पणजी : घरगुती आणि कमी दाब (एलटी) वीज ग्राहकांसाठी “टाइम ऑफ डे” (वेळेनुसार दर) प्रणाली सध्या लागू केलेली नाही, असा खुलासा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत केला. मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी ही प्रणाली उच्च दाबाची वीज वापरणाऱ्यांसाठी गेले १० वर्षे लागू असल्याचे नमूद केले.
वीजदरवाढीच्या मुद्यावरून विरोधकांनी घेराव घातल्यानंतर मंत्रालयातील आपल्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ढवळीकर म्हणाले, चुकीच्या समजावर विरोधक आंदोलन करत आहेत. त्यांच्या घेरावांना कोणी घाबरत नाही.
मात्र त्यांनी विषय आधी समजून घेऊन आंदोलन केले पाहिजे. संयुक्त वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात १ ऑक्टोबरपासून वीज दरवाढ लागू झाली असली ती विरोधक म्हणतात तितकी म्हणजे २० टक्के नसून ५ टक्केच आहे. दरम्यान, मंत्र्यांनी यूटर्न घेतल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
ढवळीकरांनी स्पष्ट केले की, घरगुती वीज ग्राहकांना ‘टाइम ऑफ डे’ पुढील तीन वर्षांत लागू केली जाणार नाही, मात्र या महिन्यापासून वीजदरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. ते म्हणाले, “वीजदरात पाच टक्के वाढ १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाली आहे. स्मार्ट वीजमीटर बसवण्याचे काम डिसेंबरपासून सुरू होईल.”
घरगुती वीजदरातील बदल
ढवळीकर यांनी सांगितले की अलीकडील दरवाढ घरगुती ग्राहकांसाठी सरासरी दोन ते अडीच टक्केच आहे, म्हणजेच सुमारे १० पैसे प्रति युनिट इतकी वाढ.
त्यांनी दिलेल्या तपशीलानुसार –
० ते १०० युनिट : ₹१.९० ऐवजी ₹१.९५ प्रति युनिट (२.६% वाढ)
१०१ ते २०० युनिट : ₹२.८० ऐवजी ₹२.९० प्रति युनिट (३.६% वाढ)
२०१ ते ३०० युनिट : ₹३.७० ऐवजी ₹३.९० प्रति युनिट (५% वाढ)
३०१ ते ४०० युनिट : ₹५.९० ऐवजी ₹५.१५ प्रति युनिट (५% वाढ)
४०० पेक्षा जास्त युनिट : ₹५.८० ऐवजी ₹६.२० प्रति युनिट
फर्नाडिस यांनी सांगितले, की औद्योगिक (एचटी) ग्राहकांसाठी ‘टाइम ऑफ डे’ मीटरिंग आधीपासूनच लागू आहे आणि त्यातही थोडेसे बदल करून सवलती देण्यात आल्या आहेत. औद्योगिक ग्राहकांसाठी दर तीन गटांमध्ये विभागले गेले आहेत — सामान्य वेळ (सकाळी ९ ते सायंकाळी ५) : दर शंभर टक्केच राहील.
गर्दीची वेळ (सायंकाळी ५ ते रात्री १) : १३० टक्क्यांवरून १२० टक्क्यांवर कमी करण्यात आला आहे. रात्रीची वेळ (रात्री १ ते सकाळी ९) : ८० टक्क्यांवरून १०० टक्क्यांवर वाढवण्यात आली आहे.
फर्नांडिस यांनी सांगितले की, ६.८० लाखांपैकी सुमारे ६.४५ लाख घरगुती ग्राहकांनी आधीच आपले मीटर घराबाहेर बसवले आहेत. वीजचोरी तपासणी व मीटर वाचन सुलभ व्हावे यासाठी मीटर बाहेर ठेवणे आवश्यक आहेत.
मीटरिंग ही अशी प्रणाली आहे ज्यामध्ये वीजदर दिवसातील वेळेनुसार बदलतो दिवसभरातील कमी वापराच्या वेळेत दर स्वस्त आणि जास्त वापराच्या वेळेत दर अधिक असतो. देशाच्या इतर राज्यात ही प्रणाली लागू असल्याचा दावा ढवळीकर यांनी केला.
विरोधकांनी रात्रीच्या वीजदरात २० टक्के वाढ होणार असल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना ढवळीकर म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. नागरिकांनी आणि विरोधकांनी प्रत्यक्ष आकडे समजून घेतले पाहिजेत, अनावश्यक आंदोलन करू नयेत.”
ढवळीकर यांनी सांगितले, की डिसेंबर २०२५ पासून राज्यातील सुमारे ६.८० लाख घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट वीजमीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया प्रथम शासकीय कार्यालयांपासून सुरू होऊन टप्प्याटप्प्याने सर्व ग्राहकांपर्यंत जाईल. यासाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित असला तरी, ठेका देण्यात आलेल्या संस्थेला दोन अडीच वर्षांत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संभाव्य वीज दरवाढ सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक आहे. ती दरवाढ आठवडाभरात मागे न घेतल्यास वीज खात्याच्या राज्यभरातील कार्यालयांसमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी दिला.
पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार कार्लुस फेरेरा व इतर नेत्यांच्या शिष्टमंडळाने सकाळी मुख्य वीज अभियंता स्टिफन फर्नांडिस यांना घेराव घालत वीज दरवाढीविषयी जाब विचारला. पाटकर यांनी सांगितले की, वीज खात्यावर ५७० कोटी रुपयांच्या थकीत बिलाचा बोजा आहे, त्यामध्ये सरकारी कार्यालयांचे १०८ कोटी रुपये आहेत. हे सरकारचे स्वतःचे बिल भरण्याबाबत सरकार अजिबात गंभीर दिसत नाही, पण सामान्यांच्या डोक्यावर दरवाढ करून आपले इस्पित साध्य करून घेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.