पणजी: येथील आझाद मैदानावर सभा घेण्यास पणजी महापालिकेने ऐनवेळी परवानगी नाकारल्यानंतर ‘इनफ इज इनफ’ संघटनेने निर्धाराने घेतलेल्या ऑनलाईन सभेला स्थानिकांसह जगभरातील गोमंतकीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यू-ट्यूब, फेसबुकवर अवघ्या २४ तासांत हजारो नागरिकांनी सभेला उपस्थिती लावली. त्यातील अनेकांनी ही सभा शेअरही केली. त्यामुळे ‘सोशल मीडिया’वरही ‘इनफ इज इनफ’ला प्रसिद्धी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोवा वाचविण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या ‘इनफ इज इनफ’ने ३० मे रोजी आझाद मैदानावर जाहीर सभा घेण्याबाबत पणजी महापालिकेकडे परवानगी मागितली होती. परंतु, महापालिकेने ऐनवेळी सभेस परवानगी नाकारली. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्याचा निर्णय घेतला. ही सभा यू-ट्यूब, फेसबुकद्वारे प्रसारित करण्यात आली.
त्यानंतर अवघ्या २४ तासांत ‘इनफ इज इनफ’च्या यू-ट्यूब अकाऊंटवर सभेला १४ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूव्ज मिळाले. यू-ट्यूबच्या इतर अकाऊंटवर ५४ हजारांपेक्षा अधिक जणांनी ही सभा पाहिल्याचे समोर आले. दुसरीकडे, याच कालावधीत फेसबुकवर
भेला उपस्थिती लावली. तर, त्यापैकी ९० पेक्षा अधिकजणांनी आपापल्या अकाऊंटवरून सभा शेअरही केली.
ऑनलाईन सभेला फर्दिन रिबेलो यांच्यासह गोविंद शिरोडकर, देविदास आमोणकर, स्वप्नेश शेर्लेकर, पद्मश्री नॉर्मा अल्वारिस यांनी संबोधित केले. गोव्याचा वारसा, अस्मिता आणि संस्कृतीबरोबरच रान-डोंगर अबाधित राखण्यासाठी देश-विदेशात असलेल्या गोमंतकीयांनी एकत्रित यावे, अशी भावनिक साद रिबेलो यांनी घातली. तसेच गोवा वाचवण्यासाठी, आपल्या हक्कांसाठी झगडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. नगरनियोजन कायद्याचे (टीसीपी) कलम ‘१६ ब’, पणजीतील कॅसिनो आदींसारख्या विषयांवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
प्रत्यक्ष जाहीर सभेत जे घडले नसते, ते ‘इनफ इज इनफ’च्या ऑनलाईन सभेत घडले. नियोजनाप्रमाणे आझाद मैदानावर सभा घेतली असती, तर उकाड्यामुळे सभेला कमी प्रतिसाद मिळाला असता. परंतु, ऑनलाईन सभेला अपेक्षेपेक्षा अधिक जणांनी उपस्थिती लावल्याचे सोशल मीडियावरील आकडेवारी सांगते, असे फ्रँकी जेरार्ड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर म्हटले आहे.
या ऑनलाईन सभेला केवळ स्थानिकच नाही, तर जगभरातील गोमंतकीयांनी उपस्थिती लावली. त्यामुळे ‘इनफ इज इनफ’ आपला संदेश, भूमिका जगभरातील गोमंतकीयांपर्यंत पोहोचवू शकली, असेही फ्रँकी जेरार्ड यांनी नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.