पणजी: देशातील अंमली पदार्थांचे जाळे आणि त्यातून निर्माण होणारा काळा पैसा नष्ट करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय आणि अंमली पदार्थ नियंत्रण कक्ष (NCB) यांनी एक मोठी संयुक्त मोहीम हाती घेतली. गोव्यासह देशातील सात राज्यांमध्ये एकूण 25 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली असून यामध्ये कोट्यवधींची रोकड आणि मोठ्या प्रमाणात 'क्रिप्टो करन्सी' जप्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांच्या तस्करीतून येणारा पैसा मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) माध्यमातून व्हाईट केला जात असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी (16 जानेवारी) सकाळपासून गोवा, मुंबई (महाराष्ट्र), दिल्ली, गुजरात आणि इतर तीन राज्यांतील महत्त्वाच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. गोव्यात प्रामुख्याने किनारी भागातील काही संशयित व्यावसायिक आणि एजंट्सच्या निवासस्थानी ही तपासणी सुरु असल्याची माहिती समोर आली.
या छापेमारी दरम्यान ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय चलनी नोटांसोबतच 'क्रिप्टो करन्सी'चाही शोध लागला आहे. अंमली पदार्थांच्या व्यवहारांसाठी डिजिटल चलनावर भर दिला जात असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. जप्त करण्यात आलेल्या क्रिप्टो वॉलेट्सची आणि व्यवहारांची तपासणी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने केली जात आहे. तपासादरम्यान काही संशयास्पद कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
हा पैसा केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम विविध शेल कंपन्यांमार्फत वळवली जात होती. एनसीबीने यापूर्वी पकडलेल्या काही ड्रग्ज तस्करांच्या चौकशीतून मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. सध्या ही छापेमारी सुरु असून सायंकाळपर्यंत जप्त केलेल्या एकूण रकमेचा आणि मालमत्तेचा आकडा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.