Dog Joins Pandharpur Wari in Goa: आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हटले जाते. 'पाऊले चालती पंढरीची वाट....' असं म्हणत दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधीपासूनच वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी तन-मन-धन अर्पण करत पायी पंढरपूरची वाट चालत असतात. गोव्यातूनही एक अनोखा विठूभक्त वारीमध्ये सहभागी झाला आहे.
विठ्ठलाचा महिमा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून संपूर्ण देशभरामध्ये विठूरायाचे भक्त आहेत. दरवर्षी आपल्या गोव्यातूनही दरवर्षी वारकरी समुदाय पायी वारी करत पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. या वारीमध्ये तुम्ही आजवर लहान-थोर सर्वच जणांना पाहिलं असेल, पण आता विठ्ठलाचा नवा भक्त गोवेकरांनी पाहिला. वारकरीमध्ये टाळ-मृदुंगाच्या तालावर दंग चक्क एका श्वानाने वारीत सहभागी होत पंढरपूरची वाट धरली आहे.
येत्या 29 जूनला देवशयनी एकादशी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातून अनेक ठिकाणाहून वाऱ्या पंढरपूरला निघाल्या आहेत. 13 जूनला काणकोणमधून एक वारी निघाली असता, त्यांच्यामध्ये एक अनोखा विठ्ठलभक्त सामील झाला. विठूरायाच्या नामाचा जयघोष कानी पडताच एका श्वानाने पंढरीची वाट धरली आहे.
आता तो या वारकऱ्यांमधला एक भाग बनला असून जिथे ते जातात त्यांच्यासोबतच तो असतो. जिथे ते थांबतात त्यांच्यासोबत तो देखील थांबतो, त्यांच्यासोबत जेवतोही, ते पण हाताने भरवलं तरच तो जेवतो, असे मत वारकरी गौरीशा वारकर यांनी व्यक्त केले.
हा श्वान वारीतल्या सगळ्यांचा जणू राखणदार असल्याची भूमिका बजावतो. वारीतल्या वारकऱ्यांंनी तर त्याला माऊलीचेच रूप मानले आहे. वारकरी म्हणतात, त्याच्या रूपात आमच्यासोबत या पायी वारीत विठूरायाच आहे, असे आम्हाला वाटते.
तो आता या वारीसोबत आणि सगळ्या वारकऱ्यांसोबत इतका तल्लीन झाला आहे की काणकोण ते मोले अंतर तर त्याने पार केलंच आहे आणि आता तो इतरांसोबत पंढरपूरपर्यंत पोहोचेल असा विश्वास सगळ्यांना वाटत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.