पणजी: राज्य सरकारने राज्यातील 88 खाण मालकांना खाणींवरील यंत्रसामग्री काढण्याची नोटीस पाठवली आहे. सरकारने खाणींच्या लिलावासाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये कामगारांच्या कल्याणाचाही समावेश करावा, अशी मागणी गोवा आयटकने पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला आयटकचे अध्यक्ष प्रसन्ना उटगी, खाण कामगार नेते आत्माराम तिळवे, कामगार नेते राजू मंगेशकर आणि सिद्धेश पिन्नाईक उपस्थित होते. राज्यातील खाणी 2012पासून बंद आहेत. 2015 मध्ये त्या सुरू झाल्या. पण 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार त्या पुन्हा बंद झाल्या. त्यावेळेपासून खाण कंपन्यांनी कामगार कपातीचे धोरण अवलंबले आहे.
यामुळे खाण व्यवसायावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असल्याचे फोन्सेका म्हणाले. राज्य सरकारने खाण मालकांना 88 खाण जागेवरील यंत्रसामग्री हलविण्याची नोटीस दिली आहे. 4 मे रोजी दिलेल्या नोटीशीनंतर उर्वरित कामगारांनाही कामावरून काढून टाकण्याचे सत्र सुरू आहे. खाणींवर काम करणारे कामगार, बार्जमालक ट्रकचालक, हॉटेलचालक, मॅकेनिक असे अनेक पूरक उद्योग - व्यवसाय अवलंबून आहेत. या सर्वांवर बेकारीची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. खाणी बंद झाल्यानंतर कंपन्यांनी जुजबी रक्क्म देऊन कामगारांची बोळवण करून त्यांना घरी बसवले. आता उर्वरित कामगारांनाही तोंडी सूचना दिल्या जात आहेत. यामुळे खाण कामगार देशोधडीला लागेल, अशी भीती फोन्सेका यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री आणि सर्व आमदारांना आमच्या ४ पमुख मागण्यांचे निवेदन सादर केले असल्याचे प्रसन्ना उटगी यांनी सांगितले. या मागण्यांमध्ये वरील मागणीसह सध्या कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना दरमहा 15 हजार रुपये द्यावेत, खाण महामंडळाची स्थापना करावी या मागण्यांचा समावेश आहे.
खाणपीठातील पाणी कसे काढणार? : मंगेशकर
सध्याच्या खाणींवरील यंत्रसामग्री हटविल्यानंतर खाणपीठात मोठ्या प्रमाणात पाणी साठेल. खाणीतील पाणी बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया सातत्यपूर्ण सुरू असते. सध्याची यंत्रणा हटविल्यानंतर खाणपीठात पाणी साठल्यास या पावसाळ्यात पूराचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. यावर सरकारने काय उपाययोजना केली आहे का? असा सवाल कामगार नेते राजू मंगेशकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.