Guleli Photo
Guleli Photo 
गोवा

‘आयआयटी’ विरोधात एल्‍गार

Premanand Naik

प्रेमानंद नाईक

गुळेली :

आमच्‍या पुर्वजांनी पोर्तुगीजकाळापासून कसलेल्‍या जमिनीवर सरकार ‘आयआयटी’ प्रकल्‍प उभारू पाहत आहे. त्‍यासाठी सरकारने आमच्‍या जमिनी केंद्र सरकारला दिल्‍या. या प्रकल्‍पाबाबत स्‍थानिकांना पूर्णत: डावलण्‍यात येऊन आमच्‍यावर अन्‍याय केला. तरीही आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन पुढे नेत आहोत. सरकारने आमच्‍या सहनशीलतेचा अंत पाहू नये. ग्रामीण भागातील जनता कुठल्या थराला जाऊ शकते, याचे ‘नायलॉन ६६’चे गोव्यात उदाहरण आहे. त्याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये. लोकभावनेचा आदर करून हा नियोजित प्रकल्प त्‍वरित रद्द करावा, असा इशारा शेळ मेळावलीवासीयांनी एकदिवशीय उपोषणाद्वारे दिला. यावेळी पाच ठराव संमत करण्‍यात आले.

गुळेली - सत्तरी येथील होऊ घातलेल्‍या ‘आयआयटी’ प्रकल्‍पाविरोधात मेळावलीतील सुमारे पाचशेहून अधिक लोकांनी एकत्रित येऊन एकदिवशीय आंदोलन केले. येथील सातेरी जल्‍मी देवस्‍थानच्‍या आवारात एक दिवशीय लक्षणिक उपोषणाला राज्‍यातील अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. लाक्षणिक उपोषणाद्वारे विरोधाची धार अधिक मजबूत झाल्‍याचे स्‍थानिकांनी सांगितले.

गुळेली पंचायत क्षेत्रातील मेळावली भागात आयआयटी प्रकल्‍पाला सरकारने जमिनी केंद्र सरकारला दिल्‍या. संपूर्ण योजना स्‍थानिकांना अंधारात ठेवून केल्‍याचा ठपका ठेवत नाराजी व्‍यक्‍त करण्‍यात आली. या प्रकल्‍पामुळे वनसंपदेचा ऱ्हास होईल व अनेक वर्षांपासून कसलेल्‍या जमिनी या प्रकल्‍पामुळे सोडाव्‍या लागणार आहेत. त्‍यामुळे सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी एकदिवशीय उपोषण केल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.

सकाळी साडेनऊ वाजता उपोषण सुरू

रविवारी सकाळी ९.३० वाजता सुरू झालेले उपोषण सायंकाळी ६.३० वा. स्‍थगित करण्‍यात आले. या परिसरात पत्रकार परिषदही घेण्‍यास वाळपई पोलिसांनी मज्जाव केला होता. खबरदारीचे उपाय म्‍हणून साध्‍या वेशातील पोलिस उपोषणस्‍थळी उपस्‍थित होते. उपोषण शांततेत पार पडले.

पाच ठराव संमत

१) ग्रामस्‍थांनी मागणी केलेल्‍या शासकीय पंचायतींच्‍या मार्फत बोलावण्‍यात येणाऱ्या खास ग्रामसभा लवकरात लवकर बोलावण्‍यात यावी

२) ग्रामसभेच्‍या संमतीशिवाय आयआयटी प्रकल्‍पासंदर्भात घेतलल्‍या निर्णयाचा निषेध

३) गुळेली सरपंच, वाळपईचे आमदार यांनी मेळावली पंचक्रोशीत आयआयटी प्रकल्‍पासंदर्भात घेतलेल्‍या भूमिकेबद्दल निषेध

४) आमच्‍या पूर्वजांनी पोर्तुगीज काळापासून जतन केलेल्‍या व कसलेल्‍या शेतजमिनी, जंगलसंपदा कुठल्‍याही परिस्‍थितीत बळकावू देणार नाही

५) आमची देवस्‍थाने व धार्मिक स्‍थळे, नैसर्गिक झरे, नैसर्गिक संपदा यांना हानी पोहोचू देणार नाही

वाढता पाठिंबा

संपूर्ण दिवसभर चाललेल्‍या या लाक्षणिक उपोषणाला गोव्‍यातील विविध भागांतून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक संस्‍था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी उपस्‍थिती लावून आयआयटीला विरोध दर्शवला. यात रिव्‍होल्‍युशनरी गोवाचे मनोज परब, भूमिपुत्र संघटनेचे विश्‍वेश परोब, हरिश्‍चंद्र गावस, आंतोनियो पिंटो, गोंयचो आवाज संघटनेचे स्‍वप्‍नेश, गोवंश रक्षा अभियान गोवा, सत्तरी, डिचोली, बार्देश शेतकरी संघटना, पिसुर्ले शेतकरी संघटनेचे हनुमंत परब, बाबूसो गावडे, जयेश्‍‍वर गावडे, तसेच गोव्‍यातील सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, रामकृष्‍ण जल्‍मी, गाकुवेध गोवा. रुपेश वेळीप, ॲड. सुरेश पालकर, श्रीकृष्‍ण परब, विरेश बोरकर, ॲड. गणपत गावकर यांच्‍यासह अन्‍य समाजसेवक व संस्‍थांनी पाठिंबा दर्शविला.

आज आम्ही सर्व चाळीसही आमदारांना आमचे म्हणणे काय आहे, याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यामुळे कुणीही आम्हाला काही मिळाले नाही, असे म्हणून नये. आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने चालू आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये, आम्ही एकसंघ आहोत आणि एकसंघ राहणार.

- शशिकांत गोविंद सावर्डेकर, मेळावली पंचक्रोशी ग्रामबचाव आंदोलनचे समन्वयक

निसर्गच राहिला नाही, तर...

सोमवारी होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्‍या पार्श्वभूमीवर मेळावलीवासीयांनी एकदिवशीय उपोषण केले होते. तसेच पर्वरी येथील विधानसभेवर मोर्चा नेण्‍याचा ग्रामस्‍थांचा विचार होता. परंतु, १४४ कलम लागू करण्‍यात आल्‍याने मंदिराच्‍या परिसरात सामाजिक सुरक्षित अंतर ठेवत नागरिकांनी बैठक मारली. वय वर्षे दहा ते ऐंशीपर्यंत नागरिकांत मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण उपस्‍थित होते.

श्रावणी रविवार असूनसुद्धा महिलांची मोठी उपस्‍थिती होती. रविवार पूजन म्‍हणजे निसर्गपूजन. निसर्ग जर राहिला नाही, तर पूजा कुणाची करावी, असा सवाल महिलांनी उपस्‍थित केला.

यावेळी राम मेळेकर, पांडुरंग शिवोलकर यांनी उपस्‍थितांना आंदोलनाविषयी माहिती दिली. आयआयटीविरोधातील आंदोलन दडपण्‍यासाठी सर्व मार्गांनी प्रयत्‍न सुरू असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले. त्‍यावेळी उपस्‍थितांनी त्‍याचा निषेध नोंदवला. या उपोषणावेळी महिलांची उपस्‍थिती मोठी होती. यावेळी उन्नती मेळेकर, सिया सावर्डेकर, सडयो मेळेकर, नारायण मेळेकर, सोमनाथ गावकर, सुरेखा मेळेकर, शोभावती मेळेकर यांनी आंदोलनाविषयी विचार मांडले.

गुळेली ग्रामपंचायतीचे पंच सदस्य अर्जून मेळेकर हे सुरवातीपासून आंदोलनकर्त्यांबरोबर आहेत. जर या प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे, तर आपलाही आयआयटी प्रकल्पाला विरोध आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

- अर्जून मेळेकर, गुळेली पंचसदस्‍य

- महेश तांडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT