळ्याला जबाबदार असलेल्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
पेडणे अबकारी कार्यालयातील घोटाळा उघड झाल्यानंतर तत्कालिन अबकारी आयुक्तांनी राज्यातील सर्व अबकारी कार्यालयातील ऑडिटचे निर्देश दिले होते. ही तपासणी सुरू आहे.
दाखले नूतनीकरण काही वर्षे झालेच नाही
या खात्याच्या आयुक्तपदी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने व हल्लीच ताबा घेतल्याने त्यांना यासंदर्भात सखोल माहिती नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. किनारपट्टी लाभलेल्या पाच तालुक्यांतील अबकारी कार्यालयांमध्ये दाखल्यांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया काही वर्षे केलेलीच नाही. त्यात बार्देश तालुक्यातील सुमारे १०० हून अधिक मद्य दुकानांचा समावेश आहे.
सुमारे या पाच तालुक्यातून ७.५९ कोटीची तूट असल्याची माहिती महालेखापालांच्या २०२० च्या अहवालात उघड झालेली आहे. या तालुक्यांत तिसवाडी, बार्देश, फोंडा, सालसेत व मुरगाव यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.