कुळे: तणावपूर्ण स्थितीनंतर आज ऑफलाईन पद्धतीने दूधसागर धबधब्यावर पर्यटनाला सुरुवात झाली. मात्र, जीप ऑपरेटर्सनी गोवा वनविकास महामंडळाद्वारे ऑनलाईन बुकिंग थांबवण्यासाठी आणि त्यांची बुकिंग वेबसाईट सरकारकडे परत देण्याची मागणी करण्यासाठी आजपासून साखळी उपोषण सुरु केले आहेत.
शनिवारी सकाळी ‘जीटीडीसी’मार्फत ऑनलाईन पद्धतीने संघटनेच्या मागणीविरुद्ध पोलिस बंदोबस्तात सुरु केलेली पर्यटन टूर दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सच्या सदस्यांनी रोखून धरला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तरी जीप टूर ऑपरेटर्स ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी माजी वनमंत्री विनय तेंडुलकर, भाजप गट मंडळ अध्यक्ष विलास देसाई घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थानिक जीप ऑपरेटर्सची समजूत काढली.
नंतर तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली व त्याठिकाणी काय झाले, त्याविषयी सविस्तर सांगितले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी टूर सेवा ऑनलाईन बंद करुन ऑफलाईन सुरु करण्यास आज, शनिवारपुरती परवानगी दिली असून आज सायंकाळी मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील निर्णय होणार असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. आज सकाळी 8 वाजता दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सनी स्थानिक गावकरांना पाचारण करुन दूधसागर आजोबा देवाला सामूहीक गाऱ्हाणे घातले.
जीप टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष नीलेश वेळीप म्हणाले, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहोत. आज सायंकाळी मुख्यमंत्री यांनी बैठक बोलाविली असून या बैठकीत पुढील निर्णय होणार आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी आजच्या दिवशी ऑफलाईन सेवा सुरू केली असून शंभरहून अधिक पर्यटकांना घेऊन जीप गेल्या आहेत, अशी माहिती दिली.
दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सना पाठिंबा देण्यासाठी आज अखिल गोवा बसमालक संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर, धारबांदोडाचे सरपंच बालाजी गावस, मिराबागचे संजय नाईक, शिवसेनेचे बाबूराव नाईक, सावर्डेचे पंच नितेश भंडारी, कालेचे माजी सरपंच किशोर नाईक, तारा केरकर तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.