Liquor Scam: दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी नवा दावा केला आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीतील मद्य घोटाळ्याचा पैसा गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी वापरल्याचा सनसनाटी आरोप आपल्या आरोपपत्रात केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात दुसऱ्यांदा गोवा विधानसभा लढविणाऱ्या ‘आप’ने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 3.5 कोटी रुपये एवढा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
या घोटाळ्यातील आरोपी ‘आप’चे संपर्क प्रभारी विजय नायर यांनी इंडोस्पिरिट्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंद्रू यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी बोलायला लावले होते.
विजयच्या फोनवरून फेसटाईम व्हिडिओ कॉलद्वारे हे संभाषण झाले, असा गंभीर आरोप ईडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात केला आहे. मात्र, विजय नायर याने आपले राजकीय नेते अडचणीत येतील, असे कोणतेही विधान केलेले नाही.
‘ईडी’च्या दाव्यानुसार ‘आप’च्या सर्वेक्षण टीममध्ये सहभागी असलेल्या गोव्यातील कार्यकर्त्यांना सुमारे 70 लाख रुपये रोख दिले गेले.
‘ईडी’चे आरोपपत्र काल्पनिक : केजरीवाल
केंद्रातील भाजप सरकारच्या कार्यकाळात ‘ईडी’ने सुमारे पाच हजार आरोपपत्र दाखल केले असावेत. त्यापैकी कितीजणांना शिक्षा झाली? ‘ईडी’ची प्रकरणे बनावट आहेत. भ्रष्टाचार संपवण्यासाठी ते गुन्हे दाखल करत नाहीत.
‘ईडी’चा वापर आमदारांची खरेदी-विक्री, सरकार बनवण्यासाठी आणि फोडण्यासाठी केला जातो. त्यामुळे ईडीचे आरोपपत्र पूर्णपणे काल्पनिक आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
सात जणांवर आरोपपत्र :
दिल्ली मद्य घोटाळ्यातील 7 आरोपींविरुद्ध सीबीआयने दहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तपास एजन्सीने सांगितले की, ‘आप’चे संपर्क प्रभारी विजय नायर यांनी मोहिमेशी संबंधित काही लोकांना रोख रक्कम घेण्यास सांगितले होते.
आरोपपत्रात म्हटले आहे की, विजय नायर यांनी वायएसआर काँग्रेस खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी, त्यांचा मुलगा राघव मागुंटा, अरबिंदो फार्माचे संचालक पी. सरथ चंद्र रेड्डी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविता कलवकुंतला यांनी ‘आप’च्या वतीने 100 कोटी रुपयांची लाच घेतली होती.
स्वयंसेवकांना दिले 70 लाख रुपये
गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. प्रचारासाठी बराच पैसा देखील खर्च करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आणि त्यांचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. ‘आप’च्या सर्वेक्षण टीममधील काही स्वयंसेवकांना तब्बल 70 लाख रुपये रोख स्वरूपात दिले आहेत. प्रचारात सहभागी असलेल्या काही लोकांकडे हे पैसे दिले जायचे, अशी माहिती पक्ष प्रवक्ते विजय नायर यांनी ‘ईडी’ला दिली आहे.
शंभरहून अधिक छापे
सीबीआयने हे आरोपपत्र दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 नोव्हेंबरला होणार आहे.
यापूर्वी ईडीने 25 ठिकाणी छापे टाकले होते. यादरम्यान एजन्सीने राजधानीतील अनेक मद्यविक्रेत्यांच्या निवासस्थानांसह अनेक ठिकाणी झडती घेतली होती. यापूर्वीही या प्रकरणी ईडीने 100 हून अधिक छापे टाकले आहेत.
केंद्र सरकारच्या जवळचे उद्योजक अदानी यांचा घोटाळा उघड झाला आहे, तसेच गोव्यात म्हादईवरून सरकारची कोंडी झाली आहे.
त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्यासाठी ‘ईडी’चा वापर केला जात आहे. या प्रकरणातील आरोपीच्या विधानाला काहीही अर्थ नाही. विशेष म्हणजे, निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचा कोणताही पुरावा ‘ईडी’कडे नाही. - ॲड. अमित पालेकर, प्रदेशाध्यक्ष, आप.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.