Dona Paula Theft, Dona Paula Robbery Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Theft: दोना पावलात सशस्‍त्र दरोडा घालणारी टोळी बांगलादेशी? चोरांनी पळवला CCTV-DVR; पोलिसांची माहिती देण्यास टाळाटाळ

Dona Paula Robbery: वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर घटनेसंदर्भात दाखवलेली अनास्था प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी आहे. या घटनेची माहिती देण्यासही पोलिस टाळाटाळ करत आहेत.

Sameer Panditrao

पणजी: दोना पावला येथील नागाळी हिल्स भागात एकमजली बंगल्यावर बुरखाधारी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. शस्त्रधारी दरोडेखोरांनी या बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करीत झोपेत असलेल्या प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश धेंपो (७७) व त्यांच्या पत्नी पद्मिनी (७१) या ज्येष्ठ दांपत्याचे चादरीने तोंड बंद करून व हातपाय बांधून सुमारे २ लाख रोख रक्कम व सुमारे ७० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह ऐवज लुटला आणि फरारी झाले.

या दरोड्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली. जिल्हा व क्राईम ब्रँच पोलिस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामागे बांगलादेशी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. मात्र, या घटनेची माहिती पोलिसांनी दडवून ठेवली. या दरोड्याप्रकरणी २८ तास उलटून गेले, तरी पोलिसांना ठोस असे काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत.

सीसीटीव्ही ‘डीव्हीआर’ही पळवला

१. दरोडेखोरांनी शनिवारी रात्री १२.३० नंतर धेंपो बंगल्याच्या मागील बाजूने संरक्षक भिंतीवरून चढून आत प्रवेश केला. पाचपेक्षा अधिक असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी बंगल्याच्या गेटच्या लोखंडी प्रवेशद्वारावर झोपेत असलेल्या वयस्क सुरक्षारक्षकाला चॉपरसारख्या तीक्ष्ण हत्याराने धाक दाखवून त्याला बेदम मारहाण केली.

२. सुरक्षारक्षकाचे तोंड व हातपाय चादरीने बांधून बंगल्यात नेले व एका बाथरूममध्ये डांबून ठेवले. आजारी असलेल्या पद्मिनी यांना पहिल्या मजल्यावर चढणे मुश्कील होत असल्याने बंगल्याच्या तळमजल्यावरील बेडरूममध्ये त्या झोपल्या होत्या. दरोडेखोरांनी त्यांचेही हातपाय बांधले व तोंड चांदरीने बांधून खोलीत कोंडून ठेवले, तर बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर झोपलेले जयप्रकाश धेंपो यांचेही चादरीने हातपाय व तोंड बांधून किचन रूममध्ये डांबून ठेवले.

३. तिघांनाही तीन वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवून बंगल्यातील कपाटे फोडून आतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. दरोडेखोरांनी तेथील चांदीची भांडी नेली नाहीत.

४. जयप्रकाश व पद्मिनी या दोघांना दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवला. मात्र, कोणतीही इजा केली नाही. बंगल्यामध्ये असलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा ‘डीव्हीआर’ दरोडेखोरांनी जाताना नेल्याने कोणतेच पुरावे मागे ठेवले नाहीत.

एका दिवसानंतर पोलिस घटनास्थळी

ही घटना थरकाप व भीती निर्माण करणारी असूनही वरिष्ठ अधिकारी एका दिवसानंतर आज घटनास्थळी दाखल झाले. काल पणजीचे पोलिस निरीक्षक व उपअधीक्षकांनीच भेट देऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. घटनेस ३६ तास उलटल्यानंतर पोलिस महासंचालक आलोक कुमार, अतिरिक्त महासंचालक ओमवीर सिंग बिष्णोई, उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, क्राईम ब्रँच अधीक्षक राहुल गुप्ता यांनी आज (२१ एप्रिल) उपस्थिती लावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर घटनेसंदर्भात दाखवलेली अनास्था प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी आहे. या घटनेची माहिती देण्यासही पोलिस टाळाटाळ करत आहेत. दोना पावला येथील नागाळी हिल्स परिसरातील उच्चभ्रू वस्तीत हा दरोडा पडल्याने पोलिस गुप्तचर यंत्रणाही कुचकामी ठरली आहे.

मोलकरणीमुळे उलगडा

रविवारी सकाळी मोलकरीण आली, तेव्हा तिला मुख्य दरवाजा खुला असल्याने तिला संशय आला व तिने जयप्रकाश यांचा मुलगा अनिरुद्ध याच्याशी मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर तो बंगल्यावर आला असता बंगल्याची गेट तसेच मुख्य प्रवेशद्वार खुले होते.

बंगल्यातील खोल्यांना बाहेरून लावलेल्या कड्या उघडल्या असता सुरक्षारक्षकासह त्यांचे आईवडील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडले व बंगल्यात चोरी झाल्याचे उघडकीस आले. पद्मिनी धेंपो यांच्या हातांना चादरीने बांधल्याने ते सुजले होते व त्यांची प्रकृती काहीशी अस्वस्थ बनल्याने त्यांना त्वरित इस्पितळात दाखल करण्यात आले. या दरोड्याच्या धक्क्यातून जयप्रकाश व पद्मिनी सावरलेले नव्हते. या घटनेची माहिती पणजी पोलिसांना देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT