सुविधा आणि प्रोत्साहनाच्या अभावामुळेच विमान कंपन्यांना दाबोळीवरून मोपा येथे विमानसेवा हलवण्यास भाग पाडले जात असून भाजप सरकार जाणीवपूर्वक गप्प आहे. स्पाईसजेट एअरलाइन्सने दाबोळीहून मोपा येथे विमानसेवा हलवण्याच्या केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी भाजप सरकारने डोळे बंद ठेवल्यास दाबोळी लवकरच घोस्ट एअरपोर्ट होईल, असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाबोळी विमानतळाचे निरंतर संचालन आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी तातडीने सर्व संबंधितांची बैठक घेणे आवश्यक आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक धनंजय राव यांना विचारले असता, गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून स्पाईस जेटने विमाने दाबोळीवर उतरवण्याचे बंद केले आहे. २६ ऑक्टोबर रोजी त्यांचे शेवटचे विमान दाबोळी विमानतळावर उतरले होते, असे सांगितले.
यापूर्वी स्पाईस जेटची दररोज १५ ते २० विमाने दाबोळीवर उतरत होती. मात्र, या कंपनीने आता मोपा विमानतळावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे.
आतापर्यंत तीन कंपन्यांनी दाबोळीला रामराम ठोकला असून कतार एअरवेजने जूनपर्यंतच दाबोळी विमानतळावरून विमाने सोडणार असे, यापूर्वीच जाहीर केले आहे.
त्यामुळे दाबोळी विमानतळ बंद पडणार, या चर्चेला पुन्हा एकदा ऊत आला आहे. मोपामुळे दाबोळी विमानतळावरील 20 टक्के प्रवासी यापूर्वीच कमी झाले असून ‘कुई’ या रशियन चार्टर कंपनीनेही दाबोळीपेक्षा मोपा विमानतळाला प्राधान्य दिल्याने यंदा 90 चार्टर विमाने मोपाकडे वळविली होती.
विस्तारा आणि इंडिगो या दोन देशी विमान कंपन्या सोडल्यास अन्य कोणत्याही कंपनीला दाबोळी विमानतळात रस नसल्याचे एकंदर परिस्थिती पाहिल्यास दिसते, अशी माहिती या विमानतळावरील एका टॅक्सीचालकाने दिली.
भाजपचे भांडवलदारांना मिळते प्रोत्साहन
2014 साली सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारने क्रोनी भांडवलदारांना स्ट्रॅटेजिक व्यवसायात उतरण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा कारभार संपवण्याचा प्रयत्न केला. मोपा विमानतळाचे कंत्राटदार ‘जीएमआर’ला लाभ मिळवून देण्यासाठीच भाजप सरकार जाणूनबुजून दाबोळीकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
दाबोळी विमानतळ बंद झाल्यास दक्षिण गोव्याचे फार मोठे नुकसान होईल. दाबोळी विमानतळावरील सेवा दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.